मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुहम्मद अली दुर्रानी यांनी सोमवारी दिली. काही भारतीय प्रसारमाध्यमांच्या आॅनलाइन आवृत्त्यांमध्ये, दुर्रानी यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले, पाकिस्तानने प्रथमच दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असल्याची कबुली दिली, अशा आशयाचे मथळे झळकले आहेत. ‘सबसे तेज’ पत्रकारितेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणायला हवा. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात न घेताच, हे मथळे झळकविण्यात आले आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली दुर्रानी यांनी दिली असली तरी, त्याचवेळी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात नव्हता, अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात घेतले, तर पाकिस्तानच्या आजवरच्या भूमिकेला छेद देणारा कोणताही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही, हे सहज लक्षात येते. दहशतवादाच्या अगदी प्रारंभीच्या काळात, पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचे तो देश नाकारत होता; मात्र पुढे आमच्या देशातील दहशतवादी संघटनांवर आमचा जोर चालत नाही आणि इतर काही देशांना त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा जेवढा त्रास होता, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास आम्हालाच होतो, अशी भूमिका घ्यायला पाकिस्तान सरकारने प्रारंभ केला. सध्या नजरकैदेत असलेल्या हाफीज सईदच्या विरोधात कारवाई करायला हवी, या दुर्रानी यांच्या दुसऱ्या वक्तव्यातही हुरळून जाण्यासारखे काही नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प आरूढ झाल्यानंतर, जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाकिस्तानने सईदला नजरकैदेत ठेवले. ती जशी धूळफेक होती, तशीच सईदवर आणखी कडक कारवाईची जी गरज दुर्रानी यांनी प्रतिपादित केली आहे, तीदेखील धूळफेकच आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’, पाकिस्तानसोबतच्या सर्व वाटाघाटी थांबविणे आणि सिंधू जल करारानुसार भारताच्या वाट्याला आलेल्या संपूर्ण पाण्याचा वापर करण्यासाठी पावले उचलणे, या भारत सरकारच्या कृतींमुळे पाकिस्तानवर निर्माण झालेल्या दबावाचा परिपाक म्हणजे दुर्रानी यांचे वक्तव्य म्हणता येईल. आज अफगाणिस्तान पाकिस्तानच्या प्रभावातून बाहेर पडला आहे, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारखे पाकचे कधीकाळचे जवळचे मित्र देश भारताच्या नजीक येऊ लागले आहेत, डोनाल्ड ट्रम्परूपी तलवार पाकच्या शिरावर लटकत आहे. या घडामोडींचा दबाव त्या देशावर दिसू लागला आहे. दुर्रानी यांच्या वक्तव्यांना ही किनार आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामधून खूप मोठी अपेक्षा करणे, ही आपण आपल्याच डोळ्यात केलेली धूळफेकच ठरेल!
केवळ धूळफेक !
By admin | Published: March 06, 2017 11:54 PM