सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांवर सातत्याने होणाºया हल्ल्यांची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा कोणताही सण वा उत्सव नजिक आला की तो कधी शांतपणे पार पडतो, असे पोलिसांपासून सर्वसामान्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारी पातळीपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारे प्रयत्नशील असतात. अगदी याच कालावधीत ईदही साजरी होत असल्याने पोलिसांवर अधिकच ताण असतो. यावर्षी एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना पर्जन्यराजाने अगदी दणकून हजेरी लावली. विशेषत: मुंबई - ठाण्याची तर वाताहातच झाली. केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही तर अनेक दुर्घटना घडून त्यात अनेकांचे बळीही गेले. एकीकडे या अपघात, दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या हाकेला धावून जाताना त्या अपघातांची नोंद, जबाब नोंदवणे असे कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची कामगिरीही पोलिसांना करावी लागते. विशेष म्हणजे कामाच्या तासांची चर्चा न करता खाकी वर्दीने गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि अतिवृष्टीचे संकट एकाचवेळी झेलण्याची दुहेरी कामगिरी अगदी चोखपणे बजावल्याचे पाहावयास मिळाले. अतिवृष्टीचे अरिष्ट पार पडते न पडते तोच गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला होणारे गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे ही खाकी वर्दीची खरी कसोटी असते. कारण संपूर्ण राज्य गणेश विसर्जन सोहळ््यात गर्क असते. हजारो मिरवणुका निघतात आणि शहराशहरात भाविकांची लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली असते. या गर्दीत होणारी किरकोळ दुर्घटनाही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यास वेगळे वळण लावणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ््यात तेल घालून पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षागणिक वाढणारी गणेशोत्सव मंडळे, दर्शनासाठी वाढत जाणारी गर्दी, भव्य प्रमाणात पार पडणारा विसर्जन सोहळा पाहता त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ मात्र वाढलेले दिसत नाही. मात्र ४0 हजारांचे मुंबई पोलीस दल तर दीड लाखांवरचे राज्य पोलीस दल यंदाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणेशोत्सव बंदोबस्त विनाविघ्न पार पाडण्यात यशस्वी झाले. एरवी किरकोळ कारणावरून टिकेचे धनी होणाºया, समाजकंटकांच्या हल्ल्यांना तोंड देत सर्वसामान्यांना संरक्षण देणाºया पोलिसांना या कामाचे श्रेय देत त्यांचे कौतुक करावेच लागेल.
खाकी वर्दीची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:16 PM