राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले. भारत आणि पाकिस्तानच्या परारष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चा येत्या शुक्रवारी होऊ घातली आहे. जर पठाणकोट हवाई तळावर घातपाती हल्ला झाला नसता आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे भारत सरकारच्या हाती लागले नसते तर काही प्रश्न नव्हता. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा झालीच असती. पण हा हल्ला झाला आणि सारी समीकरणे बदलून गेली. पण एक झाले, याआधी चर्चेपूर्वी असा काही हल्ला झाला की तत्काळ चर्चेचा कार्यक्रम भारताकरवी एकतर्फी रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले जात असे, यावेळी तसे झाले नाही. पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करण्याचे मान्य केले आणि अमेरिकेनेही पाकवर तसे दडपण आणले. भारताने केवळ इतकेच म्हटले की जे काही करायचे ते पंधरा तारखेपूर्वी करा. अजित डोवाल याना एका प्रसार माध्यमाने याच विषयावर छेडले असता ते म्हणाले की, ‘पाकिस्तानने कारवाई केली तरच आम्ही चर्चा करु’. त्यावर संबंधित माध्यमाने या विधानाचा श्लेष काढताना डोवाल यांनी चर्चा रद्द झाल्याचे जाहीर केले असे म्हटले. त्यावरतीच आचा डोवाल यांनी खुलासा करताना आधी तर आपण असे काही म्हटलेलेच नाही असे विधान केले आणि नंतर तर मुलाखतच दिल्याचे नाकारले. मुळात जे विधान केल्याचे डोवाल आजही नाकारीत नाहीत त्या विधानातच ‘जर तर’ची भाषा आहे. कारवाई केली तरच चर्चा करु असे म्हटले जाते तेव्हां कारवाई केली नाही तर चर्चा नाही असाच त्याचा सरळ अर्थ होतो. मुंबईवरील हल्ल्यासंबंधी सारे पुरावे दिले त्याला आठ वर्षे होत आली असताना अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नसताना केवळ आठवडाभरात पाकिस्तान काय कारवाई करणार आणि त्यातून भारताचे कसे समाधान होणार या वास्तवदर्शी तर्काच्या आधारे व खुद्द डोवाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रद्द केली जाणे हेच वास्तव उरते. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा एक सनदी किंवा गणवेशधारी नोकरशहा असतो. तो निर्णयकर्त्यांना सल्ला देतो किंवा देऊ शकतो पण स्वत: निर्णयकर्ता असत नाही. परिणामी माध्यमांपासून ‘समान दूरी’ हेच तत्त्व त्यांच्यासाठी योग्य ठरते. त्याला मुरड बसली व खुलासे करीत बसण्याची वेळ आली.
त्याचा अर्थ तोच की
By admin | Published: January 12, 2016 2:59 AM