शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

कोहं कोहं, सोहं सोहं

By admin | Published: January 07, 2015 10:39 PM

मनुष्य योनीत जन्म घेण्यापूर्वी, गर्भावस्थेत असणारा प्रत्येक जीव, मी कोण; मी कोण, (कोहं कोहं) असा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारीत असतो

मनुष्य योनीत जन्म घेण्यापूर्वी, गर्भावस्थेत असणारा प्रत्येक जीव, मी कोण; मी कोण, (कोहं कोहं) असा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारीत असतो आणि जन्म झाल्यानंतर स्वत:च स्वत:ला सांगतो, तोच मी;तोच मी (सोहं सोहं) म्हणजे त्या परमेश्वराचाच अंश मी, असे काही जीवन तत्त्वज्ञान आहे असे म्हणतात. अर्थात ते जरी तसे असले तरी अद्याप एकाही तत्त्वज्ञानीला आणि दार्शनिकाला मी नेमका कोण, या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर सापडलेले नाही. ते सापडावे म्हणूनचे चाचपडणे अव्याहत सुरुच आहे. ते एकीकडे सुरु असतानाच आता संपूर्ण मानवयोनीच्या जरी नाही तरी भारतीय मानवयोनीच्या नशिबी मात्र वेगळेच चाचपडणे येईल अशी किंवा आली आहेत, अशी चिन्हे दिसत आहेत. या चाचपडण्यातून जे उत्तर गवसवायचे आहे, ते म्हणजे, मी मूळचा कोण आहे, हिन्दु आहे की मुस्लिम आहे? केन्द्रात संघवासी लोकांचे सरकार प्रतिष्ठापित झाल्यामुळे अनेक स्वयंभू हिन्दू धर्ममार्तंड सध्या भयानक चेकाळले असून, या देशात जन्मलेला प्रत्येक जीव मूलत: हिन्दूच होता आणि कालांतराने त्याचा म्लेंच्छ वा किरीस्तांव बनविला गेला, अशी मांडणी करीत आहेत. त्यामुळेच मग ज्यांचे ज्यांचे म्हणून धर्मांतर घडवून आणले गेले, त्या साऱ्यांना त्यांच्या जन्मधर्मी परत आणणे, म्हणजेच त्यांची घरवापसी करणे यासारखे उत्तम धर्मकार्य नाही. इथपर्यंत सारे ठीक होते. मी कोण याचे उत्तर यात अनुस्यूत होते. पण घोटाळा वा संभ्रम नंतर सुरु झाला. असाउद्दीन ओवेसी नावाचे जे हैदराबादी आणि काहीसे मूलतत्त्ववादी खासदार आहेत, त्यांनी हिन्दु धर्ममार्तंडांच्या मांडणीला छेद देत, या भूमीत जन्माला आलेला प्रत्येक जीव मूलत: मुस्लिमच होता आणि कालांतराने त्याला बलपूर्वक हिन्दु बनविले गेले, असा नवा सिद्धांत मांडला आहे व त्यामुळे मी मूळचा कोण (कोहं) हिन्दु की मुस्लिम असा पेच निर्माण झाला आहे. आता ओवेसी यांचा हा सिद्धांत म्हणजे क्रिया की साक्षी महाराज, निरंजन ज्योती आणि तत्सम प्रभृतींच्या क्रियेची प्रतिक्रिया याचा निर्णय करणे कोहं या सनातन प्रश्नाचे उत्तर सापडविण्यापेक्षाही अधिक जटील. या साऱ्या प्रभृती आणि ओवेसी यांच्यासारखे लोक व त्यांची विधाने आणि वक्तव्ये पाहिल्यानंतर देशातील साऱ्या आणि विशेषत: नाहीरे वर्गाच्या साऱ्या समस्या सुटल्या आहेत व केवळ या देशातील लोकांचे मूळ शोधून काढण्याची एकमात्र समस्या शिल्लक राहिली आहे, असा कोणाचाही समज व्हावा. जसे असाउद्दीन ओवेसी लोकसभेचे सदस्य आहेत तसेच साक्षी महाराज नावाचे एक साधू वा संत हेदेखील लोकसभा सदस्य आहेत. त्यांच्या दिव्य वाणीने याआधीही मोदी सरकारवर लज्जीत होण्याची वेळ आणली आहे. पण साक्षी महाराज इतके परमकोटीचे अपरिग्रहवादी की त्यांनी अशी वेळ स्वत: कधीच ग्रहण केलेली नाही वा स्वीकारलेली नाही. म्हणूनच की काय, त्यांनी घरवापसी म्हणजे धर्मांतर नव्हे, असे प्रमाणपत्र बहाल करताना, धर्मांतर हा गुन्हा आहे व त्याला मृत्युदंड एव्हढी एकच शिक्षा आहे असे बजावताना घरवापसी आणि धर्मांतर यांची गल्लत करु नका असेही ठणकावले आहे. साक्षी महाराज सत्ताधारी पक्षाचे खासदार असले तरी देशाच्या तूर्तासच्या नशिबाने सत्ताधारी नाहीत. पण म्हणून काही बिघडत नसल्यानेच बहुधा धर्मांतर आणि गायीची हत्त्या करणाऱ्यांना थेट सुळावर चढविण्याची तरतूद करणारा कायदा लवकरच संसदेत संमत केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर करुन टाकले आहे. पण केवळ इथेच थांबतील तर ते साक्षी महाराज कसले? हिन्दु धर्माचे स्वयंघोषित संचालनकर्ते असल्याच्या अभिनिवेशात त्यांनी तमाम हिन्दु विवाहिताना एक आवाहन करताना, प्रत्येकीने किमान चार अपत्यांना जन्म दिलाच पाहिजे, असे म्हटले आहे. चार बायका आणि चाळीस मुले हा प्रकार आता या देशात चालणार नाही, असेही ते न सांगते तरच आश्चर्य घडले असते. हे कशासाठी, तर या देशातील हिन्दुंची घटती (?) लोकसंख्या रोखून नंतर वाढविण्यासाठी. अशाच स्वरुपाचे एक आवाहन काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील जाहीरपणे केले होते. या आवाहनातील चार बायका आणि चाळीस मुले याचा संदर्भ मुस्लिम समुदायाशी आहे, हे उघड आहे. पण मुळात आजचे ते वास्तव नाही. जनगणनेच्या आकडेवारींनीही ते दाखवून दिले आहे. परंतु आजही त्रेता वा द्वापारयुगात वावरणाऱ्या आणि मध्ययुगीन संकल्पनांची झापडे लावून फिरणाऱ्यांना वास्तवाशी कधीच काही घेणेदेणे नसते. त्यातूनच मग या देशात जन्माला आलेला प्रत्येक जीव हा हिन्दु म्हणूनच जन्म घेतलेला असतो, अशा मांडणीचा उगम होतो व मग त्याच आणि तशाच भाषेत तिचा प्रतिवादही केला जातो. अगडबंब आणि अतार्किक बोलणाऱ्या संघाच्या आणि भाजपाच्या काही लोकांमुळे पंतप्रधान मध्यंतरी बरेच त्रस्त झाले होते आणि त्यांनी पदत्यागाची धमकी वा इशारा दिल्याचेही प्रसिद्ध झाले होते. कालांतराने त्याचा इन्कार केला गेला, हे अलाहिदा. पण साक्षी महाराज आणि तत्सम लोक समाजात दुही पसरेल असे अनिर्बन्ध बोलतच राहिली, तर पंतप्रधानांवर तशी वेळ येऊही शकते. तथापि त्यांनी सूचक वा थेट इशारे देऊनही त्यांच्याच पक्षातील काही वाचाळ आपल्या वाणीला लगाम लावणार नसतील, तर त्याचा आपल्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, हे मोदी यांना कधीतरी ध्यानात घ्यावेच लागेल.