- दिनेश लाड विराट कोहलीने २०५ डावांत १० हजार धावा पूर्ण करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. त्याची कामगिरी अप्रतिम आणि अविश्वसनीय असून, इतक्या कमी वयात एवढा मोठा पल्ला गाठणे खूपच मोठी कामगिरी आहे. तो अजून ८ वर्षे याच पद्धतीने खेळतला, तर तो नक्कीच सचिनचे उर्वरित विक्रमही मोडेल. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि असे वाटते की, त्याचा जन्म हा विक्रम मोडण्यासाठीच झाला आहे. त्यामुळे कोहलीची कामगिरी खरेच खूप कौतुकास्पद आहे.खुद्द सचिनने ४ वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात म्हटले होते की, त्याच्या विक्रमांपुढे केवळ भारतीय खेळाडूच जाऊ शकतील आणि ही क्षमता फक्त दोन खेळाडूंमध्ये आहे, ते म्हणजे कोहली आणि रोहित शर्मा. रोहितला कसोटीत अजून म्हणावी तशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्याविषयी ठामपणे काही म्हणता येणार नाही, पण कोहली सचिनच्या विक्रमांच्या दिशेने खूपच वेगाने जात आहे. त्याच्यासारखा सकारात्मक खेळ जर इतर खेळाडूंनी केला, तर मला वाटते भारतीय संघाला हरवणे कोणत्याही संघासाठी अशक्य असेल. धावांचा पाठलाग करणारा कोहली जगातील सर्वात धोकादायक खेळाडू आहे.सचिन जेव्हा निवृत्त झाला, तेव्हा म्हटले जायचे की, त्याचे विक्रम मोडणे कोणालाही शक्य होणार नाही, पण कोहली अपवाद ठरत आहे. कोहली सचिनचे विक्रम मोडणारच यात दुमत नाही. फक्त त्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, ती म्हणजे तंदुरुस्ती. कोणत्याही दुखापतींचा अडथळा न आल्यास, तो पुढील किमान ७-८ वर्षे खेळेल आणि यामध्ये त्याच्याकडून अनेक विश्वविक्रमही रचले जातील. त्याची तंदुरुस्ती अप्रतिम आहे. जगातील सर्वच खेळाडूंनी त्याच्याकडून ‘फिटनेस टिप्स’ घेण्याची गरज आहे. क्रिकेट हे आपले दैवत आहे, असे मानत तो खेळतोय. कोहली खेळाप्रती खूप समर्पित असून, गांभीर्याने खेळत आहे. तो क्रिकेटची सेवा करत आहे आणि यामुळेच कोहली यशस्वी ठरत आहे. त्याला स्वत:ला जाणीव आहे की, तंदुरुस्ती कायम असेपर्यंत खेळता येईल. त्यामुळे तो यावर अधिक लक्ष देतो.प्रशिक्षक म्हणून मी युवा खेळाडूंना अनेकदा कोहलीचे उदाहरण देतो. यातील सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे सकारात्मक खेळ व स्वत:वरील विश्वास. प्रत्येक खेळाडूने हे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. कोहलीची आक्रमकता प्रत्येक सामन्यात दिसून येते. मग ती फलंदाजी करताना असो किंवा नेतृत्त्व करताना, तो कायम आक्रमक दिसतो. याचे कारण म्हणजे स्वत:वर असलेला विश्वास. त्याला स्वत:च्या खेळावर ठाम विश्वास आहे आणि याचा फायदा संघाला होतो. त्यामुळे इतर खेळाडूंनीही असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.सध्या सचिन व कोहली यांच्यात तुलनाही होत आहे. माझ्यामते हे अयोग्य आहे. कारण दोन्ही खेळाडू आपापल्या काळातील श्रेष्ठ आहेत. दोघांच्या काळातील क्रिकेटमधील फरकही खूप मोठा आहे. शिवाय दोघांची खेळण्याची पद्धतही वेगळी आहे. आज कोहली संघाचा प्रमुख फलंदाज आहे. त्याच्या कामगिरीवर संघाची वाटचाल ठरते, पण इतर खेळाडूंनीही कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडू स्वकर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय संघात आला असल्याने याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. एखाद्या सामन्यात अपयशी ठरल्यावर पुढील सामन्यात आपल्याला संघात जागा मिळेल की नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकालाच कठोर मेहनत घ्यावी लागेल.(क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक)
कोहलीचा पराक्रम अविश्वसनीय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:22 AM