एखादी दुर्घटना घडून गेली की, साऱ्यांनी एका सुरात हळहळ व्यक्त करायची, सरकारने संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करतानाच चौकशी समिती नियुक्त करायची, समस्त राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुर्घटनास्थळी रांग लावायची आणि हळूचकन मग सगळ्यांनीच झाले गेले विसरुन जायचे. आजवर हेच आणि असेच होत आले आहे आणि त्यामुळे गेल्या सोमवारी सायंकाळी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे जी भीषण दुर्घटना घडली तिच्याबाबतीत यापेक्षा फार काही वेगळे होईल असे नाही. तेथील एका खासगी विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात भीषण आग लागली आणि आगीत २१ जण मरण पावले तर शंभरहून अधिक जखमी झाले. यातील अधिक गंभीर बाब म्हणजे ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागली. अशा विभागात जे रुग्ण दाखल केले जातात त्यांची अवस्था आधीच बिकट असल्याने स्वत:चा जीव वाचविणे त्यांच्या दृष्टीने अशक्यच असते. रितीप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठाचे मालक मनोज नायक लगबगीने फरार झाले आणि चार दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांसमोर हजर झाले. दुर्घटनेचे वृत्त समजताक्षणी त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हजर झाले आणि त्यांनी नेहमीचे सोपस्कार पूर्ण केले. केन्द्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनीही दुर्घटना रुग्णालयास भेट दिली आणि इतकेच नव्हे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या गंभीर प्रकाराची आपणहून दखल घेतली. त्यानंतर जे काही सोपस्कार सुरु झाले त्यातून जे जळजळीत वास्तव समोर आले, ते म्हणजे ओडिशा राज्यातील तब्बल ५६८ रुग्णालयांपैकी अवघ्या तीन रुग्णालयांनी अग्नीप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि त्यांच्याकडे तसा दाखलाही उपलब्ध आहे. मानवाधिकार आयोगानेच ही बाब जगासमोर मांडली आहे. आरोग्यमंत्री नड्डा यांनीदेखील आता सर्वच राज्यांमधील रुग्णालयांना नव्याने आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या जातील असे जाहीर केले आहे. मुळात त्याची गरजच काय? इमारतीत रुग्णालय असो की एखादे कार्यालय, जिथे एकाचवेळी अनेक लोकांचा राबता असतो तिथे आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे आणि तरीही आग लागलीच तर बचाव यंत्रणा सक्षम असणे या अगदी सामान्य बाबी झाल्या. त्या सर्वांनी पाळणे अपेक्षित असते. पण तसे होते आहे अथवा नाही हे पाहाण्याची ज्यांची जबाबदारी असते त्यांचा कामचुकारपणा वा भ्रष्टाचारच दुर्घटनांना आमंत्रण देत असतो. ओडिशा हे महाराष्ट्राच्या तुलनेत एक अविकसित राज्य आहे म्हणून तिथे असे होऊ शकते हा युक्तिवाददेखील अत्यंत फोल असून उद्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर मुंबई-नागपूर वा पुणे शहरातील रुग्णालयांची अचानक तपासणी केली गेली तर भुवनेश्वर शहरात जे आढळून आले, त्यापेक्षा वेगळे काही आढळून येईल असे नाही. एरवी सारे लोक सरकारी रुग्णालयांच्या गलथानपणावर टीका करीत असतात व ती रास्तदेखील असते पण खासगी रुग्णालयेदेखील फार काही वेगळी नसतात हेच यातून दिसून आले आहे. राजधानी दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात भीषण आग लागली होती त्यानंतरही सरकारने आगीपासून बचाव करण्याच्या काटेकोर आणि कठोर सूचना दिल्याच होत्या म्हणतात!
हे नेहमीचंच झालं
By admin | Published: October 21, 2016 2:46 AM