भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांची ‘आॅडिओ क्लिप’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे. पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांची माहिती विचारण्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. यावेळी संभाषणादरम्यान थेट खासगी गुंडे लावण्याची धमकी देत आपल्या ‘पॉवर’चे मोठमोठे दाखले दिले. यासंदर्भात आता डॉ.पोतदार यांच्याकडून सारवासारवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र देश, राज्य व जिल्ह्यात सत्तास्थानी असलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने अशाप्रकारची भाषा वापरणे हे निंदनीयच आहे. पक्षाची कवचकुंडले असली म्हणजे आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा बहुधा समज झाला असावा. त्यामुळेच तर अगदी सत्ता डोक्यात गेल्यासारखी भाषा त्यांनी वापरली. मात्र हा अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग नाही. सत्तास्थानी असलेला पक्ष कुठलाही असो, अगदी गल्लीतील कार्यकर्तादेखील नगरसेवकाच्या तोऱ्यात वावरतो. ‘चहापेक्षा किटली गरम’ असा एक वाक्प्रचार आहे. शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या ठिकाणी अनेकदा अशा अनेक ‘किटली’ दिसून येतात अन् नियम आणि नीतिमत्ता धाब्यावर बसवत ‘हम करे सो कायदा’ याच धोरणाने वागतात. डॉ.पोतदार यांना जिल्ह्यात मान आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना भावनांवर नियंत्रण ठेवून सारासार विवेकबुद्धीने वर्तन करावे लागते, हे त्यांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. संबंधित प्रकरणात पोलिसांनीदेखील शोध घेतला होता. अशा स्थितीत डॉ.पोतदार यांनी स्वत:कडूनदेखील चौकशी सुरू केली. यातून त्यांना पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही की काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सत्ता ही कधीही शाश्वत नसते. दर पाच वर्षांनी खुर्चीवरील नेते बदलतात, मात्र जनता कायम असते. सार्वजनिक पातळीवर प्रत्येक नेता, कार्यकर्त्याने ही बाब डोक्यात ठेवूनच वावरायला हवे. मुळात एखाद्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद किंवा मिळालेली सत्ता ही स्वत:ला जनतेच्या नजरेत सिद्ध करून दाखविण्याची एक संधी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील भाजपाचेच तीन मोठे नेते यासाठी जीवाचे रान करत आहेत. मात्र डॉ.पोतदार यांनी केलेला असंसदीय भाषाप्रयोग ‘स्मार्टफोन्स’च्या माध्यमातून जनतेपर्यंत गेला आहे. लोकशाहीत राजकीय शक्तीपेक्षा जनता जास्त शक्तिशाली असते. त्यामुळे आपली ताकद सांगत असताना डॉ.पोतदार यांनी जनतेची ‘पॉवर’देखील लक्षात घ्यायला हवी.
जनतेची ‘पॉवर’ लक्षात घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:58 AM