इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारामुळे गाझा पट्ट्यातील विध्वंसास तात्पुरता विराम मिळाला आहे. कतार, इजिप्त आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी घडवून आणलेला हा युद्धविराम, शेकडो मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संघर्षातील तणाव कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अर्थात, पुढचा मार्ग मात्र आव्हानांनी भरलेला आहे. पूर्व जेरुसलेम आणि अल-अक्सा मशिदीसंदर्भातील वादांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या संघर्षाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नव्याने व्यापक स्वरूप धारण केले. त्या दिवशी हमासच्या सशस्त्र बंडखोरांनी अचानक इस्रायलमध्ये प्रवेश करून इस्रायली नागरिक आणि लष्करी ठिकाणांवर घातक हल्ला चढविला.
हल्ल्यात १,१९५ इस्रायली व विदेशी नागरिक ठार झाले, तर हमास बंडखोर २५१ जणांना पकडून गाझात घेऊन गेले. त्यानंतर इस्रायली सेनादलांनी गाझापट्टीवर भीषण हल्ले चढविले. तेव्हापासून आतापर्यंत हे युद्ध अविरत सुरू होते. इस्रायली हल्ल्यांमध्ये हमासच्या काही कमांडरसह शेकडो बंडखोर ठार झाले. सोबतच गाझापट्टीत महाभयंकर विध्वंस झाला. लाखो पॅलेस्टिनींची घरे नष्ट होऊन त्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला होता. त्यातच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांच्या शपथग्रहण समारंभापूर्वी ओलिसांची सुटका करा; अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असा थेट इशारा हमासला दिला होता. त्याचाही परिणाम झाल्याचे मानण्यास जागा आहे.
कोणाच्याही प्रयत्नांनी किंवा दबावाखाली का होईना, पण युद्धविराम होऊन हमासच्या ताब्यातील ओलिसांची आणि इस्रायलच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होणार, विस्थापितांना त्यांच्या हक्कांच्या जागी परतता येणार, हे महत्त्वाचे आहे. परंतु युद्धविराम टिकवण्यात अनेक आव्हाने आहेत. वर्षानुवर्षांचा परस्पर अविश्वास त्यासाठी कारणीभूत आहे. पॅलेस्टिनींना दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या सवलतीला कमजोरीचे लक्षण मानणाऱ्या कट्टर गटांचा इस्रायल सरकारवरील दबाव हा आणखी एक घटक आहे. दुसरीकडे हमासच्या नेतृत्वाला स्वत:ची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांमधील प्रतिमा राखावी लागेल.
वेगवेगळ्या कारणांस्तव मध्य-पूर्व आशियातील कोणत्याही संघर्षात रस घेणाऱ्या बाह्य घटकांच्या प्रभावामुळेही युद्धविरामास नख लागू शकते. त्यासंदर्भात विशेषतः इराण आणि अमेरिकेचे नाव घ्यावे लागते. हमासला, किंबहुना इस्रायलच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रत्येक घटकाला असलेला इराणचा पाठिंबा जगजाहीर आहे. त्या माध्यमातून मध्य-पूर्व आशिया आणि इस्लामी जगताचे नेतृत्व सौदी अरेबियाकडून हिसकावून घेण्याची इराणच्या नेतृत्वाची मनीषा आहे. या सर्व कारणांमुळे कधीही ठिणगी पडून भडका उडू शकतो. युद्धविराम प्रदीर्घ काळ टिकवायचा असल्यास त्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका महत्त्वाची असेल. सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. अल्पकालीन मानवी मदत महत्त्वाची असली तरी संघर्षाची मुळे हाताळण्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.
गाझाची पुनर्बांधणी आणि शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन या दोन बाबी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. गाझात वीज, पाणी आणि आरोग्य या प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य द्यायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इस्रायल आणि हमाससह पॅलेस्टाइनमधील सर्व घटकांदरम्यान शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. त्याशिवाय, इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेल्या अरब राष्ट्रांनी पॅलेस्टिनी हक्कांसाठी दबाव आणतानाच, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील अंतर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्याचवेळी, दहशतवादाच्या मार्गाने इस्रायलला झुकवणे शक्य नसल्याची वस्तुस्थिती हमासला मान्य करायला लावून, व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मूळ समस्या प्रामाणिकपणे, तातडीने हाताळल्या गेल्या नाहीत, तर युद्धविराम केवळ दीर्घकालीन संघर्षातील आणखी एक अल्पकालीन विराम ठरेल. समतोल प्रयत्न आणि सातत्यपूर्ण कृतीमुळेच न्याय्य आणि दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होऊ शकते.