- किरण अग्रवाल
जागोजागच्या मंदिरांची व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम आरंभली गेली असून, ही मोहीम केवळ शासकीय उपक्रमाचा भाग न ठरता त्यात लोकांचा वैयक्तिक व सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग लाभणे अपेक्षित आहे.
स्वच्छता ही खरे तर स्वतःशी निगडित बाब आहे. कारण तिचा संबंध थेट स्वतःच्या आरोग्याशी असतो; पण तरीही कोणी त्याबाबत फारसा गंभीर नसतो. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा विचारच न केलेला बरा, अशी एकूण स्थिती आहे. यामुळेच की काय, पुन्हा एकदा शासन व प्रशासनाने याबाबत पुढाकार घेत स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्यात लोकसहभाग लाभनेही गरजेचे आहे.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. यामुळे मंदिरांमधील प्रसन्नता टिकून राहण्यास मदत होणार आहे. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असून, स्थानिक नेत्यांसह प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी यात सहभागी झालेले दिसत आहेत; पण ही मोहीम केवळ शासनाचीच राहून उपयोगाचे नाही, तर त्यात लोकसहभाग लाभणे अत्यंत गरजेचे आहे, त्याशिवाय तिचे यश दृष्टिपथात येणार नाही.
अकोल्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठक घेत स्वच्छतेची मोहीम लोकचळवळ होण्याची अपेक्षा बोलून दाखविली. अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबविताना दिसत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे ‘गुड मॉर्निंग पथक’ ग्रामीण भागात फिरून सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना नोटिसा बजावत आहेत. बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांतही स्वच्छतेसाठीच्या मोहिमा गतिमान झाल्याचे दिसत आहे; परंतु या मोहिमांचे स्वरूप केवळ तात्कालिक स्वरूपाचे राहून चालणार नाही, तर ही मोहीम कायम कशी टिकून राहील, याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. कारण यापूर्वीही वेळोवेळी अशा मोहिमा हाती घेतल्या गेल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत व आदर्श ग्राम पुरस्कारात स्वच्छतेच्या मुद्याकडे अधिक लक्ष पुरविले गेले आहे; पण यातील उपाययोजना अधिकतर प्रासंगिक स्वरूपाच्याच ठरत असल्याचे निदर्शनास येते. ग्राम स्वच्छतेचे पुरस्कार घेतले गेल्यानंतर त्याठिकाणी स्वच्छतेचे बारा वाजल्याची अनेक उदाहरणे देता येणारी आहेत.
मुळात, सार्वजनिक स्वच्छतेबद्दलची अनास्था आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. स्वच्छतेचा हा मुद्दा आपल्या आरोग्याशीही निगडित आहे व अस्वच्छतेमुळे अनेकविध आजारांना निमंत्रण मिळून जात असते तरी त्याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही. व्यक्तिगत स्वच्छतेबाबतच पुरेशी काळजी घेतली जात नसताना सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत कोण लक्ष देणार, असा प्रश्न आहे. त्यामुळेच सरकारी इमारतींचे कोपरे व जिन्यांमध्ये पिचकाऱ्यांचे रंग पाहावयास मिळतात. याच स्तंभात मागे उल्लेख केल्याप्रमाणे अकोल्यातील उड्डाणपुलाच्या रंगकामाने सुशोभित खांबांवर पोस्टर्स चिकटवणारे महाभाग आहेत, तसेच अलीकडेच चित्राकृतींनी सुशोभित बसस्थानकाच्या भिंतीवरही पिंक टाकलेली दिसून येत आहे. तेव्हा सामाजिक जबाबदारीचे व स्वच्छतेचे भान न बाळगणाऱ्यांना समजावणीची भाषा कळणार नसेल, तर प्रशासनाला कारवाईचाच बडगा उगारावा लागेल.
महत्त्वाचे म्हणजे, स्वच्छतेच्या मोहिमेसाठी सामाजिक संस्था, संघटनांनाही पुढे यावे लागेल. शाळा- शाळांमधील मुलांच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व रुजवावे लागेल. अवघ्या जनांस स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबांची ही कर्मभूमी आहे, त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपताना स्वच्छतेच्या विषयाकडे शासकीय मोहीम म्हणून न पाहता प्रत्येक व्यक्तीने स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेणे अपेक्षित आहे.
सारांशात, अकोल्यातील डीप क्लिनिंग ड्राइव्ह असो, की ठिकठिकाणी सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमा; यात सातत्य ठेवून त्यात लोकसहभागाची भर घातली गेली, तर आपलेच शहर व परिसर स्वच्छ व सुंदर होण्यात मदत घडून येईल. सामाजिक संस्था व संघटनांचा पुढाकार यासाठी गरजेचा आहे.