मुंबई - मराठी मातीत लोकसंगीत आजही तितक्याच ताकदीने टिकून आहे याचा प्रत्यय मुलुंड नाट्यसंमेलनात पुन्हा एकदा आला. गण, गवळण, शाहिरी, लावणी या महाराष्ट्राच्या अस्सल मातीतील कला आहेत. या कलेचा आद्य प्रवर्तक म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. सलग ६० तासांच्या नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यरात्री पंचरंगी पठ्ठे बापूराव या अस्सल मराठी मातीतील कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. शाहीर पठ्ठे बापूराव यांचे १५० वे जयंती वर्ष आहे. या महान शाहिराला मानवंदना देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आपल्या ६० तासांच्या सलग नाट्यसंमेलनात मानाचे स्थान दिले.आणि दोन तास चाललेल्या या बहारदार कार्यक्रमाला पहाटेपर्यंत रसिकांनीही शिट्ट्या, टाळ्यांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली.तमाशा कलेला सुवर्णयुग दाखवणाऱ्या पठ्ठे बापूरावांचा आज जरासा विसर पडला आहे. महाराष्ट्रातील लोककलांचं खरं वैभव म्हणजे तमाशा. पठ्ठे बापूरावांनी अनेक गण, गवळणी, लावण्या रचल्या. पण काळाच्या ओघात या शाहिराचा लोकांना विसर पडला. लोककला जर जिवंत ठेवायची असेल तर या शाहिराच्या गण, गवळणी आणि लावण्या विसरून चालणार नाही. पठ्ठे बापूरावांच्या या अजरामर लावण्यांचा, गणांचा, कवनांचा संग्रह करण्यात आलेला नाही. हा अमूल्य संग्रह काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ नये या उद्देशाने लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि लोककला अकादमीचे प्रमुख आणि या कार्यक्रमाचे दिग्दर्शक प्राचार्य डॉ. गणेश चंदनशिवे यांनी या कार्यक्रमाची आखणी केली. गण, गवळण, तक्रारीची लावणी, ओळखीची लावणी या नृत्यआविष्काराबरोबरच नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, प्राजक्ता महामुनी, योगेश चिकटगावकर या लोकगायकांनी सादर केलेल्या गणांना, शाहिरीला रसिकांनी वन्स मोेअर दिला.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पठ्ठे बापूरावांच्या महान कार्याची आठवण ठेवली, याचा मला विशेष आनंद आहे. पठ्ठे बापूरावांच्या विस्मृतीत गेलेल्या शाहिरीला आज रसिकांनी जो भरभरून प्रतिसाद दिलाय त्याचा मला विशेष आनंद होतोय. लोककलेचा अभ्यासक म्हणून मला नेहमी वाटते की अशा मोठ्या व्यासपीठावर लोककलेला त्याच्या आद्य प्रवर्तकांना मानाचे स्थान मिळावे. आजही संधी मिळाली आणि रसिकांनीही त्याला भरघोस पाठिंबा दिला याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.- डॉ. प्रकाश खांडगे, लोककलेचे अभ्यासकरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सलग ६० तासांच्या नाट्यसंमेलनात मध्यरात्री जे कार्यक्रमहोतील त्यांना मुंबईकर प्रतिसाद देतील का, याविषयी संमेलनापूर्वी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र मध्यरात्री १.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात हाउसफुल्ल गर्दी होती. प्रत्येक गण, गवळण, लावणीला रसिकांचा पहाटेपर्यंत वन्स मोअर प्रतिसाद मिळत होता हे विशेष.मुख्य म्हणजे या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणाºया डॉ. गणेश चंदनशिवे आणि लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर हे दोन महान कलाकार एकत्र आले होेते. त्याचबरोबर ज्यांनी दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा या महान लोकनाट्याला आपल्या हार्मोनियमने तब्बल २०० हून अधिक प्रयोगांची सुरेल साथ दिली ते ज्येष्ठ हार्मोनियम वादक सुभाष खरोटेही या महान शाहिराला आदरांजली देण्यासाठी या कार्यक्रमात सामील झाले होते.
नाट्य परिषदेची पठ्ठे बापूरावांना आदरांजली, मध्यरात्री संमेलनात रंगला लावण्यांचा फड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:09 AM