विश्वाचे चलन वलन चालवणारी, डोळ्यांना न दिसणारी, पण कार्यरूपाने प्रकटणारी, अशा शक्तीला देवीचे, मूळमायेचे, आदिमायेचे रूप देऊन नवरात्रात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात आपल्या पूर्ण देशात उत्साहाने पूजिले जाते. अग्नी आणि त्याची दाहक शक्ती जशी एकरूप असते तसेच परब्रह्म आणि प्रकृती (शक्ती) एकरूपच असतात. देवी भागवत, देवी उपनिषद, देवी पुराण, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजेच दुर्गासप्तशती यातून समाजाच्या सर्व स्तरांसाठी देवीपूजा सांगितली आहे. देवी महात्म्यात तर म्हटले आहे की जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्यात देवीचेच रूप आहे. अग्निवर्णा, तप:तेजाने आणि सूर्यशक्तीने तेजस्वी दिसणारी, कर्मफळ देणारी असे ऋग्वेदातील श्रीसूक्तात तिचे वर्णन आहे.भगवान नारायणांनी गणेशजननी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, राधा या पाच देवींचा प्रकृती म्हणून नारदांना परिचय करून दिला आहे. शक्तीप्रकृतीच्या उल्लेखानेच देवी भागवत सुरू होते. महालक्ष्मी, दुर्गा, जगदंबा, सरस्वती, सावित्री, गायत्री, रेणुका, अंबा, शारदा ही सारी या देवीचीच भिन्न नावे व रूपे आहेत. विश्वातील मातृरूप चैतन्यशक्ती समान रूपात सर्वत्र असते. त्यामुळे स्त्री पुरुष भक्तांकडून समानतेची, अभेदाची अपेक्षा केली जाते. विश्वातील सर्व जीव ही तिची मुले आहेत. हीच तिची मूल्यवान संपत्ती आहे. सर्व जीवांमधील स्पंदनांची उत्पत्ती या आदिमायेमुळेच होत असते.शारदा हे या देवीचेच वाणीरूप. रामदासस्वामींनी शारदास्तवनासाठी दासबोधात एक स्वतंत्र समास लिहिला आहे. ज्ञानदेवांनी ‘अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी’ म्हणून तिला वंदन केले आहे. शंकराचार्यांनी तिच्यावर स्तोत्र लिहिले आहे. या शब्दशक्तीत विश्वाचे प्राण आहेत आणि या प्राणशक्तीविना सारे विश्व मृतवत् होईल, याची जाण या साऱ्यांना आहे. साऱ्या विद्या, कला, प्रतिभा, कल्पना आणि बुद्धी ही तिचीच रूपे आहेत. त्यामुळे अमृतानुभवात ‘बाप उपेगी वस्तू शब्दू’ असे म्हटले आहे. ‘शब्दचि आमुच्या जिवीचे साधन’ असे संत तुकाराम मोठ्या गौरवाने म्हणतात. प्रत्येक शरीरातील आत्मा जसा त्या असीम परमतत्त्वाचा एक भाग तसेच घटातील आकाश त्या असीम, अमर्याद आकाशाचा अंश. पिढ्यान् पिढ्या जीवांचे जतन करणारी ही सृजनशक्ती, तिच्या गौरवासाठी गरबा. विश्वव्यवहार, विश्वगती अविरत चालू ठेवणारी ही शक्ती आपण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली म्हणून पूजितो. पाणी, वायू, सूर्य, पृथ्वी साऱ्यांना गतिशील ठेवणाऱ्या देवतेला, सर्व स्तरातून ‘कीर्ति: श्री:, वाक्, स्मृतिर्मेधा, धृति: क्षमा’ (गीता १०.३४) हे स्त्रीतले सुप्त गुण जागवण्यासाठी (जागरता), आदिमायेकडे मागितलेला हा जोगवा आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे
आदिमायेचा जागर
By admin | Published: October 08, 2016 4:00 AM