नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आपले पूर्वज सांगून गेले. त्यामागे त्यांचे व्यावहारिक ज्ञान आहे. भलेही ते आपल्यासारखे ‘स्मार्ट’ नसतील; पण समाज एकसंध ठेवण्याचे व्यावहारिक शहाणपण त्यांच्या ठायी होेते. नदीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहिलेले, अनुभवलेले त्या नदीचे सौंदर्य त्या ठायी नसते. एखादा छोटा, क्षीण प्रवाह दृष्टीस पडून भ्रमनिरास होतो. महापुरुषांचे कूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याप्रति आपल्या मनात असलेल्या आदराला कंगोरे फुटण्याची शक्यता असते. समाजाची वर्तमान मानसिकता तशीच आहे. कोणत्याही महापुरुषाकडे आपण जात, पंथ, धर्म, प्रदेश, भाषा अशा वेगवेगळ्या नजरेतून पाहतो. गेल्या काही वर्षांत तर ही मानसिकता इतकी विकृत झाली, की संत, महापुरुषांची छाटणी यानुसारच केली गेली. दुस-या जातीत जन्माला येणारा संत, महापुरुष आपल्याला आपला वाटत नाही एवढे आपले मेंदू सडले आहेत. भलेही या सर्वच संत-महात्म्यांनी जातीपातीला तिलांजली देऊन एकसंध मानवता हा एकच धर्म उभा करण्याचे प्रयत्न केले असले; तरी आपण जातीय चश्म्यातून त्यांच्याकडे पाहतो. हा आपला नतद्रष्टेपणा. असे वाद महाराष्ट्राला नवे नाहीत. उलट समाजात जात हा घटकच प्रभावी झाल्याने राजकारणासाठी महापुरुषांचा सोयीस्कर वापर होत असल्याचे आपण पाहतो. अशा घटनांनी वेगळ्याच कारणासाठी वातावरण दूषित होण्यास मदत होते.आता साईबाबांच्या जन्मस्थानावरून नवा वाद पुढे येत आहे. साईबाबाशिर्डीचे हे जनमनावर ठसलेले आहे. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे झाल्याचे पुरावे आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत ते पाथरीतच होते. पुढे ते पैठण तालुक्यातील धूपखेडामार्गे शिर्डीत गेले आणि तेथे जीवनभर अलौकिक कार्य केले. श्रद्धा-सबुरीचा संदेश दिला. पाथरीच्या जन्मस्थानाविषयी आजवर विरोध नव्हता. लोक तेथेही दर्शनाला जातात; पण या जन्मस्थानाची प्रसिद्धी झाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जन्मस्थानाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर शिर्डीकरांनी त्याविरोधात ‘बंद’ची हाक दिली.जाती-धर्मावर जशी संतांची वाटणी करता येत नाही तशी जन्मस्थानावरूनही करता येत नाही. साईबाबांचा जन्म पाथरीला झाला असला, तरी जगभर त्यांची ओळख शिर्डीचे साईबाबा अशीच आहे. पाथरीच्या नामोल्लेखाने शिर्डीचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही, एवढी साईभक्तांची श्रद्धा अढळ आहे. बाबांच्या जन्मस्थानाचा हा उल्लेखही नवा नाही. अनेक पोथ्या आणि चरित्र ग्रंथांत त्याचा संदर्भ आलेला आहे. ज्ञानेश्वर आळंदीचे असले तरी त्यांचे जन्मस्थान आपेगाव असल्याचे नाकारता येत नाही. मराठवाड्याची संत परंपरा मोठी आहे. एकनाथ वगळता बहुतेक संतांची कर्मभूमी मराठवाड्याबाहेर राहिली. नामदेव हे महाराष्ट्रापेक्षा काकणभर जास्त पूजनीय पंजाबात आहेत. मराठवाड्यातील जांब समर्थमधील रामदासांनी कर्मभूमी साता+याकडे निवडली. ज्ञानदेव आळंदीला गेले. चक्रधरस्वामींच्या शिष्या महादंबा या बीड जिल्ह्यातील; पण त्यांचे कार्यक्षेत्र पार गुजरातपर्यंत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.साई महात्म्यामुळे शिर्डीचा विकास झाला. आता त्यांच्या जन्मस्थानाचा विकास झाला, तर तेवढेच मराठवाड्याचे मागासलेपण कमी होण्यास मदत होईल. शिर्डी आणि पाथरीवासीयांनी अशा विषयांवर संयम दाखवून टोकाची भूमिका टाळली पाहिजे. श्रद्धा-सबुरी या साईबाबांच्याच शिकवणीचा अंगीकार केला आणि पाथरीला विकासाच्या चार विटा लागल्या, तरी शिर्डी आणि पाथरी ही दोन्ही स्थाने महाराष्ट्रातच आहेत याचा अभिमान सर्वांना वाटला पाहिजे. यामुळे शिर्डीमधील साईभक्तांचा ओघ पाथरीकडे वळणार नाही, शेवटी स्थानमहात्म्य मोठे असते. यातून चांगलेच घडेल, अशी आशा करू. भक्तगण शिर्डीला माथा टेकवल्यानंतर पाथरीला येऊनही दंडवत घालतील. त्यामुळे असे प्रश्न न ताणता श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे आहे.
श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 5:24 AM