देशातील पर्यटन योजनांविषयी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी साधलेला संवाद.कोविडच्या काळात देशाच्या पर्यटन क्षेत्रावर किती परिणाम झाला? पर्यटन अर्थव्यवस्था किंवा पर्यटन क्षेत्रात एकंदरीत गतवर्षातील याच काळाच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत ४२.८ टक्के नुकसान झाले. दुसऱ्या तिमाहीत १५.५ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत १.१ टक्के नुकसान झाले.परिस्थिती सुधारल्यावर आता पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येने पर्यटक येत आहेत काय? या वर्षाच्या जूनपर्यंत भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या गतवर्षाच्या तुलनेत ३४९ टक्क्यांनी वाढली.बुद्धिस्ट सर्किटच्या धर्तीवर ‘राम वन गमन पथ’ तयार करण्याची योजना होती. तिची तयारी कुठवर आली? स्वदेशदर्शन योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालय राज्य सरकारी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना व केंद्रीय संस्थांना देशात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आर्थिक मदत देते. सरकारने रामायण सर्किट अंतर्गत प्रकल्पासाठी १९६.६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १७९.५५ कोटी रुपये याआधीच अदा करण्यात आले आहेत.पर्यटकांना तुम्ही नव्या कोणत्या सुविधा देणार आहात? आयआयटीएफसी/ आयआयटीजी कार्यक्रमांतर्गत आम्ही बाजार पोर्टल सुरू केले आहे. ओला, उबेर यांच्यासारखाच हा प्लॅटफॉर्म असून पर्यटक आणि सेवा पुरवठादार यांच्यातील दुवा म्हणून तो काम करील. सुरक्षितता आणि माहितीसाठी ‘इन्क्रेडिबल इंडिया ट्वेंटीफोर बाय सेवन’ पर्यटन माहिती सेवा सुरू करण्यात आली आहे. परदेशी तसेच देशी पर्यटकांना हिंदी, इंग्रजी आणि अन्य दहा विदेशी भाषांतून माहिती दिली जाते. ई व्हिसा शुल्काचे सुसूत्रीकरण करताना ते बरेच कमी करून १५६ देशांतील नागरिकांना पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहे.ईशान्य भारतात पर्यटन विकासाची भरपूर शक्यता आहे. त्या दृष्टीने काही योजना? राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांशी विचारविनिमय करून ५० आणि ११४ गंतव्यस्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाला ही यादी दोन टप्प्यांत देण्यात आली आहे. ११४ पैकी ३५ स्थळे ईशान्येकडील राज्यातील आहेत. त्यात मेघालयातील १७, नागालँडमधील नऊ, मिझोराममधील सहा, त्रिपुरातील तीन स्थळे आहेत. खासी, गारो, जयंती या टेकड्यांच्या परिसरातील जिल्ह्यात दळणवळण यंत्रणा सुधारण्यावर सरकारचा भर आहे. ऐझाल, चम्फाई तसेच कोहिमा आणि थिजमा जिल्ह्याचा काही भाग, गोमती आणि दक्षिण त्रिपुरा जिल्हे त्यात येतात.काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उभारल्यानंतर तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत किती वाढ झाली? वाराणसी हे पूर्वीपासूनच पर्यटकांचे आकर्षण आहे. विशेषत: विदेशी पर्यटक येथे येतात. २०१९ मध्ये सुमारे ३० लाख पर्यटकांनी या क्षेत्राला भेट दिली. २० साली ८९ लाख प्रवासी आले. परंतु कोविडच्या परिस्थितीमुळे गतवर्षी या संख्येत थोडी घट झाली. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी या कॉरिडाॅरचे उद्घाटन केल्यानंतर किती पर्यटक येऊन गेले याची आकडेवारी आम्ही मिळवत आहोत.चारधाम यात्रा, कैलास मानसरोवर आणि अमरनाथ यात्रा नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी खंडित होतात. यावर काही उपाययोजना? पर्यटकांना नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पुरेसे संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पर्यटन क्षेत्राकरिता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार करत आहोत. पर्यटनक्षेत्राशी संबंधित व्यक्ती संस्था यांच्याबरोबर चर्चा सुरू झाली आहे.परदेशात ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजना असतात, त्या धर्तीवर आपण घरांचा वापर निवासासाठी सुरू केला आहे. त्याला कितपत यश आले? पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचे प्रमाणीकरण करण्यासाठी पर्यटन मंत्रालय हॉटेलचे वर्गीकरण करते. आता ‘बेड अँड ब्रेकफास्ट योजना’ आणि गृहनिवास योजनेचेही वर्गीकरण मंत्रालयाने सुरू केले आहे. नॅशनल इंटिग्रेटेड डाटाबेस ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (निधी) या नावाचा एक प्लॅटफॉर्मही आम्ही उभारला आहे. विविध श्रेणीतील सेवा पुरवठादारांना तेथे नोंदणी करता येते तसेच वर्गीकरणही होते. त्यात ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ गृहनिवास योजना समाविष्ट आहे. अंदाजे ५३४ घरांना मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यांची क्षमता २५९४ खोल्यांची आहे.
विशेष मुलाखत: काशी विश्वनाथ कॉरिडाॅरला लाखो पर्यटकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 10:21 AM