- पवन वर्मा(राजकीय विषयाचे विश्लेषक)
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबरदरम्यान कथित धर्मसंसद झाली. मुस्लिमांचा द्वेष, त्यांच्याविरुध्द हिंसेला उघड चिथावणी देणारी भाषणे या धर्मसंसदेत झाली. यावर बहुतेक भारतीय कदाचित विश्वासही ठेवणार नाहीत. स्वयंघोषित हिंदू रक्षा समितीचे अध्यक्ष प्रबोधानंद गिरी यांनी मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे खुले आवाहन केले. म्यानमारच्या धर्तीवर आपले पोलीस, राजकीय नेते, लष्कर, आमजनतेने हाती शस्त्र घेऊन हे ‘स्वच्छता अभियान’ चालवले पाहिजे, आता दुसरा पर्यायच उरलेला नाही, असे ते म्हणाले.
दुसऱ्या मान्यवर पूजा शकून पांड्ये तथा साध्वी अन्नपूर्णा यांनी थेट वंशहत्येची हाक दिली. धार्मिक विद्वेषावर आधारित जे गरळ या संसदेत ओकले गेले त्याचे हे काही अत्यंत संतापजनक नमुने. याबाबतीत काही तथ्ये जाणून घेतली पाहिजेत. धर्मसंसदेत बोलणारे सर्व वक्ते स्वत:ला हिंदू धार्मिक संत मानत होते. यापैकी सगळ्या नाही तरी बऱ्याच जणांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत. योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या बरोबरचे फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत. संघ परिवार किंवा भाजपा नेत्यांशी असलेले संबंध त्यांच्यापैकी कोणीही लपवलेले नाहीत. आपण त्या गावचेच नाही, असे ते भले नंतर म्हणोत; पण ते या संसदेत होते आणि त्यांची भाषणेही झाली.
धार्मिक विद्वेषाचे हे असे भयंकर प्रदर्शन काही अचानक घडलेले नाही. वर्षानुवर्षे हा द्वेष पसरवला गेला, त्याचा हा परिणाम आहे. याची जबाबदारी कोण स्वीकारणार, याचे उत्तर उजव्या वळणाच्या प्रमुख संघटनांनी देशाला दिले पाहिजे. या फुटकळ संघटनांचे सदस्य आणि फुटीर विचारांचे पाठीराखे अशा जातीय विद्वेषाला खतपाणी घालणारी विधाने करताना कायम आढळले आहेत. यांनी नेहमीच नथुराम गोडसेसारख्यांची भलामण केलीय.
कत्तलीच्या घटनांची २०१०पासूनची आकडेवारी पाहिली तर २०१४नंतर त्या अधिक म्हणजे ९८ टक्के घडल्या आहेत. त्याही भाजप शासित राज्यात जास्त झाल्या आहेत. मते मिळवण्याचे अल्प उद्दिष्ट ठेवून मुस्लीम व इतर अल्पसंख्यकांच्या द्वेषाचे राजकारण खेळले गेले. हिंदूंची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी ‘दुसऱ्यांना’लक्ष्य केले गेले. त्यांच्याविरुद्ध वैरभाव पसरवला गेला. हरिद्वारमध्ये ज्या धार्मिक नेत्यांची भाषणे झाली ती सत्तेमुळे मिळालेली ताकद वेळोवेळी दाखवण्याचाच प्रकार आहे.
हरिद्वारमध्ये हे लोक अगदी सहजच जमले होते, असे कुणी म्हटले तर त्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. त्यामागे नियोजन होते आणि काही योजनाही होती, हे तर नक्कीच! समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेरचे काही माथेफिरू अधूनमधून असे बोलतच असतात. या समजुतीतून सामान्य भारतीयांनी याकडे वर्षानुवर्षे कानाडोळा केला आहे. वास्तव असे आहे, की गेल्या सात वर्षात हे ‘काही थोडे’च मुख्य प्रवाहात आले आहेत. सत्ताधारी गटाचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांना उघड किंवा छुपे प्रोत्साहन दिले जाते, पोसले जाते आणि हरिद्वार - रायपूरच्या या (अ)धर्मसंसदांसारख्या घटना घडल्या की, भाजपा त्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो. भडकावू भाषणे देणाऱ्यांपैकी एकाविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करणेही म्हणूनच उत्तरप्रदेश सरकारच्या जीवावर आले होते. केंद्रातील श्रेष्ठी किंवा राज्य सरकारने या प्रकाराचा निषेध केलेला नाही.
हे आश्चर्यकारक मौन म्हणजे मूक पाठिंबाच असतो. आपण केले ते योग्यच होते असेच हे गुन्हेगार दाखवत आहेत ते केवळ आपल्याला सत्ता स्थानाचा पाठिंबा आहे या भरवशावर. या अशा घटनांबद्दल नेमस्त, विचार करु शकणाऱ्या हिंदुंना काळजी वाटली पाहिजे. ही अशी गरळफेक होते कधीतरी, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाता कामा नये. हे जहाल धर्मगुरू काही दिवसांनी तुम्हाला काय खावे, प्यावे, ल्यावे, कोणाला भेटावे, प्रार्थना कशी करावी, हे सगळे सांगू लागतील. त्यांची अडाणी धर्मांधता तुमच्या - आमच्यावर राज्य करील. महिला त्यांचे विशेष लक्ष्य असतील. हिंदू पतिव्रतेने कसे वागावे, हे तेच सांगतील. ‘दिवाळी मुबारक’ अशा शुभेच्छा देणाऱ्यांवर ते हल्ला करतील. कारण मुबारक हा शब्द उर्दू आहे. नाताळ साजरा करणे हिंदुविरोधी मानले जाईल.
बहुसंख्य हिंदू ज्या प्रकारे हिंदू राहू इच्छितात, त्यावर ही स्वयंघोषित दादा मंडळी घाला घालतील. धुमाकूळ माजवतील. स्वयंआश्वस्त, सहिष्णू, संवादी समावेशक स्वभावाच्या हिंदुत्त्वाला या प्रकारच्या विद्वेषी हिंसेने मोठीच बाधा पोहोचेल. आपला सनातनी धर्म कट्टर करण्याचा हा प्रयत्न आहे. धर्मांध, असुरक्षित, काहीना ठरवून वगळणारा असा हा हिंदू धर्म आपल्याला मान्य आहे का, याचा विचार प्रत्येक जाणत्या हिंदूने करायला हवा. एका राजकीय पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या डोळ्यासमोर हिंदुत्व हे शस्त्रासारखे वापरले जात आहे.
या भगव्या वस्त्रधाऱ्यांच्या डोक्यात निपजलेले हिंदू राष्ट्राचे उद्दिष्ट एकतर आपल्याकडच्या अल्पसंख्यकाना बाहेर काढील (जे व्यवहार्य होणार नाही) किंवा त्यांना दुय्यम नागरिक म्हणून वागवील. अर्थात यातून विनाशच ओढवेल. यातून भारताच्या राज्यघटनेचे हिंसक विकृतीकरण तर होईलच, त्याव्यतिरिक्त कायमचे अस्थैर्य, धार्मिक असंतोष, जातीय तेढ निर्माण होऊन समाज तणावग्रस्ततेत ढकलला जाईल.
विकास, समृद्धीसाठी आवश्यक असलेली शांतता, सलोखा नष्ट होईल. हे हिंदुंच्या हिताचे आहे का? कोणत्याही धार्मिक समाजाकडून येणारी द्वेषमूलक वक्तव्ये निषेधार्हच असतात. आपल्या सांस्कृतिक वारशाच्या नाजूक ताण्याबाण्याला त्यातून धक्का पोहोचतो. हिंदुत्त्वाच्या अवनतीचा प्रयत्न हा सामान्य हिंदू आणि भारतीयांच्या संवेदनेवर आघात आहे. आता पुरे झाले, असे भारतीयांनी म्हणण्याची वेळ आली आहे.