रस्त्याकडेच्या खड्ड्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी व्याकूळ होणारी त्याची आई किंवा जंगलातल्या खड्ड्यात पडलेल्या पिल्लाची सुटका करण्यासाठी वेडावलेला हत्तींचा कळप, इतकेच कशाला, वन्य श्वापदांची तितकीच भीती असतानाही हरणाच्या पाडसाची सुटका करण्यासाठी जीव धोक्यात घालणारे मुके प्राणी!... अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की माणसाइतका मेंदू विकसित झालेला नसताना, भावनांचे कल्लोळ तितकेसे उचंबळणारे नसतानाही पोटच्या गोळ्यासाठी, काळजाच्या तुकड्यासाठी प्राणीही जिवाचा आकांत करतात. ...अन् इकडे सर्व सजीवांमध्ये हुशार समजणारा माणूस मात्र चौदा वर्षाची गोड मुलगी, तिच्या पाठीवर जगात आलेला तिचा धाकटा भाऊ, जिच्यासोबत प्रेमविवाह केला व सात जन्म निभावण्याच्या आणाभाका घेतल्या अशी जीवनसंगिनी, तिची आई व बहीण अशा सगळ्यांची एकापाठोपाठ एक अशा हत्या करतो. नंतर उपरती नव्हे तर परिणामांच्या भीतीने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करतो.
नागपुरात सोमवारी घडलेल्या या नृशंस हत्याकांडाने आपल्या सर्वांसमोर प्रश्न उभा केला आहे, की अशा घटनांवेळी संबंधिताला खरेच पशूची तरी उपमा देता येईल का? हे असे करणारा आलोक ऊर्फ चंदू माटूरकर म्हणायला माणूस असला तरी रविवारच्या रात्री त्याच्या अंगात सैतान संचारला होता. माणसाचा राग काही मिनिटे, फारतर अर्धा-एक तास टिकतो. त्यानंतर तो भानावर येतो. डोके शांत होते. पण, चंदूच्या रूपातल्या सैतानाच्या डोळ्यात संपूर्ण रात्रभर रक्त उतरले होते. अवघ्या दोनशे फूट अंतरावरच्या दोन घरांमध्ये मिळून त्याने पाच जणांचे जीव घेतले. मध्यरात्री साडेअकरा-बारापासून पहाटे पाचपर्यंत तो एकामागून एक हत्या करीत राहिला.
कोवळ्या पोरीच्या डोक्यावर हातोड्याचा जीवघेणा घाव करताना, तोंडावर उशी दाबून पाेराचा तडफडून जीव घेताना, पत्नी, मेहुणी व सासूचा गळा चिरताना त्याच्यातला माणूस जणू मरण पावला होता. अंगावर भीतीचे शहारे आणणाऱ्या या घटनेनंतर एकच प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर आहे, की असे कसे अकल्पित घडू शकते, असा कसा एखादा माणूस इतका निर्दयी बनू शकतो? प्रेम प्रकरण असो की अनैतिक संबंध, शरीराची भूक माणसाला इतके हिंस्र कशी बनवू शकते?- आता असे स्पष्ट होऊ लागले आहे, की वरवर सोज्वळ वाटणारा माटूरकर हे प्रत्यक्षात दुभंगलेले व्यक्तिमत्त्व होते. त्याचे कृत्य पूर्वनियोजित होते. त्याला पंधरा वर्षांचा संसार मोडून टाकायचा होता. त्याच्या वेलीवर उमललेली फुले चिरडून टाकायची होती.
मेहुणी त्याची होत नसेल तर कुणाचीच होऊ नये, हे नियोजन होते. सगळ्यांना संपवून टाकायचे होते. त्याने धारदार शस्त्रे मुलीच्या नावाने ऑनलाइन मागवली होती. काळीज गोठवून टाकणाऱ्या या नरसंहाराचा अनेक अंगांनी विचार करायला हवा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने, स्मार्टफोनसारख्या संपर्क साधनांनी माणसांच्या आयुष्यात जितकी सुखे आणली त्याहून कितीतरी प्रमाणात विकृती निर्माण करणाऱ्या पॉर्नसारख्या संधी आणल्या. त्यातूनच एक भयंकर प्रकारची लैंगिक विकृती जन्माला आली. एकदा अशी विकृती एखाद्याच्या अंगात व सुखी संसारात शिरली की ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दु:खालाच जन्म देते. घरोघरी मातीच्या चुली असतात. संसारात पती-पत्नीची भांडणे होतात, भांड्याला भांडे लागतेच. त्याची कारणे कधी आर्थिक असतात, कधी अन्य कुठली तरी. पण, भांडण झाल्यानंतर एकमेकांना सांभाळून घेणारी घरे, त्यातील माणसांना काहीसा पश्चात्ताप होतो. मुलांचे हसरे चेहरे पाहून पती-पत्नी माघार घेतात.
गोकुळ पुन्हा आनंदात न्हाऊ लागते. काही घटनांमध्ये रक्त सांडले तरी ते पाहून माणूस भानावर येतो. त्याला पश्चात्ताप होतो. आपल्या हातून हे काय आक्रित घडले असे वाटून तो कायद्याला व परिणामांना सामोरा जातो. नागपूरच्या घटनेतील माटूरकरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसली आणि त्याचा छोटासा गारमेंटचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे अडचणीत आला असला तरी केवळ गरिबीच्या वैफल्यातून रक्ताचा सडा टाकण्याइतका तो खचितच वाईट नव्हता. याचाच अर्थ आर्थिक विपन्नावस्था, गरिबी, नैराश्य वगैरे कारणे ही मुळात सबबी असतात. इतरांचा व स्वत:चा जीव घेणाऱ्याच्या माणुसकीची हत्या आधी झालेली असते. त्यामुळेच मन सुन्न करणाऱ्या अशा घटना घडतात. अशा प्रकारच्या घटना कधीतरी घडणाऱ्या असल्या तरी यातून घरोघरी बोध घ्यायला हवा. थोडेसे इकडेतिकडे होत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे. एकमेकांना जपायला हवे. नाती अन् संसार प्रेमाने फुलवायला हवेत.