शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मातृभाषा ठरू शकते व्यवसायभाषा !

By admin | Published: May 29, 2016 3:33 AM

गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी

- प्रा. डॉ. अनघा अ. मांडवकर गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी आपला कल, आपले उद्दिष्ट यांना महत्त्व देत आवर्जून ‘कला - मानव्यविद्या’ या शाखेत प्रवेश घेऊ लागले आहेत. परंतु याच काही वर्षांत मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांतील महाविद्यालयांत ’कला - मानव्यविद्या’ या शाखेतील ’मराठी भाषा-साहित्य’ या विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने रोडावली आहे. मराठी भाषा-साहित्य हा विषय पदवीस्तरावर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या बाजारपेठकेंद्री जगात काहीही व्यावसायिक संधी नाहीत, असा मराठी भाषकांत प्रचलित असलेला गैरसमज हे विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा-साहित्य’ या विषयाकडे पाठ फिरविण्यामागचे एक मुख्य कारण आहे. अनेकदा विद्यार्थ्यांची मराठी हा विषय घेण्याची इच्छा असली; तरी पालक, अन्य नातेवाईक, समवयस्क यांच्याकडून केल्या जाणाऱ्या ‘मराठीतून तुला पुढे काहीही भवितव्य नाही,’ या अशा नकारात्मक वक्तव्यांमुळे तेही संभ्रमात पडतात. प्रत्यक्षात, ‘मराठी भाषा-साहित्य‘ या विषयाचे अध्ययन हे विविध विषयांचे ज्ञान देऊन, तसेच व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक अशी संवादकौशल्ये, अभिव्यक्तिक्षमता रुजवून एक उत्तम माणूस घडवू शकते. या विषयातील पदवी शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधीही निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतात. मराठीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन शाळा, महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम करण्याच्या पारंपरिक शक्यतांबरोबरच अन्य भाषिकांसाठी मराठीचे अध्यापन करणे, पदवीनंतर शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयीचा अभ्यासक्रम करून शैक्षणिक संसाधननिर्मितीच्या क्षेत्रात जाणे अशा अन्य वाटांचाही विचार करणे शक्य आहे. मराठी भाषा-साहित्य यांतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय परीक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य-मराठी-विकास-संस्था’, ‘साहित्य-संस्कृती-महामंडळ’ इत्यादी संस्थांत नोकरी मिळवू शकतात. मराठीतून पदवी घेतल्यानंतर ‘भाषाविज्ञान’ (लिंग्विस्टिक्स) या विषयातही पदव्युत्तर शिक्षण घेता येते. भाषाविज्ञानातील या शिक्षणाच्या आधारे अनेक शासकीय व बिगरशासकीय संस्थांतील भाषाविषयक संशोधन प्रकल्पांत कार्यसंधी मिळू शकते.मराठी भाषा-साहित्य या विषयातील पदवी शिक्षणानंतर ‘पत्रकारिता व प्रसारमाध्यमे’ यांविषयीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि आंतरजाल या माध्यमांत व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. मराठीच्या पदवीधरांना पत्रकारितेशिवाय ‘जाहिरात-मसुदालेखन’ (कॉपी-रायटिंग), ‘जनसंपर्क-व्यवहार’ (पब्लिक रिलेशन्स) या वाटा चोखाळणेही शक्य आहे; त्यासाठी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. भाषेवर प्रभुत्व, लेखनक्षमता आणि उत्तम आवाज असलेले मराठीचे पदवीधर आकाशवाणीवर सूत्रवाही (आर.जे.), वृत्तनिवेदक, कार्यक्रम-अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत असलेले दिसतात. मराठीच्या पदवीधरांना ‘ग्रंथालयशास्त्रा’चा अभ्यासक्रम पूर्ण करून शाळा-महाविद्यालयांतील ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये येथे ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळू शकते. त्यांना रिझर्व्ह बँकेसारख्या शासकीय संस्था तसेच खासगी क्षेत्रांतील विविध उद्योगसंस्था यांमध्येही ग्रंथपाल किंवा माहिती-अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते. मराठीचे, ग्रंथालयशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुस्तक प्रकाशन संस्थांतील संपादन विभागांतही काम मिळू शकते. प्रकाशन संस्थांकडून अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, संपादन या प्रकारची कामे मिळविणे शक्य आहे. याव्यतिरिक्त ‘मराठी’ या विषयाचे पदवीधर त्यांच्या मराठीविषयक अभ्यासाच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षांत, तसेच सामाजिक संशोधन, पर्यटन अशा अन्य व्यावसायिक क्षेत्रांतही यश मिळवू शकतात. ज्यांना नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य, लोककला या क्षेत्रांकडे जायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी पदवीस्तरावर ‘मराठी’ या विषयाचा अभ्यास केल्यास, तो त्यांच्या कलाविषयक अध्ययनास पूरक ठरू शकतो. दुसरे असे की, ज्या ठिकाणी कोणत्याही विषयातील पदवी ही पात्रता-अट असते, अशा रोजगार संधी, उदाहरणार्थ, बँकेतील, रेल्वेतील किंवा कोणत्याही शासकीय विभागांतील भरतीसाठीच्या परीक्षा या मराठीच्या पदवीधरांसाठीही खुल्या असतात.थोडक्यात, ‘मराठी’ हा विषय शिकून पैसा, प्रतिष्ठा, प्रगतीच्या संधी, नावलौकिक हे सारे काही निश्चितपणे मिळू शकते. मराठी ही आपली ‘मातृभाषा’ किंवा ‘निजभाषा’ म्हणून आपले तिच्यावर प्रेम असतेच; पण ‘व्यवसायभाषा’ म्हणूनही ती आपल्याला खूपकाही देऊ शकते. गरज आहे ती, महाराष्ट्रीय समाजातील भाषा-साहित्यविषयक क्षमता व आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी आपापल्या डोळ्यांवरची गैरसमजांची नकारात्मक झापडे दूर करून; ‘मराठी आणि व्यावसायिक संधी’ या समीकरणाकडे नव्या, सकारात्मक दृष्टीने पाहण्याची, तसेच यशाकरिता आवश्यक असलेल्या भाषिक आणि अन्य क्षमतांच्या वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची !