हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -
भाजप-शिवसेना यांच्यातील सध्याच्या नात्याचे वर्णन करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना सामंजस्याने विभक्त होत असल्याची घोषणा केलेल्या आमिर खान आणि किरण राव यांची आठवण झाली. खरे तर ही तुलना करताना राऊत यांचे तसे चुकलेच, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटची एक व्यक्ती नंतर खाजगीत मला म्हणाली, ‘आमचा काही घटस्फोट झालेला नाही. एका समान ध्येयाशी आम्ही बांधलो गेलो होतो. मतभेद असल्यामुळे एकत्र न राहणाऱ्या विभक्त जोडप्यासारखी सध्या आमची अवस्था आहे, इतकेच!’
- शिवसेनेतल्या अनेकांना अजूनही असे वाटते की भाजपशी पुन्हा संसार मांडण्याची शक्यता संपलेली नाही. मुहूर्त लांबणीवर पडला आहे इतकेच!
त्यामुळे सेनेच्या कोणा कट्टर शत्रूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले म्हणून मोदी-ठाकरे यांच्या नात्यावर काही परिणाम होणार नाही. अनेक राज्यांत असा विरोधाभास आहेच. ओरिसात भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण नवीन पटनाईक यांच्यावर तो कधीही टीका करीत नाही. आंध्राचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका टाळली जाते. रेड्डी यांच्यावर सीबीआय, ईडीचे आरोप आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यावर टीकेपासून भाजपवाले दूर असतात. माजी पंतप्रधान देवेगौडा विरोधात जाणार नाहीत याची काळजी पक्ष घेतो. मात्र, तेलंगणाच्या बाबतीत भाजप मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत असतो. पश्चिम बंगालसाठी भाजपची फुटपट्टी हीच आहे. पंजाबात मात्र मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलन ज्या रीतीने हाताळले त्याबद्दल पक्ष खाजगीत त्यांची बाजू घेतो. अकालींशी भले फाटले असेल; पण भाजप त्यांच्यावर टीका करीत नाही.
- त्याच न्यायाने भाजपची राज्य शाखा ठाकरेंवर टीका करीत असते, त्याच वेळी केंद्र मात्र नरमाईची भूमिका घेते. राज्यात ‘अपघात होत नाही’ तोवर एकटे चालण्यासाठी केंद्राने फडणवीस यांना स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्याच वेळी मोदी यांचे उद्धव ठाकरेंशी सौहार्दही कायम आहे.
उद्धव म्हणजे नितीशकुमार नव्हेत!आठ जूनला दिल्लीत उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्या भेटीत काय बोलले गेले हे आता हळूहळू बाहेर येत आहे. अर्थात, त्यावर दोघेही जाहीरपणे काहीही बोललेले नाहीत. दोघांनी परस्पर सौहार्द नेमके राखले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तेव्हाही त्या वादातून मोदी कटाक्षाने बाजूला राहिले. उद्धव यांची विधान परिषदेत नियुक्ती राज्यपाल लांबवीत होते, तेव्हाही मोदी यांनी पुढाकार घेऊन ती करायला लावली. महाराष्ट्राचा कारभार पंतप्रधानांनी स्वत:कडे घेतला आहे हे आता लपून राहिलेले नाही. ४८ खासदार दिल्लीत पाठविणाऱ्या महाराष्ट्रात सत्ता यावी याबद्दल मोदी आग्रही आहेत. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीने ४२ जागा जिंकल्या असल्याने मोदी इथली एकही जागा गमावू इच्छित नाहीत; पण म्हणून भाजपला काहीतरी घडेल आणि सेना आघाडीतून बाहेर पडेल याची वाट पाहत बसता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मोदी-ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. दोघांनी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि काहीसा मार्ग निघाला आहे असे सांगण्यात येते.पंतप्रधानांच्या घराच्या भिंतीवर बसलेल्या माशीच्या कानावर उद्धव यांचे एक वाक्य आले आहे. ‘आपल्याच लोकांनी मला तिकडे ढकलले’ -असे उद्धव ठाकरे मोदींना म्हणाल्याचे दिल्लीतील सूत्रे सांगतात. काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी आपल्या स्वप्नातही नव्हती; पण तुमच्या लोकांनी मला त्यात ढकलले, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघतो. शिवसेनेला ढकलत ढकलत इतके कोपऱ्यात नेण्यात आले की, काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यावाचून त्यांना गत्यंतरच उरले नाही. आपण स्वत:हून त्या आघाडीतून बाहेर पडून अचानक मध्यरात्री भाजपशी हातमिळवणी करू शकत नाही, असेही ठाकरे यांनी मोदींकडे स्पष्ट केले आहे. आघाडीतून बाहेर पडण्यासाठी भक्कम कारण हवे. त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही; पण त्यांचा रोख नितीशकुमार यांच्याकडे असावा. नितीश बिहारमधल्या सत्तेसाठी वारंवार भूमिका बदलत आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करतानाही आपण धोरणात्मक तडजोड केलेली नाही, असेही ते म्हणाले. ‘शिवसेनेचा एकही नेता मोदी किंवा केंद्राविरुद्ध चकार शब्द बोलणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाडीची नौका आपण स्वत:हून खडकावर नेऊन आपटविणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर मोदी यांनीही ठाकरे यांना आश्वस्त केल्याचे सांगतात, ‘आपण ५ वर्षे सत्ता सांभाळावी असेच पक्षाला वाटत असल्या’चे मोदी यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. संजय राऊत यांनीही अशीच काहीशी भावना व्यक्त केली आहे. भाजपने शिवसेनेवर ही वेळ आणली नसती तर तो पक्ष आज सत्तेत असता, असे राऊतही म्हणालेले आहेतच.