२४ मे १९६७ रोजी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावातून सुरू झालेली नक्षल चळवळ आज तब्बल चार दशकांचा प्रवास करून पार दमून गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दलित, अतिगरीबमजूर, भूमिहीन शेतकरी आणि आदिवासींच्या जीवनात पारतंत्र्याचा काळोख कायम होता. त्यामुळेच या शोषितांचा प्रशासनाबद्दलचा असंतोष वाढत होता. याचाच फायदा घेत नक्षल चळवळीने आपले पाय रोवायला सुरुवात केली अन् अवघ्या देशात सातत्याने हिंसाचार घडवून आणला. हा हिंसाचार इतका तीव्र की पोलीस आणि निमलष्करी दलालाही अनेकदा मागे पाहावे लागले. परंतु आता चार दशकांच्या अखंड रक्तपातानंतर या चळवळीचे कंबरडे मोडले आहे. याचे श्रेय अर्थातच अनोळखी निबिड अरण्यात प्राण हातावर घेऊन नक्षल्यांशी थेट भिडणाऱ्या पोलिसांचे आहे. नक्षल्यांचे ‘रेस्ट झोन’ ठरत असलेल्या सिरोंचासारख्या परिसरात याच बहादूर पोलिसांनी जेव्हा बंदुकीच्या टोकावर त्या भागापुरते नक्षल्यांचे अस्तित्वच संपूवन टाकले तेव्हाच या चळवळीला लागलेल्या वाळवीने तिला पुरते पोखरून टाकले आहे, याचे संकेत मिळत होते. सिरोंचाची सुवार्ता लवकरच अवघ्या गडचिरोली जिल्ह्याची सुवार्ता ठरेल, अशी आशा त्यातूनच व्यक्त व्हायला लागली होती. एका झटक्यात १६ नक्षल्यांचे मुडदे पाडून पोलिसांनी हा आशावाद बºयाचअंशी सार्थ ठरवला आहे. आकड्यातच बोलायचे झाल्यास यंदा नऊ महिन्याच्या आतच तब्बल ४१ नक्षल्यांना पोलिसांनी यमसदनी पाठवले आहे. कायदा व हिंसाचाराच्या या समरांगणात पहिल्यांदा पोलिसांनी इतके भव्य यश संपादन केले आहे. यासाठी निश्चितच पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. परंतु हा लढा पोलीस विरुद्ध नक्षल असा अजिबात नाही. नक्षल्यांचा चोला पांघरूण ज्यांनी ज्यांनी पहिल्याक्षणी बंदुका हाती घेतल्या त्या सर्वांचा राग सामाजिक तसेच आर्थिक विषमतेला खतपाणी घालणाºया व्यवस्थेविरुद्ध होता. पुढे ही चळवळ भरकटली, नक्षल नेते भ्रष्ट झाले. पण, ज्यांच्या बळावर ती ही लढाई लढत होते ते सर्वसाधारण नक्षली मात्र व्यवस्थेविरुद्धच लढत राहिले, अजूनही लढताहेत. व्यवस्थेबद्दलचा हा सनातन राग प्रत्येक वेळी बंदुकीच्या धाकावरच मिटवणे शक्य नाही. ही व्यवस्था ४० वर्षांआधी होती इतकी क्रूर नाही, आता तिने आपलेही ‘माणूस’ असणे मान्य केले आहे आणि अन्न, वस्त्र, निवाºयासोबतच आरोग्य, शिक्षणाची गंगा आपल्याही दुर्गम झोेपडीपर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास या आदिवासी तरुणांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. कारण, दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.
पण, अंतिम उपाय विकासच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM