- विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
गेल्याच आठवड्यातली घटना. महादेवाच्या मंदिरातली नंदीची मूर्ती अचानक पाणी किंवा दूध प्राशन करायला लागली असा चमत्कार बघता बघता वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर, शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील पसरला. समाज माध्यमातून वाऱ्यासारखी ही बातमी पसरत गेली. खेड्यापाड्यापासून ते महानगरांपर्यंत महादेवाच्या मंदिरात रांगा लागल्या आणि नंदीला दूध किंवा पाणी पाजण्यासाठी भक्तांची तोबा गर्दी झाली. यात पत्रकार आणि बघ्यांचीही भर पडली. नंदी खरोखर दुधाचे प्राशन करतोय असे एक उन्मादी वातावरण तयार झाले.
एक निर्जीव मूर्ती - मग, तो नंदी असो कासव असो किंवा अन्य काही- पाणी खेचते म्हणजे ती पाणी पिते किंवा दूध पिते असा तर्क लावणे, चमत्कार घडल्याचा दावा करणे, ही बातमी समाज माध्यमांद्वारे पूर्ण देशभर पसरणे आणि एकाच वेळी याचा संसर्ग सगळीकडे होत मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी उसळणे, असा अंधश्रद्धेचा भयाण उन्माद बघायला मिळाला. त्यातल्या एकालाही यामागे काही वैज्ञानिक तथ्य असेल, शास्त्रीय कारण असेल असे न वाटणे हे तर्कशुद्ध विचार करण्याची ताकद गमावलेल्या समाजाचे लक्षण आहे.
२१ सप्टेंबर १९९५ रोजी गणपतीची मूर्ती अशाच पद्धतीने दूध प्यायला लागली, तेव्हा सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय ताण या तत्त्वातून घडणाऱ्या कॅपिलरी ॲक्शन किंवा केशाकर्षण या प्रक्रियेतून द्रव पदार्थ आत खेचले जातात असे नेमके स्पष्टीकरण माध्यमांमध्ये शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केले होते. त्याला आता २७ वर्षे लोटली आहेत. तरीसुद्धा समाजातील बहुसंख्यांना, माध्यमांना हे कळू नये हे अनाकलनीय आणि दुःखद आहे . मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात निसर्गात घडणाऱ्या वणवे, महापूर, विजांचा कडकडाट ,ढगांचा गडगडाट, वादळे ,सूर्यग्रहण ,चंद्रग्रहण याचे शास्त्रीय ज्ञान मानवाला नव्हते. त्याकाळी मानवाने काही कल्पना, पूजाविधी, कर्मकांड तयार केली. त्यात दगडांमध्ये देखील प्राण असतो, इच्छा-आकांक्षा असतात अशी कल्पना त्याला सुचली. पण, आधुनिक विज्ञानाने निसर्गातील घटनांचा कार्यकारणभाव समजावल्यानंतर तरी उत्क्रांतीच्या काळातील हे समज गळून पडायला हवे होते. मात्र, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही माणसाने ते समज कवटाळून ठेवलेले आहेत !
विज्ञानाची सृष्टी उपभोगणाऱ्या समाजामध्ये विज्ञानाच्या दृष्टीचा मात्र अभाव असणे चिंताजनक आहे. वैज्ञानिक, शिक्षण संस्था ,प्रशासन आणि इथली राजकीय व्यवस्था यापैकी कोणालाही वास्तव समाजापुढे मांडावे आणि एकाच वेळेस चमत्काराच्या नावाने तयार झालेले उन्मादी वातावरण निवळावे याची आवश्यकता वाटली नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या ताकदीप्रमाणे ठिकठिकाणी यामागील शास्त्रीय कारण देण्याचा प्रयत्न केला. त्याला माध्यमाने उचित प्रसिद्धी देखील दिली. यातून लक्षात येते एवढेच, की प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची ,तर्क करण्याची, उत्तर शोधण्याची वृत्ती समाज गमावतो त्यावेळेस अशा पद्धतीच्या चमत्कारांना उधाण येते आणि चमत्कारांच्या मागे धावणारी ‘झुंड’ तयार होते.
खरेतर शिक्षण व्यवस्थेतून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा होता, पण ते पुरेशा प्रखरपणाने घडलेले नाही. विज्ञान शिकलेला विद्यार्थी नंदीला दूध पाजण्यासाठी मंदिरात जातो त्यावेळेस त्याने शिकलेला तर्कवादी वैज्ञानिक दृष्टिकोन हरवलेला असतो. म्हणजे विज्ञानाचे शिक्षण केवळ परीक्षेतील गुणांसाठी होते, जीवनाची धारणा तयार होण्यासाठी लागणारा वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवण्यात आपली शिक्षणव्यवस्था कमी पडली. भविष्यात अशा विवेक गमावलेला झुंडी तयार व्हायच्या नसतील तर सर्वच घटकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
समाज माध्यमांचा वापर करून एकाच वेळी अशी बातमी पसरवण्याचा कट कोणीतरी रचित असावा, अशीही शंका घ्यायला वाव आहे. याद्वारे धार्मिक ध्रुवीकरण, उन्मादी वातावरण तयार करणे, लोकांच्या तर्कबुद्धीला विराम देण्याचा प्रयत्न करणे व त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे अशी जर कोणाची छुपी इच्छा असेल तर याचादेखील समाजाने विचार करण्याची गरज आहे. समाजाच्या श्रद्धांचा फायदा घेऊन स्वतःचे छुपे हेतू साध्य करण्याच्या या प्रयत्नांना समाजाने भीक घालता कामा नये. vinayak.savale123@gmail.com