आज आपण विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जगत असलो तरी लोकांची मने मात्र बदलायला तयार नाहीत. चंद्रवारी करणाऱ्या देशात अजूनही अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून लोकांचे जीव घेतले जातात. पैसा आणि अघोरी शक्ती प्राप्त करण्याच्या लालसेने नरबळी दिले जातात; यापेक्षा निंदनीय दुसरे काय असावे. विदर्भात भंडारा जिल्ह्यातील धानेझरी येथे जादूटोण्याच्या संशयावरून झालेल्या एका आदिवासी दाम्पत्याच्या नृशंस हत्त्येने हे भीषण वास्तव पुन्हा एकवार समोर आले आहे. गावात होणारे मृत्यू हे या दाम्पत्याच्या जादूटोण्यामुळेच होत आहेत असा समज करून गावकऱ्यांनी त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करून ठार केले. गेल्याच महिन्यात अमरावती जिल्ह्यात एका मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप झाला. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या कठोर कायद्यानंतरही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये सुद्धा हे अघोरी प्रकार सुरु आहेत. मागील वर्षी झारखंडमध्ये एकाच वेळी पाच महिलांना संतप्त जमावाने चेटकीण ठरवून जिवंत मारले होते. या संदर्भातील आकडेवारी धक्कादायक तेवढीच मन विचलित करणारी आहे. देशात २००० सालापासून आतापर्यंत २२६० लोकांना जादूटोण्याच्या संशयावरून आपले जीव गमवावे लागले असून त्यात महिलांची संख्या अधिक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बऱ्याचदा अशा प्रकारांना स्थानिक लोकांची साथ असतेच पण पोलीसही मानवहत्त्या म्हणून या गुन्ह्याकडे बघत नाहीत. महाराष्ट्रात २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांचे समूळ उच्चाटन हा या कायद्यामागील मुख्य हेतू आहे. या कायद्यानुसार चेटूक केल्याच्या संशयावरून मारहाण करणे, नग्न धिंड काढणे, बहिष्कार घालणे अथवा व्यक्तीला सैतान ठरविणे गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी ५ ते ५० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्येही असे कायदे आहेत. पण ते प्रभावी ठरत नसल्याचेच चित्र आहे. मुख्य प्रश्न या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख पटली नसल्याचे कारण पोलीस पुढे करीत असतात. अंधश्रद्धेसंदर्भात समाजात जागरुकतेचा अभाव हा सुद्धा महत्त्वाचा पैलू आहे. बहुदा अशा घटना ग्रामीण किंवा आदिवासी भागातच घडताना दिसतात. शासनाने विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमाने तळागाळातील या क्षेत्रात अंधश्रद्धेविरुद्ध लोकजागरच सुरू केला पाहिजे. लोकांमधील जागरुकता आणि संघटित विरोधानेच या विळख्यातून समाजाची सुटका होईल.
अघोरी विळखा!
By admin | Published: September 07, 2016 3:57 AM