दिल्लीत प्रमोशनची किल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:15 AM2018-03-29T04:15:56+5:302018-03-29T04:15:56+5:30
नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे.
नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याला अस्थिर करण्यासाठी दुसऱ्या गटाला हाताशी धरून बळ देण्याचे काम ‘दिल्ली’ मोठ्या शिताफीने करीत आली आहे. देशभरात काँग्रेसची झालेली पडझड पाहता आता दिल्लीकरांनीही काहीसे समजदारीने घेतल्याचे नागपुरातील राजकीय ‘प्रमोशन’ वरून दिसून येते. नाराजी व्यक्त करणाºयांना काहीतरी देऊन ताकद देण्याची भूमिका आता दिल्लीने घेतली आहे. यातून स्थानिक नेत्यांना बळ मिळत असून पर्यायाने काँग्रेस बळकट होण्याच्या दिशेने सकारात्मक संदेश जात आहे.
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गटबाजीने नागपुरात काँग्रेस भुईसपाट झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत प्रकरण गेले. शेवटी चतुर्वेदींना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. महाराष्ट्रातून झालेली ही कारवाई मोडीत काढण्यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्ली गाठली. तर त्यांच्यासोबतच कारवाईचे स्वागत करण्यासाठी मुत्तेमवार गटही दिल्लीत दाखल झाला. दोन्ही गटांनी दिल्ली दरबारी हजेरी लावून आपापल्या नेत्यांची बाजू मांडली. दिल्लीकरांनी बाजू ऐकून घेतली व सर्वांच्याच पदरी काहीतरी पाडण्याचा निवाडा केला.
समर्थकांच्या दिल्लीवारीनंतर मुत्तेमवार यांची अ.भा. काँग्रेस कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी लागली. त्यामुळे चतुर्वेदी गट आणखीनच दुखावल्याचे पाहून काल-परवा माजी मंत्री नितीन राऊत यांची अ.भा. काँग्रेस समितीच्या ‘एससी’ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे करीत दिल्लीने गटबाजीला अधिक हवा न देता नेत्यांमध्ये ‘बॅलेन्स’ साधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवारीचा फायदा दोन्ही गटांना झाला. तत्पूर्वी पक्षाने युवक काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नागपुरातील कामाची दखल घेत त्यांना अ.भा. युवक काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविली.
शेळकेंचे हे प्रमोशनही बरेच काही सांगून गेले. दिल्लीला आता गल्लीतील गटबाजीत ‘इंटरेस्ट’ नाही, तर गल्लीत काम करणाºयासाठी दिल्लीची दारे उघडी आहेत, असा संदेशवजा इशारा दिल्लीने नागपूरकर नेत्यांना दिला आहे. लोकसभा अन् पाठोपाठ विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. स्थानिक गटबाजीमुळे पक्षाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे. याचे अहवाल दिल्ली दरबारी पोहचले आहेत. त्यामुळे आता फाटलेले शिवण्याऐवजी अधिक फाडण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यांना प्रसंगी याची किंमतही मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांनी वेळीच सावध होऊन पक्षनिष्ठा जोपासली नाही तर ‘हात’ दाखविल्याशिवाय सोडणार नाही.