समोर माईक आला की दे दणादण बोलत राहायचे आणि या बोलण्यातून भलभलते अर्थ निघाले की मग आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला गेला, माध्यमांनी त्याचा विपर्यास केला अशा सबबी सांगायच्या हे साऱ्याच जातीवंत नेत्यांचे लक्षण. हीच लक्षणे कन्हैया कुमार यानेही दाखवून दिली असल्याने तोदेखील आता खऱ्या अर्थाने नेता बनला असे मानायला हरकत नाही. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा हा अध्यक्ष. गेल्या फेब्रुवारी महिन्यात या विद्यापीठात झालेल्या एक कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा ठपका ठेऊन सरकारने कन्हैयास अटक तर केलीच पण त्याला थेट देशद्रोहीदेखील ठरविले. स्वाभाविकच मोदी सरकारच्या विरोधातील समस्त राजकीय पक्षांचा कन्हैयास गराडा पडला. ठिकठिकाणाहून त्याला भाषणासाठी निमंत्रणे येत गेली व तो ती स्वीकारत गेला. अशाच एका भाषणात बोलताना त्याने २००२ची गुजरातेतील जातीय दंगल तत्कालीन राज्य सरकारने पुरस्कृत केली होती असे विधान केले आणि त्याच ओघात १९८४चे दिल्लीतील शिखांचे शिरकाण हा उन्मादी जमावाचा परिणाम होता असेही सांगून टाकले. गुजरात दंगलींबाबतचे त्याचे विधान ज्यांनी स्वीकारले त्यांनीच दिल्लीतील नरसंहाराबाबतची त्याची मीमांसा साफ झिडकारुन टाकली. केवळ तितकेच नव्हे तर या लोकांनाच कन्हैयाच्या विधानाबाबत अपराधी वाटू लागले. १९८४चा दिल्लीतील नरसंहारदेखील सरकार पुरस्कृतच होता असे ठासून सांगताना या संहारास जसा काँग्रेस पक्ष जबाबदार होता तसाच हा पक्ष १९७५च्या अंतर्गत आणीबाणीनंतरच्या काळ्या कालखंडास जबाबदार होता असे या लोकानी सांगण्यास सुरुवात केली. तेव्हां कुठे मग कन्हैयाने जातीवंत नेत्यालाच शोभावी अशी भाषा वापरायला सुरुवात करुन लोकानी आपले म्हणणे समजून घेतले नाही, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला अशी सारवासारव सुरु केली. आता त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन आपण देशभरातील सर्व नरसंहारांच्या विरोधात भूमिका घेऊ असे त्याने जाहीर केले असून हे विधानदेखील नेत्याला साजेसे असेच आहे.
कन्हैया बनला नेता !
By admin | Published: April 01, 2016 4:08 AM