सत्तेची हाव कधी संपत नाही. सत्ता हाती आली की प्रथम ती स्थिर करण्याचा, पुढे ती कायम करण्याचा आणि पूर्वीचा शब्द वापरायचा तर ती ‘यावश्चंद्र दिवाकरौ’ टिकवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात. आपल्याला विरोध करणारे पराभूत केल्यानंतर त्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यावर त्यांचा भर असतो. सत्तेला विरोध सहन होत नाही आणि तो उघडपणे करणारे तर तिला डोळ्यासमोरही चालत नाहीत. देशात भाजपाला प्रथमच स्वबळावर बहुमत मिळाले आहे. हे बहुमत (३१ टक्क्यांचे) एकमेव मतामध्ये परिवर्तन करण्याचा त्या पक्षाचा आताचा प्रयत्न आहे. दिल्लीत राहून त्यांना डिवचणाऱ्या आप पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचेच त्याने बाकी ठेवले आहे. लालूप्रसादांच्या मागचे सुटलेले झेंगट त्याने पुन्हा त्यांच्या पाठीला लावले आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या निशाण्यावर आहेत. कर्नाटकच्या सिद्ध रामय्यांवर त्यांनी चौकशा लादल्या आहेत. मुलायमसिंहांना मूक केले आहे. भुजबळांना तुरुंगात डांबून समाधान न झालेल्या त्या पक्षाने एका पवारांवरही बाण रोखून ठेवला आहे. प्रत्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्डच्या गुंत्यात अडकवायला त्याने सुब्रमण्यम स्वामींना मोकळे सोडले आहे. त्यांचा आताचा भर काँग्रेसमधील ज्या नेत्यांची प्रतिमा चांगली व प्रतिष्ठेची आहे आणि ज्यांच्यात सरकारची कुलंगडी बाहेर काढण्याची क्षमता आहे त्यांना जमीनदोस्त करण्यावर आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे कुटुंब याविरुद्ध सरकारी खात्यांनी चालविलेल्या धाडी हा त्याच मालिकेतला ताजा भाग आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या खालोखाल अर्थशास्त्रज्ञ म्हणून नाव व ख्याती मिळविलेले चिदंबरम दर आठवड्याला एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात स्तंभ लिहितात व त्यात सरकारच्या अर्थशास्त्रीय व राजकीय चुकांचा हिशेब मांडतात. त्यांच्या शब्दाला जनतेत वजन आहे. तेवढे वजन एकटे मोदी वगळले तर त्यांच्या सरकारातील एकाही मंत्र्याला अद्याप मिळविता आले नाही. शिवाय चिदंबरम हे देशातले एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि अरुण जेटली वगैरेंशी त्यांचे संबंध मैत्रीचे आहेत. त्यांना नेस्तनाबूत करणे हे सरकारला राजकीयदृष्ट्या त्याचमुळे आवश्यकही वाटत असणार. गेले काही दिवस त्यांच्याविरुद्ध कांगावा करून झाल्यानंतर आता हे धाडसत्र त्यांच्यावर लादले जात आहे. एवढ्यावर हे थांबणारे नाही. प्रियंका गांधींच्या कुटुंबावरही या सरकारचा दात आहे. नितीशकुमार आणि नवीन पटनायक हेही त्याच्या डोळ्यात सलणारे नेते आहेत. या साऱ्यांचा एकेक करून निकाल लावण्याचा सरकारचा डाव साऱ्यांना दिसणारा आहे. मात्र त्यासाठी आपल्यातील स्पर्धा व विरोध काही काळ बाजूला ठेवून एकत्र यायला मन व मेंदू यांचे जे मोकळेपण असावे लागते त्याचा या साऱ्यातच अभाव आहे. मुळात नितीशकुमार व लालूप्रसाद ते मुलायम आणि ममता या साऱ्यांची मानसिकता त्यांनी दीर्घकाळ केलेल्या काँग्रेसविरोधात मुरली आहे. डॉ. लोहियांनी यातील अनेकांच्या मनात काँग्रेस व नेहरू यांचा द्वेष कुटून भरला आहे. लोहियांना जाऊन आता पाच दशके लोटली. नेहरूंच्या पश्चात देशात १३ नेते पंतप्रधानपदावर आले. देश बदलला, त्याचे राजकारण बदलले आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या राजकारणाचे रंगही वेगळे झाले. परंतु नेहरूद्वेषाचे ते विष अजून या मंडळीच्या मनात कायम आहे. त्यापायी त्यांचा सर्वात मोठा व नैसर्गिक म्हणावा असा भाजपा हा शत्रू पक्षही त्यांना जवळचा वाटावा असे त्यांचे आताचे विपरीत राजकारण आहे. ही स्थिती भाजपाच्या राजकारणाला अनुकूल आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची आपली प्रतिज्ञा त्याने कधीचीच जाहीर केली आहे. त्याच्या त्या प्रयत्नात या बारक्या व कधीही चिरडून टाकता येतील अशा प्रादेशिक पक्षांचे व त्यांच्या पुढाऱ्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साहाय्य त्याला मिळत असेल तर ते त्याला स्वागतार्ह वाटणारेही आहे. एक गोष्ट मात्र राजकारणाच्या साध्या अभ्यासकांनी व ते प्रत्यक्ष करणाऱ्यांनीही लक्षात घ्यावी अशी आहे. काँग्रेस पक्ष व त्याचे नेते आज जात्यात असतील तर ते सुपात आहेत. ज्यांना काँग्रेसला जमीनदोस्त करता येते ते या पक्षांचे काही क्षणांत वाटोळे करू शकतात. केजरीवाल, अखिलेश, मुलायम ही त्या राजकारणाची ताजी उदाहरणे आहेत. त्यांनी मणिपूर बहुमतावाचून गिळंकृत केले आणि गोव्यातही ती किमया केली. अरुणाचल हा तशा राजकारणाचा सर्वात काळा म्हणावा असा डाग आहे. सारा देश संघमय करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नाआड येणारे सारेच उद्या असे भरडून निघणार आहेत. हे सारे प्रत्यक्ष दिसत असतानाही देशातील प्रादेशिक व अन्य पक्षांच्या पुढाऱ्यांना एकत्र येण्याची बुद्धी होत नसेल तर त्यांचा शेवट जवळ आहे एवढेच येथे बजावायचे. त्यांच्या आपसातील दुराव्यांना आणि क्षुद्र भांडणांना जनताही गेल्या तीन वर्षात कंटाळली आहे एवढे तरी त्यांनी लक्षात घ्यायचे की नाही? राजकारण हा केवळ शक्तीच्या स्पर्धेचा व त्यातील विजयाचाच खेळ नाही. तो उभे राहण्याचा व त्यासाठी लागणारी क्षमता टिकवून ती वाढवीत नेण्याचाही खेळ आहे हे ज्यांना कळत नाही त्यांना पुढारी तरी कसे म्हणायचे असते? आपल्या शेवटाला निमंत्रण देण्याचे या पक्षांचे डोहाळे त्यांचा जीव घेणारे आहेत एवढे तरी त्यांना समजावे की नाही?
ते जात्यात, हे सुपात !
By admin | Published: May 17, 2017 4:32 AM