- गजानन दिवाण बँकेतील खात्यात दमडीही नसताना एटीएम कार्ड वाटप करुन गरिबी दूर होईल काय? आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येईल? लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना याचे विस्मरण झाल्याचे दिसते. भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरकरांना यातून बाहेर काढण्यासाठी खासदारांनी अजब फंडा समोर आणला आहे. कूपनलिका घेण्यासाठी २०० फूट खोलीच्या मर्यादेचा कायदा बदलून तो ४०० फुटापर्यंत वाढवण्यासाठी संसदेत आवाज उठवू, अशी ग्वाही खासदारांनी लातूरकरांना दिली आहे. कूपनलिकेसाठी २०० फूट खोलीची मर्यादा असतानाही जमिनीची अक्षरश: चाळणी करून टाकली. ती ४०० करून काय साध्य होणार? निसर्गाला फक्त ओरबाडून खायचे. किती दिवस पुरेल? बदल्यात आपण काहीतरी निसर्गाचे देणे लागतोे, हेच विसरून गेलो आहोत आम्ही. बरं, हे परत देणे कोणासाठी तर स्वत:साठीच की. तेही करीत नाही आम्ही. पडलेले किती पाणी जागीच मुरवतो? अनेक योजनांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रूपये मिळतात. पॅकेज दिले जाते. पुढच्या वर्षी पुन्हा तेच. दुष्काळाची चादर पांघरून शासनाकडे असे किती दिवस हात पसरत राहायचे? राजकारणी, प्रशासन काहीच करीत नाही, हे रडत बसण्यापेक्षा माझे घर-शेत-गाव म्हणून मी काय करतो, हा विचार आता करण्याची गरज निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात साधारण ७०० मि.मी. एवढा पाऊस दरवर्षी पडतो. वेळ मिळाल्यास स्वत: खासदारांनी आणि जमले तर प्रत्येक गावच्या सरपंचाने एकदा नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावाला भेट द्यायला हवी. या गावात वर्षाला साधारण ३०० मि.मी. पाऊस पडतो. म्हणजे लातूर जिल्ह्याच्या सरासरीपेक्षाही निम्मा. यंदा हिवरेबाजारपेक्षाही जास्त म्हणजे ४३२ मि.मी. पाऊस या जिल्ह्यात झाला. तरीही दुष्काळाच्या प्रचंड झळा सोसत शासनाच्या नावे रडत आहोत आम्ही. गेल्या २० वर्षांत या गावाने कुणासमोरही हात पसरला नाही. पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हे गाव ठेवते. प्यायला किती, सांडायला किती आणि पिकाला किती? जितके पाणी तितके पीक. उगीच ऊस लावून श्रीमंती थाट मिरवत नाही हे गाव. पाण्याच्या नावे एवढी ओरड असताना आजही लातूर जिल्ह्यात ४६ हजार हेक्टर्सवर ऊस उभा आहे. ऊसाला हेक्टरी १८७.५ लाख लिटर पाणी लागते. मराठवाड्यात ऊसाच्या पाण्याचा वाटा ७१.९ टक्के आहे. ऊसाएवढाच किंवा त्यापेक्षा अधिक पैसा मिळवून देणारी अनेक पिके आहेत. त्या पर्यायांचा विचार व्हायला हवा. एकीकडे कूपनलिका घेण्याला परवानगी नसताना जास्तीचा पाऊस होऊनदेखील कूपनलिकांची मर्यादा दुप्पट करण्याचे स्वप्न पाहतो आम्ही. जे हिवरेबाजारला जमले ते लातूरला किंवा मराठवाड्याला का नाही? पाच वर्षांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील पाणीपातळी ३.५५ मीटरने घटली आहे. भूजल विभागाने निरीक्षण केलेल्या १०९ विहिरीतील पाण्याने तळ गाठला असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळा आणखी बराच दूर असताना जिल्ह्यात ९४ टँकरद्वारे ११० गावांना पाणी पुरवले जात आहे. जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यातील २४० गावे आणि ६० वाड्यांना ३४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला असून जवळपास २१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. आता काय, तर टँकरसाठी पाठपुरावा. लोकप्रतिनिधी असो वा सर्वसामान्य नागरिक सर्वांचे हेच काम. दुष्काळावर मात करण्यासाठी पॅकेज किंवा टँकरच्या कुबड्या किती दिवस घेणार? सरकार किंवा प्रशासन काहीतरी करेल आणि दुष्काळातून वाट निघेल हे केवळ स्वप्न झाले. लोकप्रतिनिधींनी ते दाखवावे आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनी त्याच्यामागे धावत जावे, हे आता थांबायला हवे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन वैयक्तिक आणि गावपातळीवर व्हायला हवे. ते होणार नसेल, तर देवही तुमचे भले करू शकणार नाही.