- महेश सरनाईक
कोकणातील घराघरात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. राज्याच्या दक्षिणेकडील टोकावर असलेला अगदी छोटासा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे त्यातील ४० टक्के लोक हे नोकरीधंद्यानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मुंबई तसेच उपनगरात राहतात. इतर कोणत्याही सणापेक्षा गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो.
त्यामुळे वर्षातून एकदा न चुकता आपल्या मूळ गावी, घरी दीड, पाच, सात, अकरा दिवस उत्सव साजरा करण्यासाठी लाखो लोकांचे पाय आपल्या मूळ घराकडे वळतात आणि या प्रवासासाठी सर्वात पहिल्यांदा प्राधान्य दिले जाते ते कोकण रेल्वेला. कारण कोकण रेल्वेची वाहतूक ही सर्वाधिक सुरक्षित, अतिशय कमी खर्चाची आणि येता-जाताना मनपसंत सामान घेऊन जाण्याची हक्काची जागा. मात्र, लाखो लोकांचे प्रवास करतानाचे हाल पाहता राज्यकर्त्यांनी श्रेयासाठी धडपडत न बसता लाखो लोकांना न्याय देण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी झगडणे आवश्यक आहे.
नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी आघाडी शासनात मंत्री असताना दादर येथे सावंतवाडी-दादर या गाडीसाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेऊनच काही हंगामासाठी सुरू करण्यात आलेली ही राज्यराणी एक्सप्रेस प्रशासनाने दररोज सुरू ठेवली आहे. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी मागून मिळत नाहीत हे स्पष्ट करणारी ही परिस्थिती आहे.
यावर्षी गणेशोत्सवात कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावरून, पनवेल येथून काही जादा गाड्या सोडल्यामुळे चाकरमान्यांना त्याचा फायदा झाला. मात्र, या गाड्यांची संख्या आणखीन वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या जादा गाड्यांना असणाºया प्रवासी बोगींची संख्यादेखील वाढणे आवश्यक आहे. कारण आरक्षित बोगी वगळता प्रत्येक गाडीला केवळ तीन ते चारच अनारक्षित बोगी असतात. मात्र, गणेशोत्सवाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत येथे येणाºया चाकरमान्यांची संख्या ही लाखोंच्या घरात असते. प्रत्यक्षात हे प्रवासी या बोगींमधून मावत नाहीत. परिणामी त्यांना शौचालयाजवळ बसूनही प्रवास करावा लागतो.
७० ते ८० जणांसाठीच्या एका बोगीतून २०० पेक्षा जास्त लोक जर प्रवास करू लागले तर मग त्या बोगीची अवस्था काय असणार. अशीच परिस्थिती प्रत्येक बोगीची असते. कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांसाठी आगाऊ तीन-तीन महिने आरक्षण करूनदेखील सर्वसामान्य प्रवाशांना प्रतीक्षा यादीवर राहण्याच्या पलीकडे काहीच मिळत नाही. प्रतीक्षा यादीवरील लोकांनी करायचे तरी काय? कारण तिकीट रद्द करणे हा मार्गदेखील त्यांच्याकडे नसतो. कारण तिकीट रद्द केले तर परत प्रवास कसा करायचा? कारण मुंबईतून सावंतवाडीकडे जाणाºया ६०० किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट आहे आरक्षित ४०० रुपयांच्या आसपास आणि सर्वसाधारणचे २०० रुपयांच्या आसपास. तर याच मार्गावर एसटीचे तिकीट आहे ७०० रुपयांपर्यंत आणि खासगी बसचे १५०० रुपयांच्या आसपास. त्यातही एसटी म्हणा किंवा खासगी बसने प्रवास करताना आपल्यासोबत आणणाºया सामानासाठी समस्या निर्माण होते.
कारण या सामानासाठी ‘लगेज’चे वेगळे पैसे मोजावे लागतात आणि ते सामान परत इच्छित स्थळी न्यायचे असल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल परंतु कोकण रेल्वेनेच प्रवास करायचा म्हणून कोकणी माणूस येणाºया प्रत्येक संकटाला तोंड देत प्रवास करताना आढळतो. अनेकवेळा प्रवासी डब्यांमध्ये जागेवरून मारामारीपर्यंतचे प्रसंगही उद्भवतात. प्रवासी डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांचाही सुळसुळाट असतो. त्यामुळे प्रत्येक बाबतीत कोकणी माणसांना झगडावे लागते.
कोकण रेल्वे म्हणजे भारताचे उत्तर आणि दक्षिण टोक जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दक्षिणेकडील तामिळनाडूपासून उत्तरेकडील जम्मू काश्मिरपर्यंतची अनेक राज्ये कोकण रेल्वेमुळे जोडली गेली आहेत. त्यामुळे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्ये अतिशय कमी खर्चात जोडणा-या या मार्गाचा कोकणातील लोकांपेक्षा कितीतरी पटीने इतर राज्यातील लोक याचा वापर करीत आहेत.
उत्तरेकडील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, जम्मू काश्मिर ही महत्त्वाची राज्ये तर दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधील अनेक प्रवासी या मार्गावरील वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास करीत असतात. परिणामी कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील अनेक स्थानिक गाड्या या वेगवेगळ्या स्थानकात थांबवून ठेवून लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्गस्थ केले जाते. त्यामुळे कोकण रेल्वेने हॉलिडे स्पेशल जादा गाड्या सोडल्या तरी त्यांना बाजूला ठेवून दैनंदिन लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काहीवेळा अगदी १० तासांचा हा प्रवास १२ ते १५ तासांपर्यंतही वाढतो.
कोकण रेल्वेचा पूर्ण मार्ग हा एकतर्फी आहे. कारण या मार्गावर बहुतांशी ठिकाणी पूल आणि बोगदे आहेत. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा पहिला टप्पा आता सुरू आहे. दुसºया टप्प्यात बोगदे आणि पुले वगळून दुपरीकरण केले जाणार आहे. प्रत्यक्षात तसे ज्यावेळी होईल त्यावेळी गाड्यांची संख्या वाढेल आणि वेळही वाचेल. मात्र, तूर्तास या मार्गावर जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक खास करून गणेशोत्सवाच्या काळात करता येईल. याकडे लक्ष पुरविणे आजच्या दृष्टीने प्रथम कर्तव्य असले पाहिजे.
सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची धुरा असताना कोकण रेल्वे मार्गावरील नवीन स्थानके, रेल्वेचे दुपदरीकरण, प्रवाशांना सुविधा, सावंतवाडीतील रेल्वे टर्मिनस अशा अनेक गोष्टींना चालना मिळाली होती. मात्र, प्रभूंकडून रेल्वे मंत्रालयाची धुरा काढून घेतल्यानंतर आता नवे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे कोकणातील स्थानिक राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांचे होणारे हाल, चाकरमान्यांची घालमेल आणि यातून मार्ग काढण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करावी लागेल. कारण या जगात मागितल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. कोकणी जनता आणि संघर्ष हे कायमचेच सूत्र असून राज्यकर्त्यांनी वेळीच यावर मार्ग काढला नाही तर लोकांच्या चळवळीला एकत्रित करण्यासाठी वेळ लागणार नाही आणि त्यातून मग जनतेच्या रोषाला राज्यकर्त्यांनाच तोंड द्यावे लागेल, एवढे मात्र निश्चित.
कोकणातील प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका
कोकणातील माणूस हा खूपच सहनशिल आहे. तो कधीही उगाचच कोणाच्या कुरापती काढत बसत नाही. मात्र, आपल्यावर होणाºया अन्यायाविरोधात तो कायमच पेटून उठतो. अन्याय सहन करायचा नाही हा त्याचा स्थायी भाव आहे. एकवेळचे अन्न मिळाले नाही तरी चालेल मात्र, राहणीमानात कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. या स्वभावामागील कारणमिमांसा शोधल्यास लक्षात येईल की, संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई शहराशी त्याची नाळ जोडलेली आहे. मुंबई हे असे शहर आहे की, ज्या शहरात तुम्हांला जीवन जगताना आपले स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचे भान आपोआपच निर्माण होते. हे सर्व येथे सांगण्याचा मूळ उद्देश काय, असे तुम्हांला वाटले असेल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल येथे राहणारा कोकणी माणूस आवर्जून गणेशोत्सवाला आपल्या मूळ गावी येतो. गणेशोत्सवात गावी येण्यासाठी कोकण रेल्वेला त्याचे प्रथम प्राधान्य आहे. कारण रेल्वेने कमी वेळेत, कमी खर्चात तुम्हांला प्रवास करता येतो आणि या प्रवासात तुम्ही तुमचे कितीही सामान आपल्याबरोबर आणू शकता. कोकण रेल्वेने कोकणात येणा-या चाकरमान्यांसाठी चांगली सेवा देण्याची माफक अपेक्षा चाकरमान्यांची असते. मात्र, या अपेक्षापूर्तीसाठी चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना अनेक अर्थाने झगडावे लागत आहे.
सावंतवाडी येथील डी. के. टुरिझम या संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी कोकण रेल्वेतील कारभाराबाबत टाकलेल्या फेसबुक पोस्टवरून सध्याची प्रवाशांची वस्तुस्थिती समोर येत आहे. जी-जी व्यक्ती गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेतून प्रवास करेल तिला या वस्तुस्थितीची निश्चितच जाणीव होईल. यामध्ये डी. के. सावंत म्हणतात, कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडून कोकण्यांवर फार मोठे उपकार केले. परंतु मध्य रेल्वेच्या आडमुठेपणामुळे तसेच कोकण रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गणपती बाप्पाच्या पूजनासाठी जाणा-या गणेश भक्तांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला पारावार उरला नाही. महिला, लहान मुले व वयोवृद्धांचे हाल पहावत नव्हते.
विमानाच्या श्रेयासाठीच्या प्रयत्नात असलेल्या पालकमंत्र्यांना व खासदारांना हे दरवर्षी होणारे गणेश भक्तांचे हाल दिसत नाहीत काय? सकाळी सातनंतर रात्री अकरा वाजेपर्यंत १६ तासांत एकही ट्रेन का सुटू शकत नाही? (रत्नागिरी पॅसेंजर सोडून) सर्व नेत्यांना माझे जाहीर निमंत्रण आहे. त्यांनी विकासाच्या गप्पा मारत असताना फक्त पाच मिनिटे वेळ काढून दादर स्थानकावर फलाट क्रमांक ५ वर रात्री ११.२0 वाजता इंजिनजवळ व रात्री ११.३0 वाजता फलाट क्रमांक ७ वर तुतारी एक्सप्रेसच्या मागील चार डब्यांजवळ किंवा ठाण्यात रात्री ११.३0 नंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती पहावी.
संवेदनशिलता असल्यास प्रवाशांचे हाल पाहून आपण नेते आहोत याची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. उत्तर भारतात जनावरेसुद्धा अशी नेली जात नाहीत. दुपारनंतरच रांगेत असणाºयांना रत्नागिरीपर्यंत नैसर्गिक विधीसाठी अडावे लागते. ह्या सहनशिलतेचा किती अंत पहाणार आहात? संपूर्ण देशात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा असा आहे की ५०० किलोमीटर अंतरावर असूनही जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या पाचपटीपेक्षा जास्त नागरिक शहरात (मुंबई, पुणे, पनवेल, ठाणे, डहाणू) राहतात हे माहीत आहे काय? डी. के. सावंत यांची ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट आहे. त्या पोस्टला अनेक सर्वसामान्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.