कर्नाटकात कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, ही सर्वांत मोठी शक्यता होती. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही याच स्वरुपाचे होते. जवळपास तसाच निर्णय मतदारांनी दिला आहे. यामुळे कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली आहे. लोकशाहीत आम्हाला गृहित धरू नका, तुमचे भवितव्य आम्हीच ठरवितो या अर्थाने आपणच किंग आहोत, हे मतदारांनी राजकारणी आणि राजकीय पक्षांना दाखवून दिले आहे. मंगळवारी सकाळी निकाल जाहीर होऊ लागले तशी भाजपची हवा चालली होती. सुरुवातीच्या कलानुसार भाजप स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर येणार आणि बी. एस. येदियुरप्पा पुन्हा एकदा किंग होणार, असे दिसत होते. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने जादुई ११२ चा आकडा काही गाठला नाही. याउलट केवळ दक्षिण-मध्य कर्नाटकात प्रभाव असलेल्या जनता दलाने पुन्हा एकदा ४० जागांच्या जवळ जात आपण किंगमेकर नव्हे, तर किंगच होणार असा स्पष्ट संदेश दिला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस पक्ष पाच वर्षे सत्ताधारी होता आणि राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीत विकासाच्या अजेंड्याच्या नावावर प्रखर राष्ट्रवादाची भाषा करीत हिंदुत्वाचा जोरदार प्रचार भाजपने केला. लिंगायत समाजाने आपल्या धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यासाठी प्रचंड मोठे मोर्चे काढले होते. ती मागणी मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशीनुसार लिंगायत धर्माला मान्यता देऊन अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयापासूनच भाजपने हिंदुत्वाचा प्रचार सुरूकेला होता. हिंदू धर्मात फूट पाडण्यासाठी काँग्रेसने घेतलेला निर्णय असा आरोप करून भाजपने हिंदुत्वाची जोरदार मांडणी केली. यातून कर्नाटकची निवडणूक संपूर्ण जातीयवादावर गेली. भाजप सत्तेवर आला तर येदियुरप्पा मुख्यमंत्री होणार असल्याने लिंगायत समाजाने मतदान केले. मुस्लीमबहुल मतदारसंघात हिंदूंच्या मतांचे धु्रवीकरण मोठ्या प्रमाणात होऊन भाजपचे उमेदवार विजयी झाले. दक्षिण-मध्य कर्नाटकात वक्कलिंग समाजाने आपल्या समाजाचे म्हणून एच. डी. कुमारस्वामी यांना पसंती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची भूमिका मांडण्याचा आव आणला. सिध्दरामय्या यांनी आपल्या सरकारचा कार्यकाळ विकासाचा होता, असेही सांगून टाकले. मात्र, ही निवडणूक जातीय-धार्मिक वळणावर आणून ठेवली तसाच विभागवार निकाल लागला. संपूर्ण कर्नाटकच्या सर्व विभागात एका पक्षाचा पराभव झाला नाही की, विजय मिळाला नाही. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी दक्षिण कर्नाटकात अपेक्षित यश मिळाले नाही. जनता दलाला दक्षिण विभागाचा अपवाद वगळता अन्यत्र एक-दोन जागा मिळाल्या. काँग्रेसला संमिश्र यश मिळाले. एक गोष्ट स्पष्ट आहे की, निकालाच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा पराभव झाला आहे. दक्षिण कर्नाटकात जनता दलाने तर उर्वरित कर्नाटकात भाजपने कॉँग्रेसचा पराभव केला आहे, असे संमिश्र जय-पराजय होण्याचे कारण ही संपूर्ण निवडणूक जातीयवादावर गेली हेच म्हणावे लागेल. संपूर्ण कर्नाटकचे नेतृत्व करण्यास मतदारांनी कोणत्याच पक्षाला सर्वत्र पसंती दिलेली नाही. भाजपला बहुमत मिळत नाही, हे स्पष्ट होताच कॉँग्रेसने तातडीने हालचाली करून धर्मनिरपेक्ष जनता दलासमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. तसेच मुख्यमंत्रिपदही देऊ केले. जनता दलानेही हा प्रस्ताव तत्काळ मान्य केला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आमदारांचा घोडेबाजार न झाल्यास राज्यात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईल आणि किंग होऊ इच्छिणारे बाजूला राहतील आणि किंगमेकरच आता किंग ठरतील, असेच कर्नाटकातील आजचे चित्र आहे.
कर्नाटक किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:57 PM