भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या जय नामे चिरंजिवांच्या कंपनीची श्रीमंती मोदींच्या तीन वर्षांच्या राजवटीत १६ हजार पटींनी (टक्क्यांनी नव्हे) वाढली आहे. मोदी म्हणतात ते अच्छे दिन अमित शाह यांच्या घरातूनच देशात अवतरले असल्याचे सांगणारी ही बाब आहे. आपले वैभव एवढ्या अल्पावधीत वाढवून घेण्याची जय शाह या अमितपुत्राची किमया त्याला अर्थशास्त्राचे नोबेल मिळवून देणारी आणि मोदींसह साºया भाजपला सुखावणारी आहे. ‘ना खाऊँगा न खाने दूँगा’ ही मोदींची प्रतिज्ञा खरी आहे असे मानले तर अमित शाहच्या मुलाने त्याची संपत्ती कायदेशीर मार्गानेच वाढविली असणार असे आपण समजले पाहिजे. सरकारचा आर्थिक अन्वेषण विभाग अलीकडे फारच कार्यक्षम आणि डोळस झाला आहे. जय शाह या अमितपुत्राने जर गैरमार्गाचा अवलंब केला असता तर तो या यंत्रणेच्या नजरेतून सुटला नसता. अडचण एवढीच, की जगातल्या कोणत्याही मोठ्या व बड्या कंपनीचा कारभार कायदेशीर किंवा बेकायदेशीर अशा कोणत्याही मार्गाने झाला तरी तिची संपत्ती तीन वर्षात १६ हजार पटींनी वाढत नाही. त्यामुळे अमित शाह हे चमत्कारी पुरुष असल्याचे व त्यांचे चिरंजीव जय शाह हे किमयागार असल्याचे आपण मान्य केले पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची घनिष्ठता लक्षात घेतली तर त्या बापलेकाचे हे चमत्कार मोदींना ठाऊक नसतील असे समजणे हा त्यांच्या सर्वसाक्षीत्वाविषयीचा संशय घेणारा अपराध ठरेल. तात्पर्य, अरुण शौरींनी या देशावर अडीच माणसांचे राज्य आहे असे जे म्हटले ते खरे असावे. मोदी आणि जेटली हे त्यातले दोन तर शाह हे अर्धे असावे आणि त्यांचे अपुरेपण त्यांच्या चिरंजीवांनी १६ हजार पटींच्या त्यांच्या मालमत्तेच्या वाढीने पूर्ण केले असावे. यावर मोदी बोलत नाहीत, अरुण जेटली गप्प आहेत. जय शाह यांच्या मालमत्तेच्या समर्थनाची जबाबदारी पीयूष गोयल या कनिष्ठ मंत्र्याकडे त्यांनी सोपविली आहे. पक्ष दूर आहे आणि संघ? ती तर निव्वळ सांस्कृतिक संघटना आहे. मात्र मोदी संघाचे स्वयंसेवक आहेत. शाहही तेच आहेत आणि ते चिरंजीव? तेही संघाचेच असावे. बँका बुडत आहेत, मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघत आहेत, बाजार बसला आहे, जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत, चांगल्या दिवसांसाठी हे सारे सहन करण्याचा उपदेश मोदी आणि जेटली देशाला करीत आहेत. त्याचवेळी शाह पितापुत्र त्यांची संपत्ती अंतरिक्ष यानाच्या वेगाने वाढवीत आहेत. नोटाबंदीत बेपत्ता झालेल्या रकमा शाह पुत्रापर्यंत गेल्या असाव्या हा राहुल गांधींचा संशय खरा नसावा. यात काही काळेबेरे आहे हा कपिल सिब्बलांचा दावाही राजकीय असावा. कारण मोदींची प्रतिज्ञाच ‘स्वच्छ पक्ष व स्वच्छ देश’ ही आहे आणि त्यांच्यासकट त्यांच्या पक्षावर संघाचा सुसंस्कृत प्रभाव आहे. वाजपेयींच्या काळात अशा गोष्टी निघून गेल्या. बंगारू लक्ष्मण हे तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष संघाचे नापास स्वयंसेवक ठरले होते. तेव्हाच्या सरकारातील डागाळलेले मंत्रीही थोडेफार कपडे झटकून मोकळे झाले होते. मोदींचा बंदोबस्त मात्र पूर्ण आहे. ते कुणाला काही खाऊ देत असतील असे मानणे हे धार्मिकदृष्ट्या पाप ठरणारे आहे. अमित शाह धर्मपुरुष आहेत. गुजरातमधील दंगलीत त्यांनी त्यांची धर्मनिष्ठा रक्त सांडून व खून, अपहरण, खंडणीखोरी आणि सामूहिक हत्याकांडांचे आरोप जिरवून सिद्ध केली आहे. अशा माणसाचा संशय घेणे हा ईश्वरी अपराध ठरण्याचीच शक्यता मोठी आहे. त्याचमुळे ‘तुम्ही तसे आरोप करू नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावर शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा लावावा लागेल’ अशी भगवी धमकी पीयूष गोयल यांनी सगळ््या टीकाकारांसह देशाला ऐकविली आहे.
जय ‘जय अमित शाह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:45 AM