- श्रीनिवास नागे, वृत्तसंपादकलोकमत, सांगलीदीड वर्षापासून कोरोनानं धास्ती वाढवली अन् घराघरांत आयुर्वेदिक काढे उकळू लागले. त्या काढ्यांमध्ये मसाले, आयुर्वेदिक वनस्पतींसोबत गुळाचा वापरही वाढला. चहाच्या ठेल्यांवरही गुळाच्या चहाचे बोर्ड झळकू लागले. गुळाचा भाव वधारला. बाजारपेठेतली उलाढाल वाढली, पण या ढेपेला भेसळीचा मुंगळा डसू लागला!
आरोग्यदायी गुळातही सर्रास भेसळ होऊ लागल्यानं कारवाईचा दणका बसू लागला. दराच्या हव्यासानं भेसळीचा आधार घेऊन गूळ बनवणारा उत्पादक कारवाईतून सुटला अन् त्यात व्यापारी अडकू लागला. खरं तर व्यापाऱ्याकडं येणारा गूळ असतो घन स्वरूपातला. त्याला त्यात भेसळ करताच येत नाही, पण गुन्हे दाखल होण्याचा दट्ट्या लागला. व्यापारी वैतागले. जाचक कायद्याला विरोध करण्यासाठी सांगलीत नुकतीच गूळ व्यापारी परिषद झाली. व्यापाऱ्यांनी शरद पवारांनाही साकडं घातलं. त्यानंतर समिती नेमण्यात आली. समितीनं सकारात्मक अहवाल दिलाय. त्या अहवालानुसार व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, असा दिलासादायक निर्णय होतोय.
पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामुळं गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ सांगली-कोल्हापुरात उभी राहिली. रंग, दर्जा, टिकाऊपणासाठी इथला गूळ नावाजला जाऊ लागला. गुळाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होऊ लागले. इथला गूळ देशभर जातो. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, गोडधोड बनविण्यासाठी भारतात गूळच वापरला जात होता. आजही कित्येक स्वयंपाकघरात गुळाच्या खड्याशिवाय रांधलं जात नाही. कोल्हापूरची गूळ बाजारपेठ दिवाळीनंतर चार-पाच महिनेच चालते. तिथं येणारा बहुतांशी गूळ त्याच जिल्ह्यात तयार होतो. सांगलीची बाजारपेठ मात्र वर्षभर चालते, पण तिथं येणारा सगळा गूळ शेजारच्या कर्नाटकातला. इथला केवळ एक टक्काच. सांगलीच्या बाजारपेठेत वर्षभरात तीस किलोंच्या २५ लाख रव्यांची (ढेप) म्हणजे साडेआठ लाख क्विंटलची आवक होते, तर कोल्हापुरातली आवक घटून २० ते २२ लाख ढेपांवर आलीय. उसाचा रस उष्णतेनं आटवून तयार केलेला लालसर-पिवळ्या रंगाचा घट्ट पदार्थ म्हणजे गूळ. जिथं तो तयार होतो, ते ‘गुऱ्हाळ’. उसाचा रस गाळलेली काहील चुलाणावर ठेवून उकळतात. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळं गुळाच्या ढेपेला साच्याचा आकार येतो. हे काम तसं कौशल्याचं. गूळ बनवणारा ‘गुळव्या’ अन् जाळ घालणारा ‘जळव्या’ हे गुऱ्हाळावरचे महत्त्वाचे कामगार. कोल्हापूर जिल्हा, साताऱ्याचा कऱ्हाड परिसर, लातूर जिल्हा अन् पुण्यातल्या दौंड-बारामती परिसरासह दक्षिण-उत्तर कर्नाटकात गुळाचं उत्पादन होतं. बाजारात मिळणाऱ्या पिवळ्या गुळात काॅस्टिक सोडा, ऑक्झॅलिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, ह्याद्रोस पावडर, बेन्झीन ही रसायनं घातली जातात. या पिवळ्याधम्मक गुळापेक्षा आकर्षक न दिसणाऱ्या लालसर-चॉकलेटी सेंद्रिय गुळानं ग्राहकांना भुरळ घातलीय. सेंद्रिय गुळातही दोन प्रकार दिसतात. रासायनिक घटक वापरून केलेल्या शेतीतून उत्पादित झालेल्या उसाचा रसायने न वापरता केलेला गूळही सेंद्रिय म्हणून विकला जातो, तर नैसर्गिक ऊसशेतीतून आलेल्या उसापासून नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला गूळ अस्सल सेंद्रिय मानला जातो. तो बनवताना केवळ रानभेंडी अन् चुन्याचा वापर केला जातो.
गुळात सर्वाधिक भेसळ होते, ती साखरेची! साखर स्वस्त, तर उत्पादन खर्च जादा असल्यानं गूळ महाग! त्यामुळं त्यात बेमालूमपणे साखर मिसळली जाते. दोन्हीत सुक्रोज आणि ग्लुकोजचं प्रमाण सारखंच असल्यानं कोणत्याही प्रयोगशाळेत ही भेसळ ओळखता येत नाही. शिवाय मूळचा रंग घालवून तो आकर्षक दिसण्यासाठी रंग अन् गंधकाचा वापर केला जातो. मुबलक उसामुळं कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर्वी गावागावांत गुऱ्हाळं दिसत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र उसाला जादा दर मिळत असल्यानं उत्पादकांचा साखर कारखान्यांकडं ओढा वाढलाय. त्यातच गुळाचा उत्पादन खर्च वाढल्यानं पारंपरिक पद्धतीनं चालणारी गुऱ्हाळं बंद पडू लागली. पंचवीस वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात बाराशे गुऱ्हाळं होती, ती दोन-सव्वादोनशेवर आलीत. सांगली जिल्ह्यात तर उणीपुरी ११ गुऱ्हाळं शिल्लक राहिलीत. त्यामुळं उत्पादन अन् बाजारपेठेतली आवकही घटतेय. दराची स्पर्धा वाढली, त्यामुळं कोल्हापूरचे गूळ उत्पादक सांगली-कऱ्हाडकडं ढेपा पाठवू लागलेत. दुसरीकडं महाराष्ट्रातले जाचक कायदे, कर यामुळं सांगलीच्या पेठेला कर्नाटकातल्या महालिंगपूरच्या पेठेचं आव्हान उभं राहिलंय.