मिलिंद कुलकर्णीसार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींसाठी कोणतीही लिखित नियमावली नसली तरी तारतम्य ठेवून त्यांनी वागणे अपेक्षित असते. राजशिष्टाचार, आचारसंहिता या शब्दांमधून तेच ध्वनित होत असते. पण अलिकडे सर्वच क्षेत्रात अनागोंदी सुरु असल्याने त्याला सार्वजनिक क्षेत्र तरी अपवाद कसा ठरेल. जशी प्रजा, तसा राजा या उक्तीप्रमाणे नेतृत्व निर्माण होत नसेल ना, याचाही विचार करण्याची गरज आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांच्या वर्तनाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विशेष म्हणजे, पार्टी विथ डिफरन्स म्हणून स्वत:ची ओळख सांगणाºया भाजपच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषदेचा कारभार चालतो. ५ आॅगस्टला सर्वसाधारण सभा झाली. कोरोना संसर्गामुळे शारीरिक अंतर राखण्यासाठी ही सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात न होता, गोंदूर रस्त्यावरील एका लॉनवर झाली. या सभेपूर्वी मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी तीन बोकडाचे मटन तयार करण्यात आले. बहुसंख्य सदस्यांनी भोजनावर ताव मारला आणि नंतर ग्रामीण जनतेच्या विकासाविषयी ‘पोटतिडकी’ने चर्चा केली. शहराच्या बाहेर एका लॉनवर ही सभा आणि सभापूर्व सामिष भोजन झाले, तरी काही वेळात रिकामे भांडे, उष्टे अन्न यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. ५ आॅगस्टला पंतप्रधान नरेद्र मोदी हे अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करीत असताना भाजपचे सदस्य धुळ्यात सामीष भोजनात व्यग्र होते. श्रावण महिन्यात सामिष भोजन वर्ज्य केले जाते, तरीही संस्कृतीरक्षक पक्षाच्या सदस्यांनी त्याचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा सभागृहाबाहेर घेत असताना तिला एखाद्या पार्टी व सहलीसारखे स्वरुप देण्यात आले. त्यात सामिष भोजनाने वरताण केली. त्याची बातमी फुटताच सारवासारव सुरु झाली. शाकाहारी जेवणदेखील उपलब्ध होते, आम्ही सामिष भोजन केलेच नाही, असे स्पष्टीकरण येऊ लागले. भाजप नेते कामराज निकम यांनी तर कडी केली, जि.प.सभेपूर्वी भोजनाची परंपरा आहे, तिचे पालन फक्त आम्ही केले. कमाल आहे की, नाही? परंपरा आहे मान्य. पण कोरोनाची महासाथ, अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन, श्रावण महिना याचे भान तुम्हाला असू नये? बोभाटा झाल्यानंतर मात्र साधनशुचितेचा दावा करणाºया भाजपमध्ये खळबळ माजली. खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल या नेत्यांनी ठोस भूमिका न घेता शांत राहणे पसंत केले.
भाजपमध्ये ‘आयारामां’ची भरती वाढू लागल्यापासून हे प्रकार वरचेवर होऊ लागले आहेत. विचार, तत्त्व, भूमिका यापासून अंतर राखत पुढे जाता येते, ही उदाहरणे सभोवताली दिसू लागल्याने ‘कार्पोरेट कल्चर’ वाढू लागले आहे. पक्ष कार्यालयापेक्षा नेत्यांची संपर्क कार्यालये गजबजलेली असतात, हे त्याचे दृश्य परिणाम आहेत.
पक्षीय विचार आणि संस्कृतीपासून नेते आणि कार्यकर्ते किती दूर गेले आहेत, याचे एक उदाहरण जळगावात काही वर्षांपूर्वी घडले. भाजप कार्यालयात पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक यांना निरोप दिले गेले. कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरु असताना एक नगरसेवक पोहोचले, आणि त्यांनी दिनदयाळजींची प्रतिमा पाहून विचारले, भाई, ये कौन है? सत्तेची फळे चाखायला मिळाली, मात्र पाया रचणाºया चिरा कोण होत्या, हे विसरले की, असेच घडते. याच कार्यालयात घडलेला प्रकार धक्कादायक होता. प्रदेश कार्यालयातून आलेल्या माहिती पुस्तिका रद्दीत विकण्यात आल्या. जनसामान्यांमध्ये त्या पुस्तिका वितरीत करण्याऐवजी रद्दीत विकण्याचा सोपा मार्ग अवलंबला गेला.
जळगाव महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यपध्दती याच दिशेने जाणारी आहे. जळगावच्या स्वच्छतेसाठी ‘बीव्हीजी’ इच्छुक असताना भाजप नेत्यांनी अनेक ठिकाणी काळ्या यादीत असलेल्या ‘वॉटरग्रेस’ कंपनीला ठेका दिला. या कंपनीच्या अकार्यक्षमतेविषयी खद्द महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आवाज उठवला. ठेकेदाराची लबाडी व दादागिरी उघडकीस आणली. पोलीस स्टेशनपर्यंत वाद पोहोचला. ठेका बंद झाला. मात्र काही महिन्यानंतर महापौरांच्या मताला डावलून पुन्हा वॉटरग्रेसला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षात एकोपा नाही, असे चित्र समोर आले. ज्या बीव्हीजीला ठेका दिला नाही, त्यांना गिरीश महाजन हे जामनेरात उभारत असलेल्या रुग्णालयाच्या स्वच्छतेचा ठेका देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? उक्ती आणि कृतीमधील भिन्नता काय संदेश देते? याचे किमान तारतम्य तरी ठेवायला नको काय?