- सुधीर महाजन, संपादकलोकमत, औरंगाबाद
शरद जोशी हे हिंदीतील प्रख्यात व्यंग लेखक, त्यांनी व्यंग लेखनातून भल्याभल्यांची भंबेरी उडविली, यावर्षी ऐन दिवाळीत त्यांची आठवण येण्याचे प्रयोजन म्हणजे आपले ‘जयसिंग काका’ ऊर्फ माजी मंत्री, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड. शरद जोशींच्या कथांवर आधारित लापतागंज या हिंदी मालिकेतील ललूजी पीडब्ल्यूडीवाले या पात्रासारखी काकांची अवस्था झाली. कोणी काहीही विचारले तरी ‘हमे तो किसीने पुंछा ही नही,’ हे एकच वाक्य ते बोलत. पदवीधर निवडणुकीच्या माहौलमध्ये काकांची अवस्था लल्लनजीपेक्षा वेगळी नाही. दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे आमदार, युतीच्या काळात राज्यमंत्रिपद आणि पुढे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीशी घरोबा, खासदारकी आणि पुन्हा काडीमोड घेत भाजपशी पाट लावलेले काका पुन्हा एकदा राष्ट्रवादीत दाखल झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंचे हे सोबती. काही काळ संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. महाजन-मुंडे यांच्या समवेत वसंतराव भागवतांनी काकांवरही संस्कार केले होते. भाजपच्या उदयाच्या काळात मुंडे-महाजनांसमवेत काका दिसायचे, पुढे त्यांना पदवीधरमधून संधी मिळाली. कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्रात युतीचे सरकार आले आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. प्रमोद महाजनांचे नेतृत्व राष्ट्रीय राजकारणात तळपायला लागले; पण जयसिंग काका मात्र वळचणीलाच पडले होते. युतीचे सरकार येऊनही मुंडे-महाजनांना मैतर धर्माचा विसर पडला, म्हणून ते संतप्त झाले. गोपीनाथ मुंडेंच्या बंगल्यावर त्यांनी या आपल्या मित्रांशी जोरदार भांडण केल्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. पुढे त्यांना युतीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले. युती सरकारनंतर ते दुसऱ्यांदा पदवीधर मतदारसंघात विजयी झाले होते; दोन वेळा भाजपचे खासदार आणि एकदा राज्यमंत्रिपद मिळूनही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयसिंगकाकांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरे तर हाच संघ आणि भाजपला धक्का होता. त्यांनी बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकले; पण राष्ट्रवादीतही त्यांची उपेक्षा झाली. पुढे ते पुन्हा भाजपवासी झाले. त्यांचा राजकीय प्रवास येथेच खऱ्या अर्थाने थांबला, कारण भाजपमधील त्यांची प्रतिमा पूर्वीच भंगली होती. त्याहीपेक्षा भाजप बदलत होता. महाजनांचा मृत्यू झाला होता. मुंडेंचा प्रभाव पूर्वीसारखा उरला नव्हता आणि पुढे तर मुंडेंचे अचानक निधन झाले. जयसिंगरावांच्या राजकीय प्रवासाला कायमची खीळ बसली. वास्तविक जयसिंग गायकवाडांची राजकीय वाढच मुंडे-महाजनांच्या छत्रछायेत झाली होती. ही सावली आक्रसली तसे त्यांना उन्हाचे चटके बसायला लागले आणि त्यांचा राजकीय विजनवास सुरू झाला. गेल्यावर्षीही त्यांनी विधानसभेसाठी आपले नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
पंधरा दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच, त्यांनी लढण्याची तयारी करीत उमेदवारी जाहीर केली. भाजपने शिरीष बोराळकरांना उमेदवारी दिली; पण जयसिंगरावांच्या उमेदवारीची साधी दखलसुद्धा घेतली नाही. एकाकी पडलेल्या काकांचा राष्ट्रवादीने भाजपविरोधात प्यादे म्हणून वापर करण्याची संधी मिळवत त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा आणले. आपल्या उमेदवारीची भाजपने दखल घेतली नाही; पण येथेही त्यांच्या प्रवेशाचे फारसे कौतुक दिसत नाही. त्यांचा राष्ट्रवादीला किती फायदा होतो, हे कळेलच.
सासुरवाडीत दुसरी पिढी कर्ती झाली की, आपले जावईपण संपते. कारण नव्या पिढीचे जावई आलेले असतात. हे जयसिंग काका विसरले. आजचा भाजप हा मोदी-फडणवीसांचा आहे आणि मुंडे-महाजनांची प्रभावळ अस्तंगत झाली, हे भान सुटले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका प्याद्यापेक्षा वेगळी असणार नाही. म्हणूनच जयसिंगकाका तुम्हारा चुक्याच !