धर्मराज हल्लाळे
लातूर : धरणीकंपाने उद्ध्वस्त झालेल्या मंगरुळमध्ये सहाव्या दिवशी शोधकार्य सुरू होते. सात फूट मातीचा ढिगारा बाजूला केला जात होता. त्यावेळी कुणीतरी कण्हत असल्याचा आवाज कानी आला. जमीनदोस्त झालेल्या ५२ गावांतील बचाव कार्यात पाच-सहा दिवसांनंतर कोणी जिवंत सापडेल, ही आशाच मावळली होती. त्याचवेळी ढिगाऱ्यात मातीने माखलेली दीड वर्षांची प्रिया सापडली. लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांनी तिला अलगद बाहेर काढले. आयुष्याची दोरी बळकट असलेल्या चिमुकल्या प्रियाने स्वत:च्याच हाताने चेहऱ्यावरची माती स्वत:च दूर केली अन् ‘पाणी’ हा शब्द उच्चारला.भूकंपानंतर सहाव्या दिवशी सापडलेली प्रिया जवळगे ही ‘मिरॅकल बेबी’ म्हणून त्यावेळी चर्चेत आली. ती पहाटे सापडल्याने तिच्याच नावावर ‘गुडमॉर्निंग प्रिया’ (जी.एम. प्रिया) हे रुग्णालय दापेगावला सुरु झाले. २५ वर्षांनंतरही भूकंपाच्या कटू आठवणी प्रियाच्या मनात घर करून आहेत. त्यावेळी आई-वडील बचावले होते. परंतु, तिच्याच घरातील काका, काकू, आत्या, त्यांची मुले अशा एकत्र कुटुंबातील नऊ जण दगावले होते. सर्वांचे मृतदेह आढळले. काही जण बचावले. परंतु, व्यंकटराव जवळगे आणि त्यांच्या पत्नीला आपली दीड वर्षांची मुलगी दिसत नव्हती. घराचा ढिगारा बनला होता. शोधाशोध केली. पाच दिवस उलटले, तरी पत्ता लागत नव्हता. सर्वजण म्हणू लागले, इतक्या मोठ्या धक्क्यात मोठमोठी माणसे वाचली नाहीत अन् आता तर पाच दिवस उलटले आहेत, लेकरु असले तरी ते जिवंत कसे असेल ! जवळ जवळ सर्वांनी आशा सोडली. मात्र व्यंकटराव आपल्या मुलीसाठी सर्वांजवळ विनंती करीत होते. तिचा शोध घ्या म्हणत होते. पित्याच्या डोळ्यांतील पाणी बचाव कार्यासाठी आलेल्या सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांना पाहवले नाही. त्यांनी जवान सोबत घेतले. श्वान पथकास पाचारण केले. जवळगे यांच्या घराचा परिसर खोदण्यास सुरुवात केली. सात फूट मातीचा ढिगारा उपसला. आश्चर्य म्हणजे कण्हत असलेली प्रिया लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षींनी पाहिली. त्यांनी तिला अलगद उचलले. चेहरा मातीने माखला होता. प्रियानेच स्वत:चा हात तोंडावर फिरविला. पाणी मागितले. हा एक चमत्कारच असे म्हणत सर्वांनी तिला ‘मिरॅकल बेबी’ संबोधले.
प्रिया जवळगे या आता शिक्षिका बनल्या आहेत. दापेगावमध्येच त्या एका खाजगी शाळेत शिकवितात. नांदुर्गा येथील गोपाळ शिंदे यांच्यासमवेत त्यांचा विवाह झाला. शिंदे सध्या सातारा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. प्रियाचे वडील वर्षभरापूर्वी वारले. आई सोबत आहे. प्रियाला भूकंप आठवत नाही. परंतु, आईने सांगितलेल्या वेदनादायी आठवणी आणि ती वाचली कशी, ही कथा तिला अजूनही थक्क करते.
अन् जीवनदाते लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी भेटायला आले...
१९९३ च्या भूकंपात बचाव कार्यासाठी सैन्यही किल्लारी परिसरात दाखल झाले होते. लेफ्टनंट कर्नल बक्षी हे मदतकार्यासाठी मंगरुळला होते. त्यांनी प्रियाला वाचविले तेव्हा ती दीड वर्षांची होती. तिचे वडील म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी देवमाणूस होऊन आलात. त्यावेळी बक्षी म्हणाले, हा माझा फोटो ठेवा, ती मोठी झाल्यावर तिला सांगाल. मदतकार्य संपले. पुनर्वसन झाले. आपल्याला जीवनदान देणाºया व्यक्तीची भेट व्हावी, अशी प्रियाची इच्छा होती. त्यांच्याच गावातील एक जवान दयानंद जाधव सैन्यात होता. योगायोगाने त्याची लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी बक्षींना मंगरुळ आठवले. ते २४ वर्षांनंतर १३ आॅगस्ट २०१७ रोजी प्रियाच्या गावी आले. त्याक्षणी लेफ्टनंट कर्नल बक्षींच्या डोळ्यांत अश्रू, प्रियाच्या डोळ्यांत अश्रू अन् आईचे डोळेही पानावलेले. बक्षी म्हणाले, मला चंदीगडला बदली करून जायचे होते. कदाचित, मला प्रियाला भेटायचे होते म्हणूनच माझी पुण्याला बदली झाली.