- पराग कुलकर्णीआपण जन्मलो, तेव्हापासून आयुष्यात आलेली पहिली स्त्री कोण? नर्स... आई..! शेवट आणि सुरुवात ‘तीच’! पण मग ‘स्त्रीचा मान राख’, ‘मुलगी वाचवा’ हे विचार कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातीद्वारे का मांडावे लागतात? कुणी काहीही करा ‘ती’ जगणारच आहे. डोंगरावर उभं राहून ‘अरे’ ओरडल्यावर ‘का रे?’ ऐकू नाही येत. निसर्गाचा नियम सोपा आहे. समजून घेऊ, ‘तिला’ मान देऊ! अर्जुन माझ्या घरी जन्माला यावा की शेजारी? की माझ्यात जन्माला यावा, ह्या प्रश्नांचं लगेज घेऊन लोकलमधून प्रवास करत होतो. प्रवास म्हटला की विचार लगेज म्हणून येतातच सोबत. स्वत:चा किंंवा दुसऱ्या कुणाचा तरी विचार असतोच असतो. आज मी मंदाचा विचार करत होतो. आज सकाळी घराबाहेर पडलो तेव्हा तिला आईजवळ बसलेली बघितली. माझ्या घरात मंदा १० वर्षे काम करतीये. घरातली सगळी कामे करत असली तरी ती घरातलीच आहे. ती लग्न झाल्यानंतर या शहरात आली. तिचा विचार मनात घोळत होता; कारण आईकडे ती पैसे मागायला आलेली. मुलांच्या फीसाठी पैसे हवे होते. तिची मुलं केरळच्या एका गावात शिकत आहेत. मुलं वर्षभराची असताना आपल्या सासूकडे सोडून ही मंदा गेली १० वर्षे या शहरात काम करतीये. वर्षातून एकदा ती आपल्या मुलांना भेटायला जाते. केवळ एक महिना. त्यानंतर फोनवर बोलणं होतं तेव्हढंच. ‘मी जास्त फोन नाही करत. पहिल्यापासूनच नाही. कारण एकदा फोन सुरू झाला की मग नाही राहवत. आवाज ऐकला की माझ्या डोळ्यांत पाणी येतं. मग मुलंसुद्धा रडतात.’ मंदाच्या डोळ्यांत हे बोलताना पाणी येत होतं. काय त्याग म्हणायचा हा? या त्यागामागे मानवीय हक्कांचा कुठलाही डबा जोडून संकुचित वृत्तीचं प्रदर्शन नको करूयात. नवऱ्याबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी मंदा आहे ती. स्त्री शक्तीच आहे ती. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह म्हणतो मी तिला. एरवी कधीही मंदाच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर दु:ख नसतं. ती मन लावून काम करते आणि मनाइतकंच ती घरही स्वच्छ ठेवते. माझी मुलं माझ्याजवळ नाहीत म्हणून मी दुसऱ्या मुलांच्या शर्टला लागलेला मळ धुणार नाही ही विकृती तिच्यात नाही. विकृतीच म्हणतात त्याला. नकारात्मक विचारातून जन्माला आलेली विकृती! कालचीच घटना आहे. एका मित्राच्या दुकानावर चहा प्यायला गेलो होतो. महिना झाला स्टेशनवरून घरी येताना लांबून हात दाखवायचो. आज जवळ जाऊन हात मिळवलाच. चहा आला. त्याची बायको गल्ल्यावर बसलेली दिसायची. आज नव्हती म्हणून मी सहज विचारपूस केली, ‘वहिनी नाहीत आज?’ त्यांनी हसत उत्तर दिलं, ‘नाही.. चार दिवस अडचण आहे.’ मी पुढच्या क्षणी विचारलं, ‘मग चार दिवस दुकान बंद नाही ठेवलंस?’ त्याला समजलं नाही. मी त्याच्या उत्तराची वाट न बघता पुढे म्हणालो, ‘अडचणीच्या चार दिवसांत पैसे तर येणार ना दुकानात ? म्हणजे लक्ष्मीच येणार. तिला नाकारणार का?’ त्याची प्रतिक्रिया काय होती ते सोडा; किंवा इथे मला माझं शहाणपणही सांगायचं नाही. पण आपल्या सोयीनुसार आपणच आपल्या जगण्याच्या व्याख्या निश्चित केल्या आहेत.आपल्या स्त्रीची शक्ती, तिचं महत्त्व काय आहे सगळं माहीत आहे. इतकंच काय तिच्या इतकी सकारात्मक ऊर्जा कदाचित सूर्यामध्येही नसेल. पण आपल्याकडे त्यापेक्षा मोठी ऊर्जा आहे ती म्हणजे दुर्लक्ष करण्याची ऊर्जा. सकारात्मकता म्हणजे दुसरं काय हो? ‘नाही’ हा शब्द उलटा वाचला की ‘हीना’ असा दिसतो. ‘हीना’ म्हणजे ‘सुगंध’. ‘नर्तकी’ हा शब्द उलटा वाचा. आहे की नाही उलट वाचण्यातही सकारात्मकता? थेट ‘कीर्तन’ सुरू होतं. यालाच म्हणतात, सकारात्मक ऊर्जा. अशी किती उदाहरणं आहेत. पण मग या गोष्टी फक्त उदाहरण देण्यापुरत्या का मर्यादित राहतात? आपली नकारात्मक शक्ती कुठले हक्क हिरावून घेणार आहे या स्त्री ऊर्जेकडून? स्तनपान करण्याचा हक्क? जीव जन्माला घालण्याचा हक्क? नाही हो. समुद्राकडे जाऊन एकरूप होणं प्रत्येक नदीचा अधिकार आहे. कितीही बांध घाला किंवा कागदावर धरणं उभी करा, तिचा प्रवास अखंड आणि अविरत त्या समुद्राकडेच सुरू असतो. आपण काय संपवणार तिला? ‘ती’ मातृभूमी आहे. ‘ती’ सावली आहे. ‘ती’ अणुशक्ती आहे. ‘ती’ रक्तवाहिनी आहे. यात ‘तो’ कुठे बसतो का? फसेल सगळं. आज ‘ती’ काश्मीरसारख्या खोऱ्यातही पाय रोवून उभी आहे. तिचं नाव ‘मेहबुबा मुफ्ती’. मी तर तिला ‘मुक्ती’ म्हणूनच बघतोय. ‘नकारात्मक’ विचारातून मिळालेली ‘मुक्ती’. हा विषय राजकारणाचा नाही. माझ्यासारख्याला अजून जगण्याचं कारण समजलं नाही तो राजकारण काय करणार? पण काश्मीरमधल्या त्या स्त्रीला आज आधाराची गरज नाही. कुठल्याही जातीतला ग्रंथ किंवा कुठलाही धर्म निसर्गाने तिला दिलेले अधिकार कसा काढून घेऊ शकतो? ‘ती’ हिमालयासारखी उभी राहणार. ‘तो’ हिमालय जरी असला तरी ‘ती’ गंगा आहे. हे नाकारून चालणारच नाही. (लेखक ‘डोंबिवली फास्ट’, ‘गैर’, ‘पोरबाजार’, ‘सांगतो ऐका’, ‘बाबांची शाळा’, ‘असामी असामी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ अशा सुपरहिट सिनेमांचा आणि ‘लागी तुझसे लगन’, ‘इस देस ना आना लाडो’, ‘जुनून व लक्ष’, ‘देवयानी’, ‘पोलीस फाइल्स’, ‘युनिट 9’, ‘त्यांच्या मागावर’, ‘सात जन्माच्या गाठी’, ‘या सुखांनो या’, ‘रेशीम गाठी’ यांसारख्या हिंदी-मराठी मालिकांचे लेखन केले आहे.)
काश्मीर खोऱ्यातली ‘ती’ !
By admin | Published: January 17, 2016 2:49 AM