-राजा मानेवाढत्या उन्हाबरोबरच मराठी भूमीतील तापलेल्या राजकारणावर जिनिअस राजने जाणत्या राजाची स्नेहभेट घेऊन थंडगार सुखावह चर्चेचे तुषार शिंपडले. या तुषारांनी आपल्या इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर येमकेचे मात्र काम वाढविले. जिनिअस राज कुंचल्याच्या जगतात रममाण होत असल्याची साक्ष त्याच्या व्यंगचित्र मालिकेने मिळत असताना त्याला राजकारणातील महामॅनेजमेंट गुरू जाणत्या राजास का बरे भेटू वाटले ? या प्रश्नाभोवतीच इंद्रनगरीतून आपल्याला विचारणा होणार या खात्रीनेच येमके आधीच कामाला लागला... पण नारदांचा व्हॉटस्अॅप मेसेज आलाच... ‘मराठी भूमीत आंतरराष्टÑीय मॅनेजमेंट गुरू रामदेवबाबा वास्तव्यास आहेत. त्यांचा काही नवा फंडा?’ जिनिअस राज सोडून आता महागुरू नारदांना रामदेव बाबांचे काय पडले आहे, असा प्रश्न येमकेच्या मनात उभा राहिला. त्याने नारदांच्या मेसेजला उत्तर दिले, ‘राजचा रिपोर्ट बाबापेक्षा महत्त्वाचा आहे. तोच पाठवितो.’ येमकेच्या या उत्तरावर ‘शहाणपणा नको, सांगितले तेवढेच करा !’ असा खणखणीत मेसेज नारदांनी टाकला. मेसेजच्या फंदात न पडता येमकेने व्हॉटस्अॅप कॉलिंग केले आणि बोलता झाला... ‘महागुरू, माझे म्हणणे तरी ऐका...नारद- अरे, कसले म्हणणे?येमके- जिनिअसची मनसे आणि बाबांची पतंजली या दोन्ही कंपन्या एकाचवेळी सुरू झाल्या. त्यामुळे राज आणि बाबा या दोघांचाही रिपोर्ट पाठवू का?नारद- हो, ठाऊक आहे. २००६ साली पतंजलीने बाजारात पाऊल ठेवले आणि मनसेनेसुद्धा तेव्हाचाच मुहूर्त साधला होता.येमके- म्हणूनच... बाबांनी १२ वर्षात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांचे बारा वाजवत १२ हजार कोटींच्यावर आपली उलाढाल नेली. १२ वर्षात मनसे कंपनी मात्र खाली येत राहिली...नारद- ही जुनीच बातमी आहे. नवे काय?येमके- महागुरू, तिकडे सोलापूरनगरीत बाबांंनी आपल्या पर्यावरणपूरक टॉवेल व बेडशीटच्या नव्या ब्रँडची घोषणा केली तर इकडे जिनिअस राज जाणत्या राजांच्या कानाशी लागले. आहे की नाही गंमत...नारद- अरे कसली गंमत?येमके- अहो, योगविद्येत तर बाबा ग्लोबल महागुरू आहेतच पण आता त्यांना मल्टिनॅशनल व्यापार जगत ग्लोबल मॅनेजमेंटगुरू सुद्धा मानते, जाणता राजाही राजकारणातील सर्वपक्षीय मॅनेजमेंटगुरूच ना?नारद- ठीक आहे. दे तुझा रिपोर्ट.येमके- मुंबई-सोलापूर हवाई सफरीत सोलापूरच्या सुभाषबापूंनी बाबांचे कान फुंकले आणि जमिनीवर उतरताच बाबांनी टॉवेल-बेडशीटच्या ब्रँडची घोषणा केली. तिकडे मुंबानगरीत जाणत्या राजानेदेखील जिनिअस राजचे कान फुंकले... मग आता नवी घोषणा जिनिअस करतील की जाणता राजा?नारद- खरं आहे. व्यंगचित्राच्या नव्या विषयासाठी तर जिनिअस त्यांच्याकडे जाणार नाही हे नक्की! कधी उठतो, कधी झोपतो यावरचे सल्ले सुरुवातीलाच देऊन झालेत...येमके- मोदी ब्रँडचे मार्केटिंग हा चुकलेला फंडा जिनिअसच्या लक्षात आल्याने कमळाबाई-सेनेच्या विरोधात महाआघाडीचे राजेपद देण्याचा जाणता राजाचा मनसुबा नसेल ना?नारद- अगदी बरोब्बर... काँग्रेसला आणि जाणता राजाला मुंबईत गमविण्यासारखे काहीच नाही. मग राजेपद दिले तर बिघडणार...? -
जिनिअस राज अन् जाणता राजा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:11 AM