सुखी संसारात सवतीचा प्रवेश झाला खरा, पण...
By यदू जोशी | Published: September 1, 2023 08:25 AM2023-09-01T08:25:48+5:302023-09-01T08:26:28+5:30
शिंदे-अजितदादा यांच्यात मत-मतांतरे होतात तेव्हा फडणवीस यशस्वी शिष्टाई करतात. निर्णयाबाबत ट्रॅफिक जाम झाला की फडणवीसांची शिट्टी वाजते!
- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)
भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी व इतर कच्चे लिंबू पक्ष यांची बैठक लोकसभेच्या आढाव्यासाठी आज होत आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश तीन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकमेकांशी ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्यात विश्वास निर्माण करणे हादेखील आहे. राष्ट्रवादी सोबत आल्याने आपल्याला बळच मिळाले, असे बहुतांश भाजप आमदारांना वाटते. पण, राष्ट्रवादीवाले आपल्याला खाऊन टाकतील, आपल्यावर ‘दादा’गिरी करतील, अशी भावना कार्यकर्त्यांच्या फळीत आहे. शिंदे सेनेतही हेच वातावरण असल्याचे त्यांच्या लहान-मोठ्या नेते-कार्यकर्त्यांशी बोलताना जाणवते. आपल्याला मंत्रालयात प्रवेशासाठी ताटकळावे लागते अन् राष्ट्रवादीचा गल्लीतला कार्यकर्ता मंत्रालयात बिनदिक्कत येतो, हा फरक भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही सतावतो आहे.
आपल्या लोकांना ताकद देण्याची अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पूर्वापार सवय आहे. ते ती बदलणार नाहीत आणि ते बदलतील तरी कशासाठी? तीच तर त्यांची ताकद आहे. त्यामुळे भाजपचे नेते, मंत्री त्यापुढे जाऊन पक्षजनांशी कनेक्ट झाला, तरच राष्ट्रवादीची धास्ती कमी होईल. केवळ शिंदे-फडणवीसांनीच सगळी काळजी करून काही होणार नाही. भाजपच्या तुलनेने शिंदे यांचे स्थानिक कार्यकर्ते, नेते अधिकच हवालदिल आहेत. भाजपमध्ये खालपर्यंत एक सिस्टिम तरी आहे, तिकडे तीही नाही. त्यामुळे राष्ट्रवादीविषयीची अस्वस्थता त्यांच्यात अधिक आहे.
- असे परस्पर अविश्वासाचे वातावरण असताना ते दूर करण्यासाठी म्हणून तीन पक्षांची एकत्रित बैठक पहिल्यांदाच होत आहे. साधे एसईओ या सरकारला अद्याप नेमता आलेले नाहीत; महामंडळे तर दूरच राहिली. राष्ट्रवादीच्या येण्याआधीच ती झाली असती तर आपल्याला मोठा वाटा मिळाला असता; आता तो कमी होईल ही तक्रार आहेच. राष्ट्रवादीची बुलेट ट्रेन निघाली आहे. महामंडळांपासून एसईओपर्यंतच्या नावांची यादी तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. याबाबत भाजप म्हणजे भुसावळ पॅसेंजर आहे. राष्ट्रवादीने नऊ कॅबिनेट मंत्रिपदे घेतली; त्यामुळे आपली संधी हुकली असे भाजप, शिंदे सेनेतील आमदारांना वाटते. हा सल दूर करायचा तर मंत्रिमंडळ विस्तार हाच एकमेव मार्ग आहे. केेवळ १९ मंत्र्यांकडेच पालकमंत्री पदे आहेत. राष्ट्रवादीचे नऊ मंत्री हे पालकमंत्री पदाविना आहेत. म्हणजे ते राज्याचे मालक आहेत; पण जिल्ह्याचे नाहीत.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. पण राष्ट्रवादीबद्दलची धास्ती, नवीन सत्ता समीकरणाने भाजपच्या केडरची झालेली पंचाईत, विस्तार न होणे, महामंडळांवरील नियुक्त्या रखडणे, पालकमंत्रिपदांचा खोळंबा अशा गोष्टींमुळे सरकार अजूनही स्थिरावलेले वाटत नाही. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून कोणत्याही धोरणात्मक निर्णयाची फाईल आधी फडणवीसांकडे अन् नंतरच मुख्यमंत्री शिंदेंकडे जाईल, असा आदेश काढल्याने अजितदादांच्या निर्णयांना फडणवीसांची चाळणी लागणार, हे खरेच आहे. मात्र त्यावर, शिंदे-फडणवीसांनी मिळून अजितदादांना रोखले असा तर्क काहींनी दिला तो तितकासा खरा नाही.
अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील बैठका एकामागून एक घेत सुटल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा घोडा रोखला हे खरे नाही. त्यांना रोखणे एवढे सोपे नाही.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अर्थमंत्रिपद देतानाच फायलींच्या प्रवासाची ही अट टाकण्यात आलेली होती. अजित पवारांच्या निर्णयांना आडकाठी केली जाईल, असे वाटत नाही. उलट, फडणवीसांचे मधुर संबंध लक्षात घेता त्यांच्या फायली पटापटा पुढे सरकतील. मुळात दोघांमधील घट्ट मैत्रीमुळे छाटाछाटीची गरज नाही. फडणवीसांचे निर्णय प्रक्रियेतील महत्त्व या आदेशाने वाढले आहे. पण त्याचा वापर ते अजित पवारांचे पंख छाटण्यासाठी करतील, असे वाटत नाही. अजित पवार हे एकनाथ शिंदेंकडे पाहून नाही तर फडणवीसांकडे आणि दिल्लीतील त्यांच्या नेत्यांकडे बघून सरकारमध्ये आले आहेत. ते फडणवीसांच्या शब्दाला किती मान देतात, हे परवा साखर कारखान्यांबाबत घेतलेला आधीच निर्णय त्यांनी मागे घेतला त्यावरून लक्षात आलेच असेल. रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील आदी भाजप नेत्यांच्या कारखान्यांना त्यामुळे दिलासा मिळाला.
मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांचे नेमके संबंध आहेत तरी कसे? शिंदे-अजितदादा यांच्यात मुद्यांवर मतमतांतरे होतात तेव्हा फडणवीस यशस्वी शिष्टाई करतात. निर्णयाबाबत ट्रॅफिक जाम झाला की फडणवीसांची शिट्टी वाजते आणि कोंडी सुटते. शिंदेंना अजितदादा दाबत राहतील, असेही काहींना वाटते पण ते शक्य नाही.
शिंदेंनी एकदा एक विषय मनात घेतला की ते मनासारखे घडल्याशिवाय थांबत नाहीत मग समोर कोणीही असला तरी ते यशस्वी प्रतिवाद करतात. लोकांना ते खूप साधे वगैरे वाटतात; पण त्यांच्या साध्या चेहऱ्याआड एक हट्टी नेता आहे जो ‘मन की बात’ करवून घेतो. फडणवीस-अजितदादांना हा अनुभव बरेचदा येतो. हेही खरे आहे की फडणवीस-अजितदादांचे जेवढे सख्य आहे तेवढे ते शिंदे-अजितदादांचे आहे असे दिसत नाही. व्यवस्थित संसार सुरू असताना मध्येच सवत येऊन कडमडावी तसे काहीसे शिंदेंना दादांबद्दल वाटत असावे. शिंदे हे त्यांच्याविषयी जरा सावध असल्याचे जाणवत राहते. मात्र, दोघांमध्ये अजूनतरी काही फट वगैरे दिसत नाही.
- ती किंचितशी दिसेल तेव्हा त्या फटीचे आधी छिद्र अन् नंतर भगदाड कसे होईल याचा प्रयत्न माध्यमे सर्वात आधी करतील.