प्रा. रणधीर शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक
भाषा साहित्य संस्कृती वाटचालीत व्यक्तींबरोबरच संस्थात्मक कार्याचादेखील महत्त्वाचा सहभाग असतो. बऱ्याचदा अशा संस्थांचे कार्य दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. एकोणिसाव्या शतकापासून विविध संस्थांनी मराठी भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृतीविषयक महत्त्वाचे कार्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली. भौतिक संस्कृतीच्या विकासाबरोबर सांस्कृतिक जीवनाची भरभराट त्यांना महत्त्वाची वाटत होती. सांस्कृतिक जीवनाची इयत्ता वर्धमान होण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे कार्य व्हावे, असे त्यांना वाटे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही भारतीय पातळीवरील आरंभ काळात राज्य पातळीवरील पहिलीच साहित्यविषयक संस्था आहे. ‘ज्ञानाच्या सरोवराचे पाट लोकांच्या जीवनापर्यंत पोहोचविले पाहिजेत, यासाठी भाषा, इतिहास व साहित्यासंबंधी मौलिक कार्य उभे करावे,’ अशी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. १९५४ साली स्थापन झालेल्या साहित्य अकादमीची रचना व कार्य त्यांच्यापुढे असावे.
मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाषा, साहित्यासंबंधी विविध प्रकारची उल्लेखनीय पायाभूत स्वरूपाची कामे झाली आहेत. साहित्य, संस्कृती आणि इतिहास या विषयांवरील ग्रंथरचना, प्रकाशनाबरोबरच काळानुरूप विविध योजना मंडळाने सुरू केल्या. यामध्ये ललित आणि ललितेतर वाङ्मय प्रकाशनार्थ अनुदान, नवलेखक अनुदान योजना, नवलेखक कार्यशाळा, साहित्य संस्था व संमेलनांना अनुदान, नियतकालिके व साहित्यसंस्थांना मदत व विविध स्वरूपाचे पुरस्कार अशा त्या योजना आहेत. नवोदित लेखकांच्या प्रथम प्रकाशन अनुदान योजनेतून अनेक नामवंत लेखकांची पुस्तके आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. अगदी अलीकडे २०१८ साली मंडळाच्या नव लेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेल्या नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीस युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या सत्तर एक वर्षांतील मंडळाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे विविध स्वरूपाच्या मौलिक ग्रंथांची निर्मिती व त्यांचे प्रकाशन! आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची ग्रंथप्रकाशने मंडळाच्या वतीने प्रकाशित झाली. महाराष्ट्राच्या समाज-संस्कृतीच्या इतिहासाचे काही एक मापन या लेखनातून झाले. यात एकोणिसाव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळातील महाराष्ट्रीय समाजाच्या वाटचालीविषयीचे काहीएक लेखन विविध प्रकारच्या ग्रंथांद्वारे झाले.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारक व विचारवंतांचे लेखन प्रकाशित झाले. समग्र वाङ्मय व निवडक वाङ्मयाचे खंड प्रसिद्ध झाले. लोकहितवादी, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, कृ. अ. केळुसकर, अण्णा भाऊ साठे, अमर शेख, नामदेव ढसाळ अशा विचारवंत लेखकांचे वाङ्मय प्रकाशित झाले. एका अर्थाने महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेच्या विचारमंथनाबरोबर मराठी मनाचे भरणपोषण करण्याचे काम या वाङ्मयाने केले. याबरोबर दुर्मीळ वाङ्मयाचेदेखील प्रकाशन मंडळाने केले आहे. हस्तलिखिते, संतवाङ्मय, महानुभाव वाङ्मय, जैन वाङ्मय ते एकोणिसाव्या शतकातील काही लेखन तसेच पुनर्मुदण मंडळाने प्रकाशित केले आहे. यामध्ये ज्ञानोदयलेखनसारसूची खंड महत्त्वाचे होत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसुधारकांची, विचारवंतांची चरित्रे ‘ शिल्पकार चरित्रमाला’ या मालेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासावरील काही मौलिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आजवर मंडळाने पाचशेहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंडळाचे अध्यक्ष व मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या वाङ्मयीन धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाते. मंडळाने गेल्या सत्तर वर्षांत प्रकाशित केलेल्या बहुविध ग्रंथांकडे नजर टाकली तर महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती, इतिहास वाटचालीचे विहंगदर्शन घडते ज्याचे मूळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ध्येयधोरणात दिसून येते. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीक्षेत्रात मंडळाने बजावलेली भूमिका अनन्य महत्त्वाची आहे.