छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या धर्मसंसदेत महाराष्ट्रातून तिकडे गेलेल्या कालीमातेच्या दृष्टांताचा दावा करणाऱ्या आणि देवीसारखाच महिलांच्या वेशात वावरणाऱ्या कालिचरण नावाच्या भोंदूबाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना यथेच्छ शिव्या घातल्या आणि त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला कृतज्ञतेचा जाहीर नमस्कार केला. त्यानंतरचा दिलासा हा की, महंत डॉ. रामसुंदर दास महाराज या तीनवेळा आमदार राहिलेल्या, राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष असलेल्या निमंत्रकांनीच कालिचरण महाराजाचा निषेध करीत धर्मसंसद सोडली.
गांधींच्या अपमानामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. रायपूरमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’ म्हणत संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानरुपी जातकुळीतील विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी नावाच्या महात्म्याला फुटकळ भोंदूबाबांनी शिव्या घातल्याने तसे काही बिघडणार नाही. पण, गांधींच्याच देशात हे घडावे, ही शोकांतिका आहे. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये व सोबतच दिल्लीत आयोजित धर्मसंसदेत कथित संतांनी मुस्लिमांच्या संहाराची हाक दिल्यामुळे असाच संताप व्यक्त होतोय. भगवे कपडे घालून संत म्हणविणाऱ्यांच्या तोंडी माणसे मारण्याची भाषा, त्यासाठी जाहीर प्रतिज्ञा हे धक्कादायक आहे. विशिष्ट धर्माच्या कोट्यवधी लोकांची अशी सामूहिक कत्तल होऊ शकत नाही. तसे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
अमक्या-तमक्यांमुळेच धर्म संकटात आल्याची आवई उठवून मूठभरांनी हातात शस्त्रे घेण्याचे आवाहन करायचे व त्याच्या प्रत्युत्तरातही चिथावणीची भाषा वापरायची, हा सगळा प्रकार दोन्हीकडून धर्म संकटात दाखविण्याच्या राजकारणाचा भाग आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड वगैरे राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर धर्मा-धर्मांमध्ये भांडणे लावून मतांचे पीक कापण्यासाठीच हे धर्मसंसदांचे पेव फुटले आहे. स्वत:ला सनातनी हिंदू म्हणविणारे महात्मा गांधी हे या मंडळींचे पहिले लक्ष्य आहे. कारण, आयुष्यभर सत्य, अहिंसेची कास धरलेल्या गांधींसाठी कुणी शस्त्रे हाती घेणार नाही. म्हणूनच कुणीही सोम्यागोम्याने उठायचे, कधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, कधी धर्माच्या, छद्म राष्ट्रवादाच्या नावाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना शिव्या घालायच्या, अर्धवट माहितीच्या आधारे त्यांना गद्दार, देशद्रोही ठरवायचे, हे प्रकार वाढीस लागले आहेत.
या मंडळींच्या वाक्या-वाक्यांवर चेकाळून टाळ्या वाजविणाऱ्यांची एक जमातच देशात तयार झाली आहे. हे बोलघेवडे व समोरच्या चेकाळलेल्या मंडळींना कायद्याचे भय नाही. जणू सत्तास्थानांवर बसलेली मंडळी आपलीच आहेत व ती आपल्या केसालाही धक्का लावणार नाहीत, हा फाजील आत्मविश्वास त्यांच्यात आहे. हा गैरसमज पोलिसांनी, संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करायला हवा. पण, तसे होताना दिसत नाही. दिल्ली, हरिद्वारच्या कथित धर्मसंसदेतील प्रक्षोभक भाषणानंतर पोलीस शांत राहिले. जगभर छी... थू... झाल्यानंतर हरिद्वारला तीन दिवसांनी एक किरकोळ गुन्हा दाखल झाला. धर्मांतर करून हिंदू बनलेल्या वसीम रिझवी ऊर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागींना मुख्य आरोपी करण्यात आले. म्हणून न्यायालयानेच हे प्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी नामवंत वकिलांनी देशाच्या सरन्यायाधीशांना साकडे घातले आहे. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसचे सरकार असल्याने व राहुल गांधी सध्या हिंदू व हिंदुत्व यातील फरक समजावून सांगत असल्याने कालिचरण महाराजाविरुद्ध लगेच गुन्हा दाखल केला गेला.
एरव्ही नि:शस्त्र लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंतांविरुद्ध देशद्रोहाची कलमे लावणारे, त्यांना ताब्यात घेण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे, डोळ्यात तेल घालून जिल्ह्याच्या, राज्यांच्या सीमांवर टेहळणी करणाऱ्या पोलिसांचे हात अशा प्रक्षोभक भाषणांवेळी, चिथावणीखोर कृतीवेळी कुणी बांधून ठेवलेले असतात? नाताळ सणाच्या वेळी बंगळुरू, नोएडा तसेच हरयाणात प्रार्थनांमध्ये अडथळे आणले गेले. नोएडा भागात मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पढू नये, यासाठी आक्रमक अभियान सुरू आहे. हे सारे पाहून प्रश्न पडतात, की नवा भारत हा असा आहे? विद्वेष व विखाराची ही भाषा, कृती सामाजिक सौहार्द अडचणीत आणणार नाही? गांधी आणि बुद्धाच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून जगभर फिरणाऱ्या पंतप्रधान मोदींना, सत्तेतल्या त्यांच्या सहकाऱ्यांना यामुळे वेदना होत नसतील का? असतील, तर मानवतेसाठी कठोर पावले उचला, खऱ्या धर्माचे पालन करा. धर्मसंसदांमध्ये नाचणारी भुते बाटलीत म्हणजे त्यांच्या मठांमध्ये बंद करा. लोकांना शांतपणे जगू द्या.