- द्वारकानाथ संझगिरी(चित्रपट-क्रीडा समालोचक)
फार काहीही न करता सध्या रोहित शर्मा हा बातमीतला माणूस आहे. तो अनफिट होऊन मुंबई संघाबाहेर बसला. त्याला राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी वगळलं. उपकर्णधारपदाची त्याची वस्र काढून बँगलोरच्या कन्नूर लोकेश राहुलवर चढवली. रोहित अनफिट आहे हे कळतंच होतं. पण त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? - वगैरे कळवायची तसदी नियामक मंडळाने घेतलीच नाही. त्यामुळे मग संशयाचं धुकं पसरलं. तो संशय वाढला कारण अनफिट रोहित शर्मा पुन्हा आयपीएलमध्ये खेळला.
भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे. मंडळाने त्याला वगळण्याची नीट कारणं दिली नाहीत. संघाबाहेर कुणी सोम्या-गोम्या जात नव्हता, विश्वचषक २०१९ मध्ये पाच शतकं ठोकणारा फलंदाज जात होता. ज्याला जग वनडेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतं, त्याच्या फॅन्सना, क्रिकेट रसिकांना त्याला नेमकं का वगळलं हे कळण्याचा हक्क आहे की नाही? सुनील गावस्करने बाॅम्ब ठोकल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. मग मंडळाला काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागल्या. म्हणजे प्रश्न विचारले गेले नसते तर रोहित नावाची ‘ब्याद’ तिथून थेट भारतात पाठवायचा विचार होता का? असा संशय येऊ शकतो. आता मंडळाने म्हटलंय की रोहितच्या फिटनेसकडे लक्ष ठेवणार. म्हणजे त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायलाच हवं, कारण तो बायो बबलमध्ये आहे.
टॉपवर असलेल्या एकाच संघाच्या दोन खेळाडूंमध्ये काहीना काही तरी स्पर्धा असतेच. विराट - रोहित हे तसे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र आहेत. एक टी-ट्वेन्टी, वनडेचा राजा आहे. दुसरा तिन्ही फॉरमॅटचा बादशहा आहे. संघात विराट किंवा रोहितपैकी एकाला घायचं असेल तर मी विराटला घेईन. पैसे देऊन बॅटिंग पहायची असेल तर मी रोहितला पाहीन. टायमिंग, फटक्यातली सहजता, शैली यात रोहित विराटपेक्षा वर आहे. पण फलंदाजी इथेच संपत नाही. त्यात सातत्य, टेम्परामेंट, बचाव अशा आणखी कितीतरी गोष्टी अंतर्भूत असतात. त्या विराटला रोहितपेक्षा वरच्या मजल्यावर घेऊन जातात. म्हणून विराट कर्णधार झाला आणि रोहित झाला नाही. रोहितने फिटनेस ही गोष्ट विराट इतकी कधीच गंभीरपणे घेतली नाही. कोविडनंतर विराटला मैदानावर पाहताना कोविड ‘मानवल्या’सारखं वाटलं नाही. तो तसाच होता जसा तो सहा महिन्यांपूर्वी होता. रोहितला कोविडनंतरची शांतता ‘मानवलेली’ वाटली.रोहितची फलंदाजी ही आळसावलेली फलंदाजी असते. आणि म्हणूनच ती पहायला मला प्रचंड आवडते. ज्याचं वर्णन इंग्लिशमध्ये
‘रिलैक्सड सिल्कीनेस’ असं होऊ शकतं. पण क्षेत्ररक्षण करताना रोहित विराटप्रमाणे मैदानावर ‘लाइव वायर’ वाटत नाही. त्याचा शॉक फलंदाजाला बसत नाही. रोहित सध्या त्याच्या करिअरच्या टॉपवर आहे. विशेषत: वनडेमधल्या वर्ल्डकपनंतर ! किमान चार वर्ष आधी रोहितने आपली कसोटी क्रिकेटमधली जागा भक्कम करायला हवी होती. तो ती तशी करू शकला नाही, कारण कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा पेशन्स आणि बचाव हा त्याच्याकडे नसावा, असं वाटतं. कसोटी क्रिकेटमध्ये पाय रोवून फलंदाजी करावीच लागते. आणि ती करण्याची कुवत अजून त्याने दाखवलेली नाही. दोन खेळाडूमधली स्पर्धा ही कुरूप रूप घेऊ शकते. तुम्ही ठरवलंत की ज्या माणसाबरोबर माझी स्पर्धा आहे त्या माणसापेक्षा जास्त चांगला मी परफॉर्मन्स देईन, तर ती स्पर्धा सशक्त असू शकते. ती जेव्हा सशक्त स्पर्धा होईल त्यावेळी हे दोघेही एकाच स्तरावरचे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र असतील. रोहितने विराटच्या मजल्यावर रहायला जायचा प्रयत्न करावा. त्याला शक्य आहे. पण वर जायचा जिना सोपा नाही.