पाकिस्तानात होऊ घातलेल्या सार्क देशांच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा भारताने आधीच जाहीर केलेला निर्णय व त्यास अफगाणिस्तान, बांगला देश आणि भूतान यांनी अनुकरणासह दिलेला पाठिंबा आणि आता ही परिषदच गुंडाळून ठेवण्याबाबत जाहीर झालेली घोषणा म्हणजे पाकिस्तानला जगापासून पूर्णपणे वेगळे पाडण्याचे जे धोरणात्मक लक्ष्य भारत सरकारने नजरेसमोर ठेवले आहे त्याच्या दिशेने पडलेले एक अत्यंत समयोचित आणि यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. सिंधू पाणी वाटप कराराचा फेरआढावा घेण्याच्या भारताच्या निर्णयानेदेखील पाकची पळापळ सुरू झाल्याने ती मात्रा देखील लागू पडते आहे असे दिसते़ याच सुमारास भारताचे धीराचे आणि संयमाचे धोरण म्हणजे त्याचा कमकुवतपणा नव्हे, ही बाब पाकिस्तानने नीट जाणून घ्यावी असा सल्ला अमेरिकी माध्यमांनी पाकी सत्ताधीशांना दिला आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात युद्धाला तोंड न फोडता पाकिस्तानला धडा शिकविण्याची जी मुत्सद्देगिरी दाखविली जात आहे आणि त्याद्वारे ज्या वास्तव राजधर्माचे पालन केले जात आहे, तो एकप्रकारचा काव्यगत न्यायच म्हणाला लागेल. कारण जेव्हां गुजरात राज्य पेटून उठले होते व सरकारचे अस्तित्वच जाणवू नये अशी अराजकसदृश स्थिती निर्माण झाली होती, तेव्हां तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे तेव्हांचे मुख्यमंत्री व आजचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना नेमकी राजधर्माचीच आठवण करुन दिली होती. पण वाजपेयींचा सल्ला जुमानला गेला नाही. आज इतक्या वर्षांनी तो आठवत असेल आणि त्याचे पालन करावेसे वाटत असेल तर तेही काही वाईट नाही. ज्या वाजपेयींनी मोदींना राजधर्म आठवण्यास सांगितले होते त्याच वाजपेयींचे एक प्रसिद्ध विधान होते, ‘आपण आपला मित्र निवडू शकतो, शेजारी नव्हे’! पाकिस्तान नावाचा हा शेजारी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्या क्षणापासून लागलेली डोकेदुखी आहे आणि ती सतत वाढतच चालली आहे. स्वातंत्र्याची सात दशके आता पूर्ण होण्याच्या बेतात आहेत आणि या काळात अनेक मातब्बर नेते देशाचे नेतृत्व करुन गेले पण त्यापैकी कोणालाही या डोकेदुखीचा कायमचा बंदोबस्त करता आला नाही. त्याचे महत्वाचे कारण राजधर्माचे पालन. या पालनात केवळ द्विपक्षीय विचार करण्याची कोणालाच परवानगी नसते. सर्व बाजंूचा आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्यातील बारकावे यांचा विचार करुनच योग्य तो निर्णय घेणे एकप्रकारे बंधनकारक असते. पण ज्यांच्यावर या राजधर्माच्या पालनाची जबाबदारी नसते, ते मात्र केव्हांही आणि कुठेही मनाजोगती विधाने करण्यास मुक्त असतात. देशातील जनतेने नरेन्द्र मोदी यांच्या हाती राज्यशकट सोपविण्यापूर्वी त्यांची स्थिती अशीच होती. जनसामान्यांना आक्रमकता अत्यंत प्रिय असल्याने मोदी पाकिस्तानला बेचिराख वगैरे करण्याची भाषा करीत होते, त्यावेळी त्यांना राज्यकर्त्याचा धर्म आणि अ-राज्यकर्त्याचा धर्म ज्ञात नव्हता असे नव्हे पण आपल्या आक्रमकतेवर लोक फिदा आहेत हे तेव्हां त्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाचे व पुरेसे होते. पण सुपातले जात्यात जातात तेव्हां नेमके काय होते याचा प्रत्यय आता तेच मोदी आणून देत आहेत. पाकिस्तानने भारताच्या खोड्या काढणे जराही थांबवलेले नाही. उलट त्यात वाढ होत चालली आहे. निष्पाप नागरिकांबरोबरच आता त्यांनी थेट सुरक्षा दले आणि भारतीय लष्करावर वारंवार वार करणे सुरु केले आहे व तितकेच नव्हे तर पाकिस्तानवर हल्ला करण्याची भारताची हिंमत नाही; चुकून भारताने तसा विचार केला तर तो नष्टच होईल अशी चिथावणीखोर आणि भारतीय नेत्यांच्या पुरुषार्थाला थेट आव्हान देणारी भाषाही करायला सुरु केली आहे. पण भारत आणि खरे तर पंतप्रधान मोदी स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत शिरले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आम सभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी जे भाषण केले त्यात पाकिस्तानचे थेट नाव न घेता त्यांनी जे सांगायचे होते, ते सांगितलेच होते. अर्थात स्वराज यांनी पाकचे नाव न घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाने टीका केली असली तरी ती करण्यामागील कारण म्हणजे जेव्हां काँग्रेस सत्तेत होती तेव्हां हेच मोदी आणि त्यांचा गणगोत काँग्रेस सरकारवर अशाच प्रकारची टीका करीत असत. पण तेव्हां आपण जे करीत होतो ते चुकीचे होते, याची जाण विद्यमान पंतप्रधानांना झाली असेल तर तेही देशाच्या व व्यक्तिश: त्यांच्या दृष्टीने चांगलेच आहे. उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी सेनेने पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला करुन एकोणीस जवानांचा घास घेतल्यानंतर स्वत: मोदी यांनी ज्या काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातील एक अत्यंत सूचक होती, लष्कराच्या बंदुकीची गोळी बोलत नसते! खरे आहे ते. पण आधुनिक जगात केवळ लष्कराची बंदुकच नव्हे तर राज्यकर्त्याची भूमिकाही बोलत नसते, ती थेट कृतीत उतरत असते! अशा कृतीचा प्रत्यय येणे म्हणजेच योग्य दिशेने योग्य पाऊल पडणे.
आठवावा तो राजधर्म!
By admin | Published: September 29, 2016 4:23 AM