- धनंजय वाखारे
ध्यानीमनी नसताना अचानक कोरोना महामारी आली, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून नाशिकला मिळालेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित झाले. यंदाच्या वर्षी तरी नाशकात ह्या संमेलनाचा मांडव पडेल की नाही याबद्दल खुद्द महामंडळाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे साशंक आहेत. साशंक कसले, आता हे संमेलन रद्द होण्याचीच जास्त शक्यता असल्याची पुडी त्यांनी सोडून ठेवली आहे. त्यासाठी त्यांनी महामंडळाच्या ‘‘अक्षरयात्रा’ वार्षिकांकात तब्बल १८ पानी अध्यक्षीय मनोगत लिहिले आहे.
अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले असल्याचे निरीक्षण या मनोगतात कौतिकराव नोंदवतात. हे सारे करताना त्यांनी संमेलनाच्या मांडव डोहाळ्यांचा पटच्या पटच उलगडला आहे. हे साहित्य संमेलन दिल्लीत भरवण्याबाबत त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आलेला दबाव आणि धमक्या... संमेलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा त्यांच्या भक्त मंडळींनी घातलेला घाट... पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २६१ वर्षे झाली, त्याची आठवण म्हणून दिल्लीत संमेलन मागण्यासाठी तारतम्य सोडून दिलेली विसंगतीपूर्ण कारणे या साऱ्यांचा त्यांनी तपशीलवार उहापोह केला आहे. सहा-सात वर्षापूर्वी पंजाबला घुमान येथे साहित्य संमेलन नेमके कुणासाठी घेतले होते, हा प्रश्न मला आजही सतावतो, अशी कबुलीही भावनेच्या भरात कौतिकरावांनी देऊन टाकली आहे.
नाशिकच्या नियोजित संमेलनाबाबत केलेले स्फोटक खुलासे हा कौतिकरावांच्या मनोगतात ठासून भरलेला खरा मसाला. हा मसाला सांप्रत स्थितीत अनेक साहित्यप्रेमींच्या डोळ्याला संतापाचे पाणी आणील, असा झणकेदार आहे. नाशिकच्या संमेलनासाठी वापरलेल्या निधी संकलनाच्या पद्धतीवर कौतिकराव जाम बरसले आहेत. निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळाचा इवलासा जीव आणि त्यांनी अल्पावधीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याची पाहिलेली स्वप्ने याला कौतिकरावांनी आडव्या हाताने घेतले आहे. “संमेलनासाठी लोकांच्या सहभागातून निधी जमा केलेला नाही. त्यामुळे लोक (म्हणजे नाशिककर) आपलं ‘सत्व’, ‘स्वत्त्व’ आणि ‘सार्वभौमत्व’ हरवून बसतील; नाशिककरांना हे चालेल का?”- असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कौतिकरावांनी संमेलनाचे निमंत्रक व मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या एकतंत्री कारभाराकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले आहे.
मुळातच नाशिकला साहित्य संमेलन घेण्याइतपत लोकहितवादी मंडळाची कुवत नाही आणि नव्हती, हे माध्यमांनी यापूर्वी वारंवार सांगितले होते. सुरूवातीला सार्वजनिक वाचनालयाच्या गळ्यात संमेलन मारण्याचे प्रयत्न फसले. त्यानंतर लोकहितवादीचे घोडे पुढे दामटले गेले. मुळात हा घोडा रेसचा नव्हताच हे नाशिककरांना चांगलेच माहिती होते. जे लोकहितवादी मंडळ महापालिकेचा साडेतीन लाख रुपये मालमत्ता कर भरू शकले नाही, ते हा प्रपंच उभा करायला निघाले. अशावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील हेवीवेट नेते छगनराव भुजबळ यांना स्वागताध्यक्षपदी बसवले तेव्हाच निधीचा सारा भार त्यांच्यावरच टाकला जाणार हे तेव्हा कौतिकरावांना माहीत नव्हते का, असा प्रश्न त्यांचा हा पश्चातबुद्धी विलाप वाचून कुणालाही पडेल.
साहित्य संमेलनाच्या मैदानातल्या कुस्त्या कशा रंगवल्या जातात हे पुरेपूर माहिती असलेले कौतिकराव स्वत:च साहित्याच्या या वार्षिक आखाड्यातले कसलेले मल्ल आहेत ! इतकी वर्षं या आखाड्याच्या मातीत मनसोक्त खेळल्यावर नाशिकच्याच निमित्ताने आपल्या सदऱ्याला डाग पडल्याचा साक्षात्कार या कौतिकारावांना इतक्या उशिराने व्हावा हे एक नवलच ! मराठी साहित्याचे हे उत्सव जगभर भरवले जावेत - आणि महामंडळाच्या सदस्यांना फुकट जग-पर्यटन व्हावे - यासाठी मरत चाललेल्या मराठीच्या नावाने डोळ्यात पाणी आणूआणून परदेशस्थ मराठी माणसांच्याही खिशात हात घालायला मागेपुढे न पाहिलेल्या कौतिकरावांना नाशिकच्या संयोजकांची कोटीकोटी उड्डाणे अशी अचानक खटकायला कशी लागली ?
साहित्य संमेलन हा एक धंदा झाला आहे, असे कौतिकराव मारे मोठ्या नैतिक फणकाऱ्याने म्हणतात. पण साहित्याचे हे दुकान ज्यांनी पहिल्यांदा थाटले आणि साहित्य संमेलनाची गरीब गाय श्रीमंत धनवानांच्या गोठ्यात नेऊन बांधली, त्यांचे अध्वर्यू कोण होते ? जेव्हा हा सारा धंदा भरभराटीला आला, तेव्हा ‘‘अतिरेकी खर्चावर आळा घाला’’ असे म्हणणाऱ्या संयमी लोकांना आपल्या उद्धट भाषेत गप्प कोणी बसवले? साहित्य संमेलनांचा केवळ चेहरामोहराच नव्हे तर या वाङ्मयीन आयोजनाचे मूळ उद्दिष्टच भरकटवून साहित्य महामंडळाची “ इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी’’ कोणी केली ? - या प्रश्नांचे उत्तर इथे वेगळे देण्याचीही गरज नाही, इतके ते स्पष्ट आहे.
स्वतःच केलेल्या पापांचे खापर फोडायला कौतिकरावांना नाशिककर आयोजकांनी आपली डोकी आयतीच दिली हे खरेच; पण सगळी तिकिटे नाशिकच्या नावाने फाडून कौतिकरावांनी उगीच नैतिकतेचा आव आणू नये. कदाचित औरंगाबादच्या ठकाला नाशिकचे महाठक भेटल्याने उसळलेल्या संतापातून हा नैतिकतेचा फणकारा आला असावा. पण नाशिकच्या मिसळीइतकाच इथला वडा-रस्साही झणझणीत असतो. तेव्हा रश्शात वडा की वड्यावर रस्सा एवढाच काय तो प्रश्न आहे.