- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : महाराष्ट्रात दोन भागात विभागणी केलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाची आसनसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सोमवारी लोकसभेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले. याबाबतचा प्रश्न रामदास तडस यांनी विचारला होता. प्रधान म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात ५९ केंद्रीय विद्यालये कार्यरत असून, एक नवे केंद्रीय विद्यालय अकोल्यात सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव अटी पूर्ण करीत असून, इतर अशाच प्रस्तावांशी स्पर्धा करीत आहे.’ अमरावती जिल्ह्यात नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव ठरावीक नमुन्यात महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय विद्यालय संघटनेला मिळालेला नाही, असे सांगून प्रधान म्हणाले की, ‘नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे.’ केंद्रीय विद्यालये ही प्रामुख्याने संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसह बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले, स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट हायर लर्निंगच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा समान कार्यक्रम देऊन सुरू केली जातात.
केंद्रीय विद्यालय : वर्गातील संख्या वाढविणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 9:32 AM