- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
कोलकात्यातील एका इस्पितळात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि नंतर तिच्या हत्येच्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. ‘मी अत्यंत निराश आणि भयभीत आहे’ असे भारताच्या राष्ट्रपतींना म्हणावे लागत असेल तर स्थिती अत्यंत गंभीर आहे हे उघडच होय. हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. आपल्या देशात इतकी भयानक परिस्थिती कशी उत्पन्न झाली आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याविषयी प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे आकडे सांगतात की भारतात प्रत्येक दिवशी बलात्काराचे सरासरी ८७ गुन्हे नोंदले जातात. लैंगिक स्वरूपाच्या इतर गुन्ह्यांची संख्या यात धरलेलीच नाही.
बलात्कारासंबंधीचे आकडेही केवळ नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांचे आहेत. भारतात स्त्रीची / तिच्या कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी हजारो बलात्कार लपवले जातात. कारण बलात्कार आणि लैंगिक स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये पीडितेच्या निकटचे लोक जास्त असतात, बाहेरचे कमी. असे का होते? जवळचे लोकच भक्षक का होत आहेत? गेल्या वर्षीच्या तुलनेत बलात्कारांच्या संख्येत १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ का झाली? अलीकडेच मल्याळम चित्रपट उद्योगात होत असलेल्या महिलांच्यालैंगिक शोषणाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर अभिनेता तसेच आमदार एम. मुकेश, अभिनेता सिनेमा कलावंत जयसूर्या ऊर्फ मनियन पिला राजू यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला गेला. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनीही असे सांगितले, की व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपवलेल्या कॅमेऱ्यातून अभिनेत्रींचे व्हिडीओ तयार केले जात होते.
निर्भया कांडानंतर संपूर्ण देश हादरला होता आणि अशा प्रकारचा अपराध करण्यापूर्वी कायद्याची भीती वाटली पाहिजे इतका तो कायदा कडक असावा अशी मागणी होऊ लागली. संसदेची बैठक रात्रभर चालली. पण झाले काय? निर्भया कांडासारख्या घटना आजही घडत आहेत. तयार केला गेलेला कायदा किती प्रभावी आहे? निर्भया कांडानंतर उसळलेला संताप आता कुठे दिसत नाही. काही प्रकरणांत जलदगती न्यायालयांनी बलात्काऱ्यांना शिक्षा दिली आहे परंतु सर्व प्रकरणांत असे होत आहे काय? ही गोष्ट कायद्याची; परंतु केवळ कायद्यानेच प्रश्न सुटू शकतो?
पोर्नोग्राफीचा खुलेआम प्रसार हे लैंगिक गुन्ह्यांमागील प्रमुख कारण आहे असे मला वाटते. आपल्या मोबाइलमध्ये पोर्नोग्राफीने ठाण मांडले आहे. केवळ युवकच नव्हे तर सर्व वयोगटांतील लोकांना पोर्न पाहण्याचे व्यसन लागले आहे. त्रिपुरा विधानसभेत एक आमदार जादव लाल नाथ सभागृहाचे काम चालू असताना ब्ल्यू फिल्म पाहत होते. कुणी तरी पाठीमागून त्यांचा व्हिडीओ चित्रित केला, तेव्हा हे प्रकरण समोर आले. त्याच्याही आधी कर्नाटक विधानसभेत तत्कालीन मंत्री लक्ष्मण सावदी आणि सी. सी. पाटील हे ब्ल्यू फिल्म पाहत होते. पोर्नोग्राफीने संपूर्ण समाजाला कसे ताब्यात घेतले आहे हे आपल्याला कळावे म्हणून या घटनांचा संदर्भ दिला. कोणीही व्यक्ती अशाप्रकारे फिल्म्स पाहत असेल तर त्याच्यावर उन्माद स्वार होतो. वासनांध होऊन तो अमानुष वागतो. आपण एखाद्या मुलीवर बलात्कार करत आहोत की ७० वर्षांच्या वृद्धेची इज्जत लुटतो आहोत याचेही भान त्याला राहत नाही. बलात्कार करणाऱ्याला वय दिसत नसते. पोर्नोग्राफीने पछाडल्यामुळे पती-पत्नीमधील संबंध बिघडल्याचेही अनेकदा दिसून येते. अगदी अलीकडे छत्तीसगडमध्ये एक प्रकरण समोर आले होते. एका माणसाच्या बायकोने न्यायालयात सांगितले की तिचा नवरा पोर्न फिल्म्स पाहतो आणि स्वतः तसे संबंध करू इच्छितो. बायको इतकी वैतागली की तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्या नवऱ्याला शिक्षा दिली. परंतु अशी किती प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचतात, हाही प्रश्नच आहे.
अशा घटनांच्या बातम्या वाचल्या, की डोके बधिर होऊ लागते. आपल्या देशात हे सगळे काय चालले आहे? मी जगभर फिरतो. काही अविकसित आफ्रिकी देश वगळता युरोपपासून अमेरिका, ऑस्ट्रेलिया... कुठेही स्त्रियांच्या बाबतीत इतकी भयावह स्थिती नाही. पोर्नोग्राफीचा जन्म पश्चिमी देशात झाला असला तरी तो तेथील एक उद्योग असूनही त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपली संस्कृती पूर्णतः वेगळी आहे. आपल्या देशावर पोर्नोग्राफीचा वाईट परिणाम झाला आहे. आपल्याकडे १४-१५ वर्षांची मुलेही पोर्नोग्राफी आणि अमली पदार्थांची शिकार होत आहेत आणि ते जघन्य अपराध करतात तेव्हा त्यांना बालगुन्हेगार कायद्याचा फायदा मिळतो. दुर्दैवाने आपल्याकडे अशीही उदाहरणे आहेत की पोर्नोग्राफीसाठी प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात कलाकार झाली. चित्रपट सृष्टीतील काही मान्यवर लोक पोर्नोग्राफिक फिल्म्स तयार करू लागले, ते पकडलेही गेले.
आपल्या मुली सर्व क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी करत आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रशासकीय सेवेपासून सैन्यदले, तसेच अंतराळापर्यंत त्यांनी आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत. परंतु समाज? तो मात्र स्त्रियांच्या बाबतीत मागेमागेच जाताना दिसतो. ज्या समाजात महिलांची कदर केली जाते, तेथे अशा प्रकारचे अपराध नगण्य होतात. आपल्या देशात नागालँड, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप याची उदाहरणे आहेत. तेथे कोणी महिलांविरुद्ध गुन्हा केला तर सर्वांत आधी समाज त्यांना शिक्षा करतो. सामाजिक जागृती आणि कठोरताच या भयानक स्थितीतून आपल्याला बाहेर काढू शकेल, हे उघडच आहे. राष्ट्रपतींना वाटणारी भीती याचीच गरज दर्शविते.