रोजगार हा आजचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आम्ही विकास आणि रोजगाराच्या कितीही वल्गना करीत असलो तरी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे. केंद्र असो वा राज्य सरकार रोजगार वाढीच्या दिशेने फारसे काही करू शकलेले नाही हे त्यामागील मुख्य कारण समजले जात असले तरी रोजगारक्षम कौशल्याचा अभावसुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. जगातील एका नामवंत कंपनीने केलेल्या व्यापक सर्वेक्षणात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे वास्तव समोर आले होते. भारताचा विचार केल्यास ४८ टक्के कंपन्यांना ही अडचण जाणवते आहे. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर स्कील डेव्हलपमेंटचा अहवालही अत्यंत बोलका आहे. आपल्या देशातील शिक्षित बेरोजगारांपैकी ३४ टक्के बेरोजगार हे रोजगारास पात्रच नसतात, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. ही परिस्थिती बदलत बेरोजगारीच्या समस्येवर मात करायची असेल तर रोजगाराभिमुख कौशल्याधारित शिक्षण चांगला पर्याय ठरू शकतो. त्या अनुषंगाने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नागपुरात बोलताना विद्यापीठांना दिलेला सल्ला मोलाचा आहे. स्थानिक तरुणांना लाभदायी ठरतील असे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार केले पाहिजेत, असे मत मांडतानाच वर्षानुवर्ष विद्यापीठांमधील अभ्यासक्रम अद्ययावत होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज आपली विद्यापीठे म्हणजे पदवीधर बेकारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पदवीधर तर होतात पण त्यांना रोजगार मिळत नाहीत. कुठल्याही क्षेत्राचा विकास होत असताना तेथील लोकांना नोकºयांच्या संधी मिळायला हव्यात आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तातडीने अभ्यासक्रम बदलले पाहिजेत. आनंदाची बाब अशी की त्यांच्या या आवाहनाला नागपूर विद्यापीठाने लागलीच प्रतिसाद देत १०० नवीन अभ्यासक्रमांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. विशेष म्हणजे मनुष्यबळ पुरविण्याकरिता विद्यापीठातर्फे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेतले जाणार आहे. भंडाºयात तांदूळ प्रक्रिया, गोंदियात वन्यजीव संवर्धन, वर्धेत खादी उद्योगासाठी पाठ्यक्रम सरू करण्याची विद्यापीठाची योजना स्वागतार्ह आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी समजली जाते. या अनुषंगाने येथील महाविद्यालयांमध्ये व्याघ्र पर्यटन, वन्यजीव व्यवस्थापन यावरील अभ्यासक्रम असतील. मंत्रिमहोदयांनी केलेले आवाहन आणि विद्यापीठाने त्याला दिलेला प्रतिसाद बघता येणाºया काही वर्षात विदर्भातील चित्र वेगळे असेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. पण हा केवळ फार्स ठरू नये. एरवी विदर्भात अनेक उद्योग खेचून आणल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात काय? बुटीबोरीतील कारखाने बंद आहेत. मिहानमध्ये १०२ कंपन्यांना जागा देण्यात आली होती. मात्र केवळ ३५ कंपन्या सुरू झाल्या. त्यातही काही बंद पडल्या. सत्ताधाºयांनी याकडेही लक्ष द्यावे.
शिक्षणातील ‘कौशल्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 4:45 AM