उत्तर प्रदेशातील दादरीच्या अहमद इकलाखच्या घरी गोमांस दडविले असल्याची फसवी घोषणा करायला काही गुन्हेगारांनी त्या गावच्या पुजाऱ्याला धमकावले आणि त्याने ती मंदिरावरच्या ध्वनीक्षेपकावरून करताच या गुन्हेगारांचा जमाव इकलाखच्या घरावर चालून गेला आणि त्याने इकलाखला दगडांनी ठेचून ठार मारले. हा सारा प्रकार गोमांस दडवून ठेवण्याच्या अफवेतून म्हणजे गैरसमजातून झाला अशी उपरती त्या गुन्हेगारांनी व त्यांच्या पाठिराख्या पक्ष व संघटनांनी जाहीर केली. पण इकलाख मारला गेला तो गेलाच. त्याच्या धर्मबांधवांनी आपले गाव सोडले आणि साऱ्या नोएडा परिसरातच त्यामुळे धार्मिक दहशत कायम झाली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांचे सरकार आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी आहे असे म्हणून संघ वा भाजपाला खुनाच्या या अपराधातून स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. कारण उत्तर प्रदेशातच नव्हे तर साऱ्या देशात सध्या धर्माचे जे उन्मादी वातावरण उभे केले जात आहे आणि त्याला अल्पसंख्यकांविषयीच्या द्वेषाची जोड दिली जात आहे त्या साऱ्यामागे संघ परिवाराशी संबंध असलेल्या संस्था व संघटनाच आहेत हे आता शाळकरी मुलांनाही समजणारे आहे. नेमक्या याच स्थितीत पांचजन्य या संघाच्या मुखपत्राने या साऱ्यावर कडी करीत ‘गोमांस खाणाऱ्याची हत्त्या करण्याची धर्माज्ञा वेदांनीच देऊन ठेवली असल्याचे’ सांगून इकलाखची हत्त्या नुसती वैधच नव्हे तर धार्मिकही आहे असे सांगून टाकले आहे. पांचजन्यच्या या आगाऊपणामुळे मूळचे धास्तावलेले संघ परिवाराचे लोक मागे सरल्याचे व त्याच्या भूमिकेपासून आपण लांब असल्याचे आता सांगू लागले आहेत. वेदांमध्ये आणखी खोलवर गेल्यास त्यात गोमांसाचा व त्याच्या यज्ञादिकातच नव्हे तर धार्मिक सोहळ््यात कसा वापर होत असे तेही आढळणारे आहे. मात्र पांचजन्यने तिकडे दुर्लक्ष करून आपल्याला सोईची ठरतील तेवढीच सूक्ते आधाराला घेतली आहेत. आपली चंबळ नदी ही पूर्वी चर्मण्वती म्हणून ओळखली जायची. तिचे ते नाव कोणा रंतीनाथ नावाच्या राजाने यज्ञात केलेल्या पशुंच्या अगणित हत्त्येतून (म्हणजे त्यांच्या रक्त व मांसातून निर्माण झालेल्या प्रवाहातून) मिळाले ही कथाही आपल्या पुराणात आहे. (पाहा, पं. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोश) पण ती आता उगाळण्यात अर्थ नाही. कारण कधीकाळी लिहिले गेलेले व अपौरुषेय मानले गेलेले आपले वेद आणखीही बरेच काही सांगणारे आहेत. मात्र ते वाचले जात नसल्यामुळेच त्यातली सत्ये वा गृहीते आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. मुळात सगळ््याच प्राचीन धर्मग्रंथात व धर्मांच्या इतिहासात अशा आज्ञा आहेत. रोमने चौथ्या शतकात ‘सगळ््या स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया चेटकिणी असून त्या मृत्यूदंडास पात्र आहेत’ अशी आज्ञा काढली होती. तर कुराण शरीफ या इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथाने आणि त्यावर लिहिल्या गेलेल्या हदीस या धर्मभाष्याने ‘मुसलमान, ख्रिश्चन व ज्यू हे किताबी ग्रंथांचे पालन करणारे (ज्यांचा धर्मग्रंथ एकच आहे असे) लोक सोडून जगातले बाकीचे सगळेच वध्य असल्याचे’ म्हटले आहे. यातल्या ख्रिश्चनांनी व ज्यूंनी त्यांचे धर्मग्रंथ जुने झाल्यामुळे कुराण शरीफानुसार ते दुरुस्त करून घ्यावे आणि कर देऊन जिवंत राहण्याचा अधिकार प्राप्त करावा अशी सूटच तेवढी त्यांना दिली आहे. बाकी बौद्ध, हिंदू, जैन व अन्य धर्माचे लोक केवळ वध्यच आहेत अशी आज्ञा त्यात केली आहे. पांचजन्यच्या सांगण्यानुसार भारतातील वैदिकांनी वेदातल्या ‘त्या’ आज्ञेचे पालन करायचे तर त्याच न्यायाने जगभरच्या मुसलमानांना कुराण शरीफ व हदीस यांच्या उपरोक्त आज्ञांचे पालन करण्याचाही अधिकार प्राप्त होतो. अल् कायदा, तालिबान किंवा इसीस या धर्मांध संघटनांचे दावे आणि त्यांनी चालविलेल्या अन्य व स्वधर्मीयांच्या कत्तली याहून वेगळ््या नसल्याने त्या धर्माच्या आज्ञेत बसणाऱ्याच आहेत. पांचजन्यवाल्यांना आपल्या हिंदू वैदिकांमध्येही अशी तालिबानी व अल् कायदासारखी खुनी प्रवृत्ती निर्माण करायची आहे काय? त्यातून पांचजन्य हे संघाचे मुखपत्र असून संघ आपल्या भूमिका त्याद्वारे गेली कित्येक दशके मांडत आला आहे. त्यात जे छापून येते ते संघाचे मत असल्याचे संघाचे स्वयंसेवक,पाठीराखे, चाहते व नेतेही आजवर मानत आले. पांचजन्यमध्ये हा लेख प्रकाशीत झाल्यानंतर ‘आम्ही त्या भूमिकेपासून दूर आहोत’ असे या संघटनांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. मात्र तेवढे म्हणणे संघ वा भाजपासाठी पुरेसे नाही. त्या म्हणण्यामागे जो रक्तरंजित विचार उभा आहे त्याबाबतही त्यांनी बोलले पाहिजे व आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पांचजन्य या नियतकालिकाच्या संपादकपदावर एकेकाळी अटलबिहारी वाजपेयींसारखा सोज्वळ व सर्वसमावेशक वृत्तीचा विचारी संपादक राहिला आहे. आताचे त्याचे स्वरुप वाजपेयींच्या नावाला व त्यांनी घडविलेल्या इतिहासाला नुसते खाली आणणारेच नाही तर काळिमा फासणारेही आहे. धर्मातली जुनी वचने वर्तमानाला लागू करण्याचा प्रयत्न हा नुसता सनातनीच नाही तर धर्मांध असल्याचा पुरावा आहे. पांचजन्यसारखे संघाचे मुखपत्र म्हणविणारे नियतकालिक तो प्रयत्न आज करीत असेल तर त्याची शहानिशा अपराधी वृत्तीचा पुरस्कार करणारे पत्र अशीच करणे भाग आहे.
इकलाखची हत्त्या ‘धर्माज्ञेनुसार’ ?
By admin | Published: October 21, 2015 4:13 AM