जखम वेदनादायी असताना इलाज करणे जसे गरजेचे असते, तसे राजकारणात अचूक टायमिंगला महत्त्व असते. ते न साधता जे केले जाते त्यातून साध्यपूर्ती होईलच याची खात्री बाळगता येत नाही. नाशिक महापालिकेतील पराभवानंतर निवांतपणे केल्या गेलेल्या ‘मनसे’च्या संघटनात्मक खांदेपालटाकडेही त्याच दृष्टीने बघता येणारे आहे.महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना नाशिककडे या पक्षाचा ‘राज’गड म्हणून पाहिले जात असे. राज्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक प्रचारात बोलताना नाशिकचे दाखले देत ‘मी काय करून दाखविले, हे तिथे जाऊन बघा’ असे राज ठाकरे नेहमी सांगत असतात. नाशकातील बॉटनिकल गार्डन असो, उड्डाण पुलाखालील सुशोभीकरण की ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय; याकडे त्यांच्या नवनिर्माणाच्या पाऊलखुणा म्हणूनच पाहिले जाते हेदेखील खरे. परंतु त्या साकारतानाही उशीर झाल्याने, म्हणजे ‘टायमिंग’ न जमल्याने ‘मनसे’ला महापालिकेतून सत्तेबाहेर व्हावे लागले होते. या पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी शहराध्यक्षपदाचा जो बदल केला गेला आहे, त्यासही अंमळ विलंबच झाल्याने नवीन पदाधिकाºयांसाठी संघटनात्मक नवनिर्माणाची वीट रचणेही आव्हानात्मकच ठरून गेले आहे.खरे तर नाशिक महापालिकेतील पराभवाचे संकेतही ‘मनसे’ला पूर्वीच मिळून गेले होते. सत्ताधारी पक्ष सोडून एकेक करीत अर्ध्याअधिक नगरसेवकांनी बाहेरची वाट धरली असताना तेव्हाही बेफिकिरी दाखविली गेली. त्यानंतर पराभवाने हबकलेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यात व त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यातही तत्परता दाखविली गेली नाही. शहराध्यक्षांच्या नेतृत्वक्षमतेचा अभाव उघड झाला असताना व त्यांनी स्वत: आपल्याला ‘मोकळे’ करण्याची अपेक्षा व्यक्त करूनही आताशी तब्बल दहा महिन्यांनी नवनियुक्ती केली गेली. महापालिकेतील संख्याबळ ४० वरून अवघ्या पाचवर आले. या ‘पानिपता’नंतर लगेचच शस्त्रक्रिया केली जाऊन पक्ष सावरणे प्राथम्याचे होते, पण खुद्द पक्षप्रमुखच कोपगृहात जाऊन बसले. पराभवानंतर प्रथमच गेल्या दोनेक महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षातील निस्तेजता दूर करण्याचे प्रयत्न केलेत. ‘मार खाणारे नकोत, मार देणारे कार्यकर्ते हवेत’ अशी ठाकरेशैली प्रदर्शित माध्यमांतील जागाही त्यांनी व्यापली. मात्र त्यानंतरही ‘मनसे’ची उपजत आक्रमकता दिसून येऊ शकली नाही. त्यामुळे आता शहराध्यक्षपदावरील बदलानंतर तरी स्वस्थता सुटेल का, असा प्रश्नच आहे.महत्त्वाचे म्हणजे, पक्षकार्य पुढे नेऊन संघटना बांधणी करण्याकरिता जनतेतील ज्ञात चेहरा असणे गरजेचे असते. आमदार राहिलेले नितीन भोसले व महापौरपद भूषविलेले अशोक मुर्तडक यांच्यासारखे काही चेहरे समोर होतेही; परंतु मुर्तडक यांना प्रदेशस्तरावर घेऊन महापालिकेतील गत सत्ताकाळात गटनेतेपदी राहिलेल्या व नंतर पराभव वाट्यास आलेल्या अनिल मटालेंकडे नेतृत्व सोपवून त्यांना परीक्षेस बसविले गेले. सर्वज्ञात नेतृत्वाची वानवा यातून उघड व्हावी. नवीन दमाच्या व्यक्तींकडून नव्या जोमाने नवनिर्माणाची अपेक्षा असली तरी ते काम सहजसोपे खचितच नाही. म्हणूनच यासंदर्भातील आव्हाने लक्षात घेता मटाले यांची निवड कसोटीचीच ठरणार आहे.- किरण अग्रवाल
‘राजगड’ सावरण्यासाठीचा खांदेपालट
By किरण अग्रवाल | Published: January 20, 2018 4:33 AM