- शैलजा भा. शेवडेआपण देवाची प्रार्थना करतो. देव ती प्रार्थना ऐकतो. आपल्या इच्छा पूर्ण करतो, अशी आपली श्रद्धा असते.प्रार्थना करणे ही फक्त मन मोकळे करण्याची उपचार पद्धती नाही, तर देवाबरोबर एक चांगला नातेसंबंध जोडण्याचा मार्ग आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य गोष्टींसाठी केलेल्या प्रार्थना तो खरोखरच ऐकतो. देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तिभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. माणूस अत्यंत लीन झाला, की सहजपणे त्याच्या तोंडून शब्द येतात, ती प्रार्थनाच. आपण प्रार्थना करताना ऐहिक गोष्टी मागत असतो, रूपं देही, धनं देही, पुत्रं देही, जयं देही... त्या सर्वशक्तिमान परमेश्वरापाशी काही मागताना आपण अजिबात संकोच करत नाही.पण महाराणी कुंतीने कृष्णाची प्रार्थना केली, त्यात वेगळंच मागणं मागितलं. ती म्हणते,जिथे तिथे, अन् पुन्हा पुन्हा ती संकटे बहु येवो,व्याकुळतेने तुला स्मरो, अन् दर्शन तव लाभो.हे कृष्णा, आम्हावर वारंवार आपत्ती येत राहोत...तिचे हे मागणे असामान्यच आहे. का ती संकटे मागतेय, तर...कुळधन विद्ये मदांध त्यांना, तू न कधी दिसतो,कोणीही नाही ज्यांना तुजविण त्या दर्शन तू देतो.कृष्णा, उत्तम कुळातला जन्म, ऐश्वर्य, ज्ञान, समृद्धी यामुळे माणसाला उन्माद येतो, तो परमेश्वराचे स्मरण करत नाही. ज्यांना श्रीकृष्णावाचून कोणीही नाही, ते लोक प्रार्थना करतात, तेव्हा श्रीकृष्ण धावून येतो. म्हणून कुंती म्हणते, आमच्यावर सतत संकटे येवोत. आम्ही आर्तपणे तुझी प्रार्थना करू आणि तुझ्या दर्शनाचा लाभ असा काही मिळेल, की आमची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होईल.कुंती कृष्णाला पुढे म्हणते,हे विश्वेशा, विश्वात्म्या रे, विश्वमूर्ती कृष्णा,आप्तांचे मम स्नेहपाश दृढ, तूच तोड कृष्णा;हे मधुपती रे, तुझ्याविना ना अन्य विषय येवो,गंगौघासम, प्रबळ भक्ती मम तुझ्यात लीन होवो.हे परमेशा कृष्णा, माझ्या मनातील स्वजनांबद्दलचा स्नेहपाश तूच तोडू शकतोस. गंगा नदी जशी आपला प्रवाह सगळे प्रतिबंध दूर लोटून अखंड समुद्रात वाहत नेते, तशी माझी बुद्धी सर्व अवांतर विषयांपासून मुक्त होऊन, माझ्या आत्यंतिक भक्तीला तुझ्याकडे घेऊन जावो आणि तुझ्यात विलीन होवो.
कुंतीची प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:07 AM