नव्या वर्षाचा पहिला सूर्यकिरण एका नव्या दशकाचा प्रारंभ म्हणून पृथ्वीवर अवतरणार आहे. भविष्याचा वेध घेत अंदाज बांधताना एक गोष्ट स्पष्ट दिसते - हे नवे दशक एका अर्थाने मानवासाठी मन्वंतर असणार, यात शंका नाही. नव्या शतकात जग आक्रसले या अर्थाने की, जग जवळ आले. देशादेशांतील अंतर कमी झाले आणि मने विस्तारली. वैचारिक प्रगल्भता आली. राजकीय अर्थाने विचार केला, तर आयर्लंडसारख्या देशाचा पंतप्रधान जन्माने भारतीय आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस या सत्तेवर येऊ घातलेल्या बायडन सरकारमध्ये मिश्र वर्णाचे प्रतिनिधित्व करतील.
ब्रिटनमधील परिस्थितीही अशीच आहे. ही प्रगल्भता जगभर विस्तारत जाईल, अशी आशा करायला हरकत नाही. नवे दशक मानवी कष्ट कमी करणारे असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मानवी जीवन अधिक सुखकर कसे होईल, याचा प्रयत्न असेल आणि सर्वच क्षेत्रांत या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होताना दिसेल. ही ‘नवी’ बुद्धिमत्ता शेती, उद्योग ते दळणवळण, आरोग्य अशी सर्व क्षेत्रे व्यापणार असे दिसते. शेतीमध्ये ड्रोनचा सर्रास वापर, यांत्रिक शेतीवर भर, अचूक हवामान अंदाजामुळे नियोजन हे बदल दिसून येतील. दुष्काळ, अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे होईल. त्याची आकडेवारी, अहवाल त्वरित मिळतील आणि वस्तुनिष्ठ सर्वेक्षणामुळे सरकारला निर्णय घेणे सोपे होईल. ड्रोनद्वारे लाखो छायाचित्रे घेऊन त्याची विदा (डेटा) तयार होईल. म्हणजे मानवी कष्ट कमी होतील आणि वेळ वाचेल.
आजारपणात रक्ताची तपासणी केली, तर अहवालासोबत कोणते उपचार - औषधे घ्यावीत, याचे पर्याय त्यासोबत येतील. डॉक्टर तुलनात्मक विचार करून उपचार सुचवतील. हे तर काहीच नाही, एखादी अवघड शस्रक्रिया करायची आहे आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर परदेशात असले तरी ते तिथून नव तंत्रज्ञानाच्या मदतीने या शस्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. इंटरनेटचा वेग, माहितीची देवाण-घेवाण करणाऱ्या वेगाचा विचार केला, तर रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रातील ‘मनासी टाकिले मागे, गतिसी तुळणा नसे’ या वर्णनाशी साधर्म्य असेल. मनापेक्षाही जास्त वेग या दळणवळणाचा असेल. मोटारी, विमाने या वाहनांमध्ये बदल होतील आणि एकूणच मानवी जीवनाची गती वाढेल. मानवाचे आयुर्मान वाढेल आणि गती हेच जीवन असेल. प्रचंड वेगाने भविष्याचा वेध असणारी जिगीषू वृत्ती असली तरी निसर्गाची ओढ असणारा मूळ मानवी स्वभाव वर उफाळून येणे साहजिक आहे. या वेगापासून फारकत घेत शांत निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगण्याची ओढ वाढणार आहे.
‘स्लो लाइफ’ नावाची निसर्गाकडे चला म्हणणारी चळवळ सध्या जगभर हळूहळू आकार घेताना दिसते. नव्या दशकात भौतिक प्रगतीप्रमाणेच आत्मिक समाधानाची ओढ लागणार आहे. हा सगळा विचार प्रगती आणि विकासाच्या अंगाने केला, याचसोबत आपल्यासारख्या खंडप्राय देशासमोर काही समस्या आहेत आणि त्याचा सामना आपल्याला करावा लागेल. सर्वांत मोठा प्रश्न हा वाढत्या लोकसंख्येचा आहे. याचा सकारात्मक विचार केला, तर जगात सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या भारतात असेल. त्याचवेळी लोकसंख्येच्या बाबतीत आपला प्रतिस्पर्धी चीन वृद्धत्वाकडे झुकणार आहे. युरोपमध्ये तरुणांची संख्या कमी असेल. आपल्या तरुण लोकसंख्येला तांत्रिक प्रशिक्षण देऊन उद्यमशील बनवले, तर महासत्तेकडे आपली वाटचाल होऊ शकते. त्यात चूक झाली, तर दिशाहीन तारुण्य देशासाठी समस्या ठरू शकते.
जाती-पातीच्या मजबूत होत जाणाऱ्या भिंती, धर्माचा राजकारणातील वाढता प्रभाव, कायद्याला दुय्यम समजणारी वाढती प्रवृत्ती ही आपल्या लोकशाहीसमोरील आव्हाने आहेत. याचवेळी लोकसंख्या आणि उपलब्ध साधनसामुग्री यांचे व्यस्त प्रमाण हेसुद्धा आव्हान आहे. या देशांतर्गत आव्हानांबरोबरच सीमेवर चीन दबा धरून बसला आहे. खाली श्रीलंकेत त्याने पाय पसरायला प्रारंभ केला आहे. हिंदी महासागरावर त्याला प्रभुत्व मिळवायचे आहे. पाकिस्तानच्या कारवाया कमी होत नाहीत आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न थांबत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात भरवशाचा मित्र नाही. अमेरिका व्यवहारी आहे. रशिया पूर्वीचा राहिला आही. तो पुतीन यांचा आहे, हे विसरून चालणार नाही. सरत्या दशकातील हे प्रश्न नव्या दशकात नव्या अवतारात पुढे येतील. या सगळ्या आव्हानांचा सामना करत महासत्तेकडे वाटचाल करण्याची हिंमत आपल्यात आहे. हे दशक आपले असेल, एवढा दृढ विश्वास आहे.