करुणानिधींच्या निधनाने साऱ्या भारतावर आपल्या राजकीय नेतृत्वाची व समन्वयी वृत्तीची दीर्घकाळ छाप उमटविणारा कमालीचा लढाऊ, प्रतिभाशाली व कडव्या भूमिका धारण करणारा दाक्षिणात्य नेता काळाच्या पडद्याआड नेला आहे. ऐन विद्यार्थी दशेत ब्राह्मणेतर चळवळ व द्रविड संस्कृतीचे उत्थान यात प्रथम पेरियर रामस्वामी नायकेर व पुढे सी.एन. अण्णादुराई यांच्या नेतृत्वात सहभागी झालेल्या करुणानिधींचे नेतृत्वगुण त्यांच्या नेत्यांनी आरंभापासूनच ध्यानात ठेवले. १९६९ मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर त्या पदाची शपथ घेतलेल्या करुणानिधींनी ते पद पुढे ५ वेळा व तब्बल १९ वर्षे सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाºया एम.जी. रामचंद्रन या लोकप्रिय नटाचा व जे. जयललिता या नटीचा विरोध पत्करूनही साºया तामिळनाडूवर त्यांनी आपली पकड कायम केली. ब्राह्मणेतर चळवळीएवढाच त्यांचा हिंदूविरोधी चळवळीतला सहभागही मोठा होता. हिंदी भाषा दक्षिणेवर लादल्याने द्रविड संस्कृतीचा संकोच होतो अशी भूमिका घेणाºया करुणानिधींनी त्या आंदोलनात रेल्वेच्या रुळावर झोपून गाड्या अडविल्या. एक कमालीचा लढवय्या, मुरलेला राजकारणी व जनतेच्या नाडीवर हात असलेला नेता ही त्यांची प्रतिमा होती. दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळ व हिंदीविरोध या दोन्ही गोष्टी तेव्हा जोरात होत्या. त्यांना असलेला जनाधार करुणानिधींनी कधी दुर्लक्षिला नाही. मात्र त्याचवेळी दिल्लीतील कोणत्या सरकारशी सहकार्य करायचे आणि कुणापासून व कधी दूर राहायचे याविषयीचे त्यांचे तारतम्यही कधी हरविले नाही. ते इंदिरा गांधींसोबत होते. पुढे त्यांच्या विरोधातही राहिले. राजीव गांधींच्या हत्येशी त्यांच्या पक्षाचा संबंध जुळविण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण त्याला कधी बळकटी आली नाही. पुढे त्यांनी नरसिंहरावांच्या सरकारला व नंतर मनमोहनसिंग यांच्या सरकारांना साथ दिली. मृत्यूच्या काळात त्यांचा पक्ष सत्तेवर नाही. जयललितांना मानणारा अण्णाद्रमुक हा पक्ष तामिळनाडूत सध्या सत्तेवर आहे. त्याचा करुणानिधींना असलेला विरोध टोकाचा आहे. त्यांची अंत्ययात्रा मरिना बीचवर येणार नाही आणि अण्णादुराई व जयललिता यांच्या शेजारी त्यांची समाधी उभी होणार नाही यासाठी त्या सरकारने अतिशय क्षुद्र पातळीवरून प्रयत्न केले. न्यायालयाने ते हाणून पाडल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला त्या किनाºयावर जागा दिली गेली व आता तेथेच त्यांचे समाधीस्थळही उभे होईल. करुणानिधींच्या राजवटीने तामिळनाडूचा सर्व क्षेत्रात विकास घडविला. उद्योग, रोजगार, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन व संस्कृती ही सगळी क्षेत्रे त्यांच्या कार्यकाळात विकसित झाली. त्यामुळे एक विकसनशील व कार्यक्षम नेता म्हणूनही त्यांचे नाव देशात आदराने घेतले गेले. आपल्या सत्ताकारणात आपल्या मुलांना, नातेवाईकांना व जवळच्या लोकांना सामावून घेण्यात व त्यासाठी होणाºया टीकेकडे दुर्लक्ष करण्यातही ते आघाडीवर होते. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांची मुले होती. त्यांचे जे मंत्री केंद्रात होते, त्यातही त्यांची मुले, पुतणे वा भाचे होते. खासदार व आमदारांमध्येही त्यांच्या नातेवाईकांचा भरणा मोठा होता. मात्र करुणानिधींचा पक्षावरील व राज्यावरील दरारा असा की त्यांच्यावर टीकाही दबल्या आवाजात केली जायची. भ्रष्टाचारही होता. प्रत्यक्ष त्यांच्याविरुद्ध, त्यांच्या पत्नी व मुलांविरुद्ध आणि केंद्रातील त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध चौकशी आयोग बसविले गेले व त्यातील काहींचे खटले अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. मात्र या साºया गैरप्रकारांमुळेही करुणानिधींची लोकप्रियता कधी कमी झालेली दिसली नाही. तामिळनाडू विधानसभेवर ते १३ वेळा निवडले गेले. देशात सर्वाधिक काळ आमदार राहिल्याची नोंदही बहुदा त्यांच्याच नावावर असावी. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्याहून मोठे संघटक होते. चित्रपट व्यवसायाचा व त्यांचा संबंध प्रत्यक्ष आणि घनिष्ट होता. सत्तेवर असताना व नसतानाही त्यांचा जनसंपर्क कायम होता. टीकेएवढीच प्रशंसा आणि विरोधकांनी केलेल्या अवमानाएवढाच सार्वजनिक आदरही त्यांच्या वाट्याला आला. असे नेतृत्व आपल्यातून नाहिसे होणे ही समाजाएवढीच देशाचीही हानी आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
करुणानिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 3:52 AM