महाराष्ट्रातून एक मोठे वळण घेत कृष्णा नदी कर्नाटकात प्रवेश करते. २००४ पर्यंत महाराष्ट्रातून वाहत येणारे पाणी अडविणारे एकही मोठे धरण कृष्णा नदीवर नव्हते. पावसाळ्यात वाहणारे पाणी डिसेंबरपर्यंत राहायचे आणि जानेवारीपासून सहा महिने नदीकाठावरच्या गावांनाही पाण्यासाठी शोध घ्यायला लागायचा. बागलकोट जिल्ह्यात अलमट्टी येथे १२४ टीएमसी क्षमतेचे धरण २००५ मध्ये पूर्ण झाले आणि सुमारे पावणेदोन लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आले.हा बदल होण्यापूर्वी सिद्धू भीमाप्पा न्यामगौडा नावाच्या एका तरुणाने १९८९ मध्ये एक बंधारा सहकारी तत्त्वावर कृष्णा नदीवरच उभारला होता. हा कर्नाटकातील पहिला खासगी स्वरूपाचा सहकारी बंधारा होता. पाण्याची टंचाई भागविण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे काम या ३८ वर्षांच्या तरुणाने केले. जमखंडी तालुक्यातील चिक्कपडसलगी गावाच्या हद्दीत कृष्णा नदीवर ४३० मीटर लांबीचा आणि आठ मीटर उंचीचा हा बंधारा सिद्धू न्यामगौडा यांच्या पुढाकाराने बांधला. न्यामगौडा यांनी शेतकºयांना एकत्र करून कृष्णातीरा रयत संघ स्थापन केला. (कृष्णातीर) या संघातर्फे बंधारा बांधण्याचा निर्धार केला. शेतकºयांनी जमेल तेवढा निधी द्यायचा आणि श्रमदानही करायचे असे आवाहन केले. सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जमला. केवळ एका वर्षात हा बंधारा बांधला आणि जमखंडी तसेच अथणी तालुक्यातील ३५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले.३० खेड्यांतील शेतकºयांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. काळीभोर जमीन, पाणी आल्याने उसाची शेती फुलली. एक कोटी रुपये खर्चून या खेड्यांतून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा ऊस पिकविला जाऊ लागला.सिद्धू भीमाप्पा न्यामगौडा या तरुणाचे नाव केवळ कर्नाटकातच नव्हे, तर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांतही चमकले. दरम्यान, १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेस अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना बागलकोट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात उभे होते कर्नाटकाचे तत्कालीन सर्वाधिक लोकप्रिय नेते व माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे. हेगडे यांनी आयुष्यात पराभव पाहिला नव्हता. मात्र, पाणी देणारा हा पाणीदार नवा नेता सिद्धू न्यामगौडा त्यांना भारी ठरला. रामकृष्ण हेगडे यांचा त्यांनी २१ हजार मताधिक्क्याने पराभव केला. शेतकºयांच्या मदतीने कृष्णासारख्या मोठ्या नदीवर सहकारी तत्त्वावर शेतकºयांच्या मालकीचा बंधारा बांधणारा चळवळीतील नेता म्हणून सिद्धू न्यामगौडा यांचे नाव झालेच होते. रामकृष्ण हेगडे यांचा पराभव केल्याने ते राष्ट्रीय हिरो झाले. त्या काळात जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून हेगडे यांचा प्रचंड दबदबा होता. शिवाय कर्नाटकात काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जनता दलाचा सर्वत्र विस्तार झाला होता.शेतीला सहकारी बंधारा बांधून पाणी देणाºया या नेत्याचा पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. जमखंडी मतदारसंघातून त्यांनी विधानसभेवर अनेकवेळा प्रतिनिधित्व केले. गेल्या १२ मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे श्रीकांत कुलकर्णी यांचा पराभव केला होता. ज्येष्ठ आमदार, माजी केंद्रीय मंत्री, पाणी देणारा नेता आणि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अशी त्यांची ओळख होती. कर्नाटकात त्यांना मंत्री होता आले नव्हते. ज्येष्ठ आमदार म्हणून यावेळी त्यांना संधी होती. त्या निमित्तानेच पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले होते. गोवामार्गे ते जमखंडीला परत जात होते. पहाटे बेळगावजवळ त्यांचे रस्ते अपघातात निधन झाले. शेतीला पाणी देणारा एक चळवळी नेता हरपला.- वसंत भोसले
(bhosalevasant@gmail.com)