आपल्याकडे संसदेचे किंवा विधानसभेचे कोणतेही अधिवेशन असले की, अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच्या सायंकाळी विरोधकांना चहापानाला बोलावण्याचा प्रघात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकणे हाही एक प्रघात आहे. हे दोन्ही प्रघात गेल्या कैक वर्षांपासून दोन्ही बाजूंनी इमानेइतबारे पाळले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार हेच लोकशाहीचे संकेत वगैरे असावेत, असा आपला समज होतो. परंतु तिकडे अमेरिकेत तसे नाही. जगातली सर्वांत प्रगल्भ वगैरे समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोकशाहीचे संकेत/शिष्टाचार/मूल्ये तंतोतंत पाळण्याचा प्रघात आहे.
लोकशाहीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अमेरिकेत सर्वच शिष्टाचाराला धरून असते. त्यामुळेच त्यात जरा जरी बदल झाला किंवा खंड पडला की गहजब होतो. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीच्या आगेमागे अशीच एक चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. त्याला कारण झाल्या मेलानिया ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी. अमेरिकेच्या या माजी फर्स्ट लेडी बाईंनी नव्या फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांना चहापानाला आमंत्रित केले नाही आणि एक संकेत मोडला.वस्तुत: आडदांड व्यक्तिमत्त्व असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील त्यांच्या गुलछबू वृत्तीमुळे सारेच जण त्रस्त झाले होते. ट्रम्प यांच्याविरोधातील रोष अखेरीस मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला आणि त्यांना व्हाइट हाउसमधून बाहेर पडण्याचा जनादेश दिला. आता या व्हाइट हाउसची आपली म्हणून काही एक परंपरा आहे. अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या या व्हाइट हाउसमध्ये जो कोणी नवा अध्यक्ष निवडून येतो त्याला मावळत्या अध्यक्षाने प्रेमाने, आग्रहाने चहापानाला आमंत्रित करायचे असते. शपथविधी सोहळ्याच्या आधी हा चहापानाचा कार्यक्रम व्हायला हवा, असे संकेत अमेरिकी लोकशाहीत आहेत. आणि या कार्यक्रमासाठी मावळत्या अध्यक्षांच्या पत्नीने पुढाकार घ्यावा, हाही एक अलिखित संकेत आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा संकेत पायदळी तुडवण्याचे काम मेलानिया ट्रम्प यांनी केले आहे. चहापानाबरोबरच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या पत्नीला व्हाइट हाउसच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील सर्व खोल्या दाखविण्याचे, तेथील सामानसुमानाची माहिती देण्याचे कामही मावळत्या अध्यक्षांच्या पत्नीनेच करणे अपेक्षित असते. या समारंभाला अमेरिकेत ‘ट्रॅडिशनल व्हाइट हाउस टी अँड टूर’ असे संबोधले जाते. मात्र, मेलानिया यांनी डॉ. जिल बायडेन यांना ना चहापानासाठी आमंत्रित केले, ना व्हाइट हाउस दाखविण्यासाठी. त्यांच्या या कृतीमुळे अमेरिकी माध्यमांनी मेलानिया यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांना सपत्नीक आमंत्रित करून त्यांना व्हाइट हाउसची सहल घडविण्याला एक परंपरा आहे. १९५० पासून प्रत्येक अध्यक्षाने या परंपरेचे पालन केले आहे. अगदी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर जहरी टीका केली तरी ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी हा शिष्टाचार सोडला नाही. त्यांनी मेलानिया यांना आग्रहाने चहाला बोलावले आणि व्हाइट हाउसमधील खोल्या दाखविल्या. परंतु मेलानिया यांना मात्र या परंपरेचे विस्मरण झाले. मावळत्या अध्यक्षांची पत्नी व्हाइट हाउस सोडताना एक छोटेखानी भाषण करते, त्यातही मेलानिया यांनी डॉ. जिल बायडेन यांचा उल्लेखही केलेला नाही. एकूणच भाषणात उल्लेख नाही. चहापानाचे आमंत्रण नाही आणि व्हाइट हाउसची सहलही नाही, असा नवनिर्वाचित अध्यक्षांच्या पत्नीचा जाहीर अपमान करण्याचे पातक मेलानिया यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठणे हे क्रमप्राप्तच आहे. आपल्या नवरोबाने व्हाइट हाउस सोडून जावे लागू नये म्हणून कॅपिटॉल हिलवर आक्रमण करण्यासाठी आपल्या भक्तांना चिथावले, याचेही या बाईंना काही सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते. अन्यथा आपल्या छोटेखानी भाषणात मेलानिया यांनी सौ. बायडेन यांचा उल्लेख करणे शिष्टाचाराला धरून होते. तशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच मेलानियांनी या अपेक्षाही फोल ठरविल्या. अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यापासून ट्रम्प दाम्पत्याचे बिनसले आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांना शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आमंत्रित करण्याच्या प्रघातालाही हरताळ फासला. चार वर्षांच्या कारकिर्दीत एवढे सारे लोकशाहीचे संकेत, प्रघात धाब्यावर बसविण्याचा विक्रम बहुधा ट्रम्प यांच्या नावावर जमा होणार आहे, हे नक्की.
मेलानिया यांची पळवाटअमेरिकेची चहापानाची परंपरा मेलानिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनीही मोडली; पण त्याऐवजी त्यांनी एक पळवाट शोधली. मेलानिया यांनी ट्विटरवर निरोपाचा एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात संदेश देताना त्यांनी म्हटलं आहे, आपण जे काही कराल, ते जिद्दीनं करा; पण नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही प्रश्नावर हिंसा हे उत्तर असू शकत नाही. ते न्याय्यही ठरणार नाही. अर्थातच अमेरिकेत नुकत्याच झालेल्या हिंसाचारासंदर्भात हे वक्तव्य होतं.