विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी’कांत प्यारेलालच्या संगीतावर लक्ष्मीदर्शनाचा खेळ झाला हे उघड सत्य आहे. मात्र, या निवडणुकीला केवळ आर्थिक नव्हे तर त्या-त्या ठिकाणचे राजकीय संदर्भदेखील होते. राष्ट्रवादीला सोलापूरची जागा गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला. पंढरपूरचे राजकीय मठाधिपती सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार प्रशांत यांनी भाजपाच्या साथीने आमदारकी मिळवून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांना चित करण्याचा चमत्कार केला. परिचारक यांना ‘सुशील’ साथ मिळाल्याने ते ‘विजय’ मिळवू शकले हे या निकालाचे सार आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांना मानणाऱ्यांनी अजित पवार यांना मानणाऱ्यांवर केलेली ही मात आहे. भाजपा स्वबळावर जिंकली नसती म्हणून परिचारकांना समोर करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली. मुंबईत भाजपाच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून त्या मोबदल्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची जागा काँग्रेसकडून बिनविरोध मिळवून घेतली. मुंबईत अपक्ष प्रसाद लाड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसचे भाई जगताप यांना भाजपाने दमविले. राष्ट्रवादीने मुंबईत काँग्रेसला साथ दिली की प्रसाद यांचे लाड केले हे राजकीय जाणकारांना माहिती आहेच. भाई जगताप यांचा अभिमन्यू करण्याचे प्रयत्न बरेच झाले पण भाई सगळ्यांना पुरून उरत जिंकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना ८६ मतांसह विजय मिळाल्याने शिवसेनेत कोणतीही दगाबाजी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये नाशिकनजीकच्या त्र्यंबकेश्वरचे फाईव्हस्टार शिक्षणसम्राट रवींद्र सपकाळ यांचा बहुजनांच्या झेंड्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करवून घेण्याचा प्रयत्न फसलाच नाही तर तसे करणे हे त्यांच्या अंगलटदेखील आले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून प्रचंड संख्याबळ असतानाही शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले ही आघाडीसाठी चपराक आहे. ऐनवेळी आलेल्या आगंतुक सपकाळांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने स्वत:चे हसे करून घेतले. कोल्हापुरात महादेवरावांनी ज्यांना म्हणून आतापर्यंत अंगावर घेतले त्या सगळ्यांनी मालकांचा हिशेब चुकता केला. राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फोडू हा महाडिकांचा होरा चुकला. विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांची आमदारकीची गाडी चुकली ती आता त्यांनी गाठली आहे. धुळे-नंदुरबारमध्ये काँग्रेसचे अमरिशभाई पटेल यांनी भाजपाचे पानिपत केले. युतीकडे असलेली मतेही भाजपाचे वाणी यांना मिळू न शकण्याची नामुष्की ओढवली. अहमदनगरमध्ये काँग्रेसचे जयंतराव ससाणे यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. या निवडणुकीत आघाडी व युतीमध्ये कुठे एकीचे तर कुठे बेकीचे दर्शन घडले. आठपैकी एकही जागा भाजपाकडे नव्हती. आता या पक्षाकडे दोन जागा आल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील संख्याबळ प्रत्येकी एकने कमी झाले आहे.
लक्ष्मीदर्शनाचा खेळ!
By admin | Published: December 31, 2015 3:02 AM